वैयक्तिकरित्या गोव्यात येणार्‍या खलाशांकडून शुल्क घेणार नाही

0
132

 

>>  काही कंपन्यांची क्वॉरंटाईन खर्चाची तयारी ः मुख्यमंत्री

 

विदेशातून वैयक्तिक पातळीवर गोव्यात  येणार्‍या गोमंतकीय खलाशांकडून क्वारंटाईन शुल्क वसूल केले जाणार नाही. विदेशातील काही कंपन्यांनी खलाशांचा  क्वारंटाईन शुल्क देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे राज्य सरकारने खलाशांसाठी क्वारंटाईन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, क्वारंटाईन खर्चाची सक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले.

राज्यात खलाशांच्या क्वारंटाईऩ खर्चाच्या प्रश्‍नावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून क्वारंटाईऩ शुल्काच्या प्रश्‍नावरून सरकारवर टिका केली जात आहे.  उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, आमदार फ्रान्सीस सिल्वेरा, विल्फेड डिसा, क्लाफासियो डायस यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी खलाशांच्या क्वारंटाईऩ खर्चाच्या प्रश्‍नावर काल चर्चा केली.

या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोमंतकीयांकडून क्वारंटाईन शुल्क वसूल केले जाणार नाही. काही कंपन्यांनी क्वारंटाईऩचा खर्च देण्याची तयारी दर्शविल्याने क्वारंटाईऩ शुल्काची तरतूद करण्यात आली आहे. विदेशात काम करणार्‍या खलाशांकडून वैयक्तिक पातळीवर क्वारंटाईऩ शुल्क घेतले जात नाही. खलाशांच्या कंपनीकडून क्वारंटाईन खर्च घेतला जात आहे. जर, खलाशी वैयक्तिक पाातळीवर गोव्यात येत असतील तर त्यांच्याकडून क्वारंटाईऩ शुल्क घेतले जाणार नाही, असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यात सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही हॉटेल्स ताब्यात घेतली आहेत. सरकारकडून  हॉटेलला प्रति खोली २५०० रुपये भाडे  दिले जात आहे.  कळंगुट येथील एका हॉटेल मालकाने आपले हॉटेल क्वारंटाईऩ सुविधेसाठी दिले आहे. अन्य एका हॉटेल मालकाने आपले हॉटेल क्वारंटाईन सुविधेसाठी उपलब्ध केलेले नाही. क्वारंटाईन सुविधेसाठी हॉटेलमालकांनी आपली हॉटेल्स उपलब्ध करावी, असेही सावंत यांनी सांगितले.

दहावी, बारावी परीक्षांवर

उद्या निर्णय

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत येत्या ३ मे रोजी निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील आमदार व शैक्षणिक संस्था व इतरांनी दहावी, बारावी, पदवी परीक्षेबाबत प्रश्‍न मांडलेला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

ओल्ड गोवा येथील पुरातन चर्चच्या दुरुस्तीच्या प्रश्‍नावर पुढील आठवड्यात सर्व संबंधितांची बैठक घेऊन आवश्यक निर्णय घेतला जाणार आहे. लॉकडाऊनमुळे चर्चच्या दुरुस्तीच्या कामाला विलंब झाला आहे. सदर चर्चच्या दुरुस्ती कामाची पाहणी केली आहे असेही सावंत यांनी सांगितले.

विदेशात अडकून पडलेल्या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी चार्टर फ्लाईटची व्यवस्था करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे. राज्य सरकारकडून विदेशात असलेल्या गोमंतकीय नागरिकांबाबत माहिती देऊन आणण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.