वेगळ्या जगातले लोक

0
397

राज्यामध्ये कोरोनाने थैमान मांडलेले असताना काही बेफिकिर अवलिये मात्र किनारपट्टीमधील भाड्याच्या आलिशान बंगल्यांमधून रेव्ह पार्ट्यांचा हैदोस घालण्यात मग्न आहेत. अशाच एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश वागातोरमध्ये काल झाला. या पार्टीमध्ये कोकेन, चरस आणि एमडीएम सारख्या अमली पदार्थांचा सुळसुळाट होता, हेही छाप्यावेळी आढळून आले. अर्थात, झालेली कारवाई हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे. सामान्य जनता कोरोनाने ग्रस्त आणि त्रस्त झालेली असताना हे परप्रांतातून आणि परदेशातून आलेले महाभाग मात्र व्यसनांत आणि पार्ट्यांत मस्त आहेत हे धक्कादायक आहे. यांच्या जगामध्ये जणू कोरोनाने काही उलथापालथच झालेली नाही असा त्यांचा एकंदर व्यवहार पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. हे जणू वेगळ्याच जगातले लोक आहेत, ज्यांचे भोवताली काय चालले आहे याच्याशी काही देणेघेणेच दिसत नाही.
पोलिसांची धडक कारवाई कौतुकास्पद आहेच, परंतु केवळ एका पार्टीचा पर्दाफाश केल्याने त्यांची जबाबदारी संपत नाही. मुळात अशा प्रकारे भाड्याच्या बंगल्यांमधून रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याची या लोकांची हिंमतच कशी होते, कोणाच्या पाठबळावर होते याचे उत्तर जनतेला आज हवे आहे. अशा प्रकारच्या रेव्ह पार्ट्यांबाबतच्या तक्रारी सातत्याने कानी येत आहेत, परंतु बहुतेक वेळा स्थानिक पोलिसांच्या ते गावीही नसते याचे आश्चर्य वाटते.
या छाप्यांत पकडल्या गेलेल्या यच्चयावत व्यक्ती परप्रांतीय वा परदेशी आहेत. काहींचे वास्तव्य जरी गोव्यात असले तरी यातला एकही मूळ गोंयकार नाही. गोवा ही यांच्यासाठी केवळ भोगभूमी आहे आणि त्यासाठीच हे लोक गोव्यात येतात, राहतात आणि खा, प्या, मजा करा करीत काळा पैसा उधळतात. हे जे पकडले गेलेले आहेत, त्यामध्ये बहुतेक विदेशी नागरिक आहेत. रशियन, मेक्सिकन, चेक प्राजसत्ताक असे विविध राष्ट्रीयत्वाचे हे लोक आहेत. पर्यटक असल्याच्या बहाण्याने हा जो धिंगाणा हे लोक येथे घालत होते, त्यावरून मंत्री आणि सरकार पायघड्या घालत असलेल्या गोव्यातील पर्यटनाचा दर्जा काय हे कळून चुकते. पर्यटनाच्या बहाण्याने हे असले रंग उधळले जाणार असतील तर या पर्यटनाचा फेरविचार व्हायला हवा. या विदेशींची तात्काळ त्यांच्या देशात परत पाठवणी व्हायला हवी.
पार्टीमध्ये पकडले गेलेले काही मुंबई आणि दिल्लीकर आहेत. एक तर म्हणे बॉलिवूडमधील तथाकथित अभिनेता आहे. या निशाचरांच्याच जोरावर गोवा – मुंबई आणि गोवा – दिल्ली रात्री उशिराची विमाने चालतात. शनिवार – रविवार गोव्यात यायचे पार्ट्या करायच्या आणि अपरात्री परत जायचे हा या धनदांडग्यांचा दिनक्रम कोरोनाच्या या थैमानातही कमी झालेला नाही याचे आश्चर्य वाटते. कोठे गेले ते होम क्वारंटाईन? कोठे गेले कोरोना चाचणी नकारात्मक आल्याचे प्रमाणपत्र? या रेव्ह पार्टीतील सहभागींची या अंगानेही चौकशी व्हायला हवी.
पार्टीत सहभागी झालेल्यांत बॉलिवूडमधील एक किरकोळ अभिनेताही आहे. मुख्यमंत्री आणि कला संस्कृतीमंत्र्यांसमवेतचे त्याचे फोटेही आता समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. राजकारणी हे सार्वजनिक जीवनात वावरत असतात, त्यामुळे कोणीही येऊन त्यांना भेटत असते, परंतु मंत्र्यांसमवेतच्या अशा छायाचित्रांचा दुरुपयोग होऊ शकतो, हे लक्षात घेऊन अशा भेटीगाठींत तारतम्य ठेवले गेले पाहिजे. भेटीला येणार्‍या प्रत्येकाची पार्श्वभूमी नेत्यांना ठाऊक असणे शक्य नसते, शिवाय भेटून गेलेल्याने नंतर गुन्हा केला तर त्याचा दोषही त्यांना देणे गैर आहे, परंतु अशी छायाचित्रे जेव्हा पुढे येतात तेव्हा नेत्यांशी यांचे घनिष्ठ संबंध आहेत असे एक विपर्यस्त चित्र जनतेसमोर निर्माण होते व त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो हे नेत्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे. कोणीही समोर आला की त्याची आपली जन्माची ओळख असल्यासारखे त्याच्याशी वागणे राजकारणात फायद्याचे जरी ठरत असले, तरी अशा प्रकरणांत नुकसानकारक ठरू शकते. मध्यंतरी आपण उत्तर प्रदेशचा एक मंत्री असल्याचे सांगून एक महाभाग गोव्यात येऊन नेत्यांमध्ये उठबस करून गेला होता. एकाने तर त्याला शाळेच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणा म्हणूनही नेले होते! गोव्याच्या राजभवनातही यापूर्वी काही बाहेरील ठकसेन राहून पाहुणचार भोगून गेल्याची काही उदाहरणे आहेत. हा भाबडेपणा फार महाग पडू शकतो हे राजकारणात वावरणार्‍यांना तरी सांगावे लागू नये. आता किमान कोणाचाही मुलाहिजा न ठेवता या रेव्ह पार्टी प्रकरणात कारवाई व्हावी आणि असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत हे कटाक्षाने पाहिले जावे. त्यातूनच समाजमाध्यमांवरील या संशयाचे निराकरण होऊ शकेल.