वेगळे क्षण…

0
13
  • गिरिजा मुरगोडी

एखादं ठिकाण बघायला जाणं यामागे प्रत्येकाचा काहीतरी विचार असतो. मनात काही कल्पना असतात, धूसर प्रतिमा असतात, चित्रं असतात. काही ऐकलेलं, वाचलेलं, चित्रांमधून पाहिलेलं असं कुठेतरी अंतर्मनात आपल्या नकळतही रेंगाळत असतं. या सर्वांसह आपण प्रत्येक अनुभव किती मनःपूर्वक घेतो यावरच त्या भेटीची सफलता ठरत असते.

बहुरंगी कोलकाता अनुभवत- बेलूर मठाचं वेगळेपण पाहून- हुगळी नदीमधून आगळा प्रवास करत आम्ही पैलतीरावर असलेल्या दक्षिणेश्वर मंदिराकडे निघालो होतो.
दक्षिणेश्वराबद्दल सारदादेवींच्या चरित्रात बरंच वाचलं होतं. रामकृष्ण परमहंस हे अनेक वर्षं दक्षिणेश्वर कालीमाता मंदिरात पौरोहित्य करत होते. त्यांना येणारे गूढ अनुभव, सारदामाता आणि त्यांचं जगावेगळं दांपत्यजीवन, त्या मंदिराजवळील खोलीतील त्यांचं वास्तव्य… असं बरंच… आपल्या मनातले असे रेंगाळणारे तरंग जेव्हा समोरच्या वास्तूच्या, स्थानाच्या लहरींमध्ये मिसळतात तेव्हा वेगळं काही जाणवतं…
यथावकाश आम्ही मंदिरासमोरच्या घाटाजवळ पोहोचलो. होडीतून उतरून घाटाच्या पायऱ्या चढून वर आलो. समोरच चित्रवत दिसणारे सुंदर मंदिर उभे होते. कालीदेवी- आद्यशक्ती, भवतारिणी कालीमाता मंदिर. एक शक्तिपीठ. 1855 मध्ये बांधलेले नवरत्न शैलीमधील नऊ शिखरांचे मुख्य मंदिर. चारी बाजूंनी विस्तृत प्रांगण. प्रांगणात शिवशंभोना समर्पित 12 मंदिरे, एक राधाकृष्ण मंदिर, काही खोल्या, अतिथीकक्ष, रामकृष्ण-सारदामाता यांनी वास्तव्य केलेली, व्यवस्थित जतन केलेली खोली असे सर्व पाहायला मिळते.

या दक्षिणेश्वर मंदिरामध्येच रामकृष्ण व विवेकानंदांची भेट झाली. इथेच रामकृष्णांनी विवेकानंदांना मार्गदर्शन केले. धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक सर्वच दृष्टींनी महत्त्वाचे हे स्थान. ते रेखीव मंदिर पाहताना मन प्रसन्न झाले.
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा उन्हाचा कडाका जाणवत होता. मंदिरात कालीमातेच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती. मोठी रांग होती. ते बघून आम्ही दर्शनासाठी जावे की नको अशा संभ्रमात होतो. आमच्या सश्रद्ध मैत्रिणीचं मात्र ‘जावंच’ असं मत पडलं. इतक्या लांब येऊन, एक शक्तिपीठ असलेल्या मंदिरातील कालीमातेचं दर्शन न घेता परतायचं हे काही तिच्या मनाला पटेना. चटचटत्या उन्हात, तापल्या फरशीवरून चटचट पाय उचलत ती लांबलचक रांगेत जाऊन उभी राहिली. आम्ही इतर दोघींनी दर्शनी पायऱ्यांजवळ जाऊन कळसाकडे व मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे पाहून हात जोडले आणि मनोभावे प्रार्थना केली. नंतर प्राकारातल्या शिवमंदिरांकडे वळलो. अगदी रेखीव, कातीव शिवलिंग असलेली ती बारा मंदिरं अगदी निवांतपणे बघितली. शांतपणे दर्शन घेतलं. सुंदर राधाकृष्ण मंदिर पाहिलं आणि रम्य परिसर न्याहाळत तिथे काही वेळ विसावलो.

कालीमातेचं दर्शन घेऊन समाधानानं निथळत मैत्रीण आली. तिनंही प्राकारातल्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ बसलो आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. आकाशाच्या पार्श्वभूमीवर समोर वाहणाऱ्या नदीसह मंदिर फार सुंदर दिसत होतं.
आपल्या देशात विविध ठिकाणची मंदिरं किती वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असतात! दक्षिणेकडे कलाकुसर, शिल्पं, गोपुरं आणि रेखीवता लक्ष वेधून घेते. हळेबीड बेलूरला गेल्यावेळी प्रदक्षिणा घालताना सभोवतालची एकेक भिंत पाहण्यासाठी एकेक दिवस कमी पडेल इतकी अप्रतिम शिल्पकला बघायला मिळाली. पाषाणात कोरलेलं ते अनोखं सौंदर्य त्या अनामिक कलाकारांसमोर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हायला लावत होतं. केरळमधील मंदिरांचा प्रशस्तपणा, भव्यता लक्षात राहून जाते. रामेश्वर, मीनाक्षी मंदिर ही अंतर्बाह्य सौंदर्य, भव्यता यामुळे लक्षात राहतात. वेरुळचं एका प्रचंड अखंड शिळेमधून कोरलेलं, वेगळ्या पद्धतीनं उभारलेलं मंदिर आणि परिसर हा तर एक थक्क करणारा अजूबाच! आपल्या गोव्यातली मंदिरं, तिथलं सौंदर्य, स्वच्छता, प्रसन्नता आणि रसिकता यामुळे मनोहर आणि मनोवेधक ठरतात; तर तांबडी सुर्लसारख्या निसर्गरम्य परिसरातलं प्राचीन मंदिर नयनरम्य परिसर, ऐतिहासिक महत्त्व, गाभाऱ्यातील संवेदना यामुळे वेगळ्या प्रकारे भावतं.

त्या-त्या देवतांबद्दलची श्रद्धा, ती जिथे स्थित आहेत त्यांचं स्थानमाहात्म्य, आराध्य दैवत, आश्वासक मूर्ती या सगळ्यांइतकंच कलात्मकता, स्थापत्य आणि अनुभवाला येणारी स्पंदनं महत्त्वाची! या सगळ्यामुळेच आपल्याला त्या-त्या ठिकाणी जाण्याचं आकर्षण आणि ओढ वाटते! आणि जेव्हा असा योग जुळून येतो तेव्हा ते आपल्या आयुष्यातले वेगळे क्षण ठरतात. असंच दक्षिणेश्वर कालीमंदिर… नऊ शिखरं, वेगळी स्थापत्यशैली, सुंदर परिसर, प्रशस्त प्राकार, प्राकारातील रेखीव मंदिरं या सर्वामुळे मनात रेंगाळत राहिलं.

आता आमची कोलकाता ट्रिप संपत आली होती; पण मनाच्या डायरीत कितीतरी नोंदी सहजसहज होत राहिल्या होत्या. प्रत्येक ट्रिपमध्ये अनेक प्रकारचे वेगळे क्षण नेहमीच गवसत असतात आणि ते मनात रेंगाळत राहतात. तसेच याही वेळी झाले. शांतिनिकेतनमधून निघण्याच्या दिवशी सकाळच्या प्रसन्न प्रहरी आमच्या सुंदर हॉटेलच्या बाहेरच्या सुरेख बागेमध्ये आमची मैत्रीण संगीता हिने बासरी वाजवली. जुनी मधाळ गाणी बासरीवर ऐकताना तिथल्या संमोहित करणाऱ्या वातावरणाचं आणि त्या सुरेल लहरींचं एकत्रित गारुड काही वेगळंच होतं!

शांतिनिकेतनमधलं गर्द राखाडी रंगाच्या भिंतींवर पांढऱ्याशुभ्र चित्राकृती असलेलं कलात्मक भवन. त्याबाहेर डेरेदार हिरवेगार वृक्ष. तिथे एक बकुळीचं झाड. खाली नाजूक फुलं पडलेली. प्राजक्तासारखा सडा नव्हे, इथं-तिथं विखुरलेली. मैत्रीण रेखाला राहवलं नाही. ती वेचत राहिली ती गंधफुलं. ती हलकेच ओंजळीत घेताना वाटलं, कदाचित रवींद्रांनी लावलेला असेल का हा बकुळवृक्ष? असेल किंवा नसेल, पण या परिसरात वावरणाऱ्या त्यांच्या पावलांशी बकुळफुलांची प्रेमळ ओंजळ या वृक्षाने नक्की वाहिली असेल. त्या मातीतलं ते अप्रूप जपून ठेवायचं! त्याच आवारातला पेंटिंग वर्कशॉप असावा तसा एक कक्ष. रंगांचा आविष्कार. विविध कलाकृती. बाहेरच्या कठड्यावर मोठ्या बोर्डच्या आकाराची काच ठेवून काही रंगवण्यात गुंगून गेलेला कलाकार, त्या काचबोर्डवर साकारत असलेलं कमळ, इतर काही पुष्पाकृती, सायकलवर- एका बोर्डवर- हाताने बनविलेले छोटे-छोटे सुंदर कानातले टॉप्स, झुमके अडकवून विक्री करणारी छोटी मुलगी, तिच्याशी झालेलं संभाषण, संगीत भवन, नृत्यभवनाबाहेरच्या प्रवेशद्वारांवरची चित्रं, शिल्पं, वाचनकक्षाजवळ पालथा पडून पुस्तक वाचणाऱ्या छोट्या मुलाचं गोड शिल्प… अजून ते अपूर्ण होतं, पण फिनिशिंग बाकी असलेली ती कलाकृती नैसर्गिक आणि फार गोड दिसत होती. जोरासांको इमारतीबाहेरच्या भागात असलेला रवींद्रनाथांचा, हातातले कागद वाचत असतानाचा रेखीव अर्धपुतळा… एखादं कोलाज असावं तसं हे सगळं मनःपटलावर साकारलं आणि रेंगाळत राहिलं.

शांतिनिकेतनमध्ये काही छोट्या-छोट्या कलात्मक वस्तूंची खरेदी केली तो आनंदही वेगळा. स्थानिक हस्तकलेचे नमुने असलेल्या काही भेटवस्तू, रवींद्रनाथांच्या कोरलेल्या प्रतिमा, चित्रे, त्या मुलीकडचे टॉप्स… असं काही काही.
आम्ही कोलकात्याला पोहोचलो त्याच दिवशी हॉटेलपासून अगदी जवळच असलेलं श्री लेदर्स हे मोठं शोरूम पाहिलं. तिथं स्थानिक बाजारपेठच असल्यामुळे साड्यांची, कपड्यांची खूप दुकानं होती. तिथं फार मनपसंत साड्या घेता आल्या. पहिलाच दिवस म्हणून थोडं मन आवरलं, पण बघायला छान वाटलं. नंतरच्या वास्तव्यात एका संध्याकाळी कोलकात्यातच राहणाऱ्या मैत्रिणीच्या नणंदेसोबत मुख्य बाजारात जाऊन मोठमोठ्या दुकानांमधून अनेक कोलकाता साड्या पाहिल्या, घेतल्या. दुकानांमध्ये आणि बाहेरील फुटपाथवरसुद्धा कितीतरी वैविध्य असलेल्या साड्या खरेदी-विक्रीची जी प्रचंड उलाढाल चालली होती, ती बघून विस्मित व्हायला झालं. साड्या आणि खरेदी हा महिलांचा वीक पॉइंट. तेही समाधानकारक झाल्याने खूश होतो.
एक दिवस ठिकठिकाणी लाल झगमगत्या साड्या नेसून, नटून-थटून झुंडीने वेगवेगळ्या वाहनांमधून निघालेल्या बायका दिसत होत्या. विचारल्यावर कळले की तो छटपूजेचा दिवस होता. त्यांचा उत्साह, विधिवत चाललेल्या पूजा, धुमधाम, जोरदार संगीत हे सर्व बघता-ऐकताना मजा वाटली. छोटे-छोटे आनंद निर्भेळपणे समरसून घेण्याचा तो सोहळा फार मजेदार आणि छान होता.

खास स्थानिक उपहारगृहामध्ये घेतलेलं बंगाली जेवण, मिष्टी दोही, सुप्रसिद्ध बंगाली मिठाई सोंदेश, रसना तृप्त करणारे मोठ्ठ्या आकारांचे स्वादिष्ट लुसलुशीत रसदार रोशगुल्ले (गुळाचे रसगुल्लेही उपलब्ध होते) या सर्वांचीही मस्त मजा घेतली. आणि कोलकात्याचं प्रसिद्ध लोकप्रिय स्ट्रीटफूड झालमुरी/झालमुडी- त्याची तर गंमतच न्यारी! झालमुरी… फार आकर्षक दिसत होती सगळी मांडणी. एक मोठा गोलाकार लाकडी किंवा पत्र्याचा ट्रे, त्यामध्ये वेगवेगळ्या पारदर्शक डब्यांमध्ये चुरमुरे, झालमुरीचा मसाला, मिरचीचे तुकडे, वाटलेली मिरची, कांदा, टोमॅटो, काकडी, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, उकडलेले हरभरे, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, फरसाण, बारीक शेव, काळे मीठ, मोहरीचे तेल, लिंबू, कोथिंबीर असे सर्व आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले. रसनेला आमंत्रण देणारे. थोडा भेळीसारखाच प्रकार पण थोडा वेगळाही. रस्त्यावरचं म्हणून आम्ही जरा मागेपुढे होत होतो. पण मैत्रीण संगीतानं ‘अरे हे तर अनुभवायलाच हवं’ म्हणत घेतलंही आणि मजा आली आस्वाद घेताना. बंगाल, ओरिसा, बिहारमध्ये ही झालमुरी लोकप्रिय आहेच; पण एक ब्रिटिश शेफ कोलकात्याची झालमुरी लंडनच्या स्ट्रीटवरसुद्धा घेऊन गेला. तिथेही ती लोकप्रिय झाली. आणि नंतर इतरही काही देशांमध्ये. हे समजलं तेव्हा गंमत वाटली.
कोलकात्याला सुभाषचंद्र बोस यांचं घर पाहता आलं नाही, ते राहून गेलं याची थोडी खंत वाटली. ‘फिर कभी’ असं मनाला सांगत या बहुरंगी शहराचा निरोप घेतला.

कोलकाता शहर त्यातल्या सर्व वैविध्यांसह आम्हाला आवडलं. ज्या बकालपणाबद्दल ऐकलं-वाचलं होतं, त्याचा अनुभव फारसा आला नाही. ज्या भागात आम्ही राहिलो होतो आणि ज्या ठिकाणांना भेटी दिल्या त्या भागात तरी आम्हाला शहर स्वागतशील, स्नेहल असं भेटलं. अर्थात ही खूप ओझरतीच भेट होती, पण आमच्यासाठी ती आनंदभेट ठरली.

एखादं ठिकाण बघायला जाणं यामागे प्रत्येकाचा काहीतरी विचार असतो. मनात काही कल्पना असतात, धूसर प्रतिमा असतात, चित्रं असतात. काही ऐकलेलं, वाचलेलं, चित्रांमधून पाहिलेलं असं कुठेतरी अंतर्मनात आपल्या नकळतही रेंगाळत असतं. या सर्वांसह आपण प्रत्येक अनुभव किती मनःपूर्वक घेतो यावरच त्या भेटीची सफलता ठरत असते. आम्ही या सफरीमधला प्रत्येक अनुभव खूप समरसून घेत होतो. त्यामुळे प्रत्येक दिवस आमच्यासाठी काहीतरी खास घेऊनच सामोरा येतोय असं वाटत होतं.

याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे हे अनुभव आपल्याला पुढे पुढे नेत असतात. आपल्याबरोबरचे सोबतीही यांना पुढे नेण्यात सहभागी असतात तेव्हा तर हे सर्व अधिक आनंददायी ठरतं. संगीताकडे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे (अशी दृष्टी ज्याची त्याच्याकडेच स्वाभाविकच असते). तिची जिज्ञासा, सगळे तपशील समजून घेणं, त्यातून होणारं आकलन, त्यावरचा स्वतःचा विचार आणि या सर्वांसह पुढे जात राहाणं… हे पाहणं हासुद्धा एक आनंद होता.
रेखाचं सहजपण, रसिकता, आनंद अनुभवणं, काळजी घेणं, समरस होणं यातला आनंद वेगळा होता. आणि अर्थातच मुक्त हसणं, गप्पा, फिरणं, ट्रिपचं आपलं आपणच केलेलं नियोजन, येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींमधून मार्ग काढणं हे सगळंही आनंद आणि विश्वास देणारं होतं.
अशा प्रवासात आपण एकमेकांच्या सोबतीनं, आणि आपला-आपलाच असाही एक वेगळा प्रवास नकळत करत असतो. प्रत्येक वेळी थोडे-थोडे नवे होत असतो. तोही प्रवास छान होता. एक पाऊल पुढे नेणारा होता!