विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका काय?

0
4

>> सोनिया गांधींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे विचारणा

केंद्र सरकारने या महिन्यात बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका काय असेल अशी विचारणा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आले, असा सवालही सोनिया गांधी यांनी केला.
संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका आधीच जारी केली जाते. मात्र संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका जारी न होण्याची ही पहिलीच वेळ असून ही दुर्दैवी बाब असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

मंगळवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर इंडिया आघाडीच्या पक्षांच्या खासदारांसोबत बैठक झाली. अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी, काँग्रेस संसदीय पक्षाचा गट इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाला होता. विरोधी पक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये सभागृहावर बहिष्कार घालणार नसून जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी विशेष अधिवेशनात पक्षाला कोणते मुद्दे मांडायचे आहेत याचाही उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात एकूण नऊ मुद्दे मांडलेले आहेत. विरोधकांनी मांडलेल्या या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. केवळ सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर चर्चा होऊ नये असे म्हटले आहे.

अधिवेशन 19 पासून नवीन संसद भवनात

केंद्र सरकारने 18 सप्टेंबरपासून बोलावलेले संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरपासून नव्या संसद भवनात होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून हाच मुहूर्त पाहून संसदेच्या नव्या वास्तूत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे. पहिल्या दिवशी संसदीय कामकाज सध्याच्या वास्तूत होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.