विदेशवारीत फसगत

0
3
  • धनंजय जोग

प्रवास हा मानवी आयुष्याचा भाग आहे. प्रत्येकजण आयुष्यात कुठेतरी प्रवास करतोच. प्रवासात चांगले-वाईट अनुभव येतात, जे बरेच काही शिकवून जातात. असाच अनुभव तक्रारदाराला आला. असा अनुभव इतरांनाही येऊ नये म्हणून हा लेख.

प्रवास हा मानवी आयुष्याचा भाग आहे. प्रत्येकजण आयुष्यात कुठेतरी प्रवास करतोच. प्रवासात चांगले-वाईट अनुभव येतात, जे बरेच काही शिकवून जातात. असाच अनुभव तक्रारदाराला आला. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीनुसार याचा अनुभव इतरांना येऊ नये म्हणून आजच्या लेखाचा हा प्रयास.
अमित कुमारची तक्रार विदेशयात्रा कंपनी- ‘इंटरनॅशनल टूर्स’ (नावे बदललेली) आणि त्यांचे गोव्यातील एजंट यांच्याविरुद्ध होती.

अमितने युरोपची 15 दिवसांची ‘पॅकेज ट्रिप’ बुक केली. वाईट अनुभव आला. तक्रारीत दौऱ्याच्या प्रत्येक दिवसातील ढिसाळ व्यवस्थापनाचे वर्णन आहे. पैसे खर्चूनसुद्धा ट्रिप मजेशीर नसून त्रासदायकच होती. टूर-मॅनेजरची बेजबाबदार वर्तणूक, वेळ-नियोजनाचा अभाव व त्यामुळे ठरवलेल्या जागांना जाणे शक्य न होणे यामुळे अमित व त्याच्या सहप्रवाशांना मनस्ताप झाला. प्रार्थनेत त्याने दिलेल्या रकमेचा (रु. 2 लाख) परतावा, लंडन येथे चार दिवस जास्त राहण्याचा खर्च आणि मानसिक त्रासाची भरपाई असे सगळे मिळून रु. 4 लाख मागितले.
‘इंटरनॅशनल’च्या मते तक्रार बनावट आहे. शिवाय गोव्यातील ग्राहक-मंचला यावर निर्णयाचा अधिकार नाही. कंपनी मुंबईत असल्यामुळे तिकडेच ही तक्रार करायला हवी होती. तक्रारीत फक्त थोट्या, अर्थहीन व काल्पनिक गोष्टी आहेत.
अमितने ट्रिपमधील प्रत्येक दिवसाच्या अडचणी वर्णन केल्या. त्यातील काही पुढीलप्रमाणे :
1) परतीचे तिकीट ठरवलेल्या दिवशी मिळत नाही हे ऐनवेळी सांगणे.
2) वेळेच्या आधी विमानतळावर पोचूनसुद्धा नेहमी विमानात शेवटच्या सिट्स मिळणे. कारण टूर-व्यवस्थापकांनी विमान कंपनीकडून स्वस्तातली तिकिटे घेतलेली.
3) फिरण्यासाठी ‘डिलक्स एअरकंडिशनर कोच’च्याऐवजी अस्वच्छ, नॉन-एसी बस; जिच्यात सिट्समधील अंतर कमी असल्यामुळे आरामात न टेकता सरळच बसावे लागले.
4) तिकीट शुल्कापेक्षा अतिरिक्त पैसे आकारणे- एका स्थळात 3.5 डॉलर्सऐवजी 15 डॉलर्स व ‘युरोस्टार’ या फ्रान्स ते इंग्लंड समुद्राखालून जाणाऱ्या ट्रेनचे तिकीट 69 डॉलर्स असताना 125 डॉलर्स घेणे.
5) नदीतील सफरीत बोटीमध्ये कमी सिट्स असल्यामुळे उभे राहावे लागणे,
प्रसिद्ध रेस्टॉरंटच्याऐवजी दोन किलोमीटर दूरच्या रेस्टॉरंटमध्ये नेणे, मॅनेजर व ड्रायव्हरना हे ठिकाण माहीत नसणे- सगळी वरात रात्रीची रेस्टॉरंट शोधतेय!
6) ठरलेल्या मोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये न उतरवता दूरच्या खेड्यात राहणे. मॅनेजर/ड्रायव्हरला स्थानिक भाषा व ‘रोड साईन्स’ न वाचता आल्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर हॉटेलला पोचण्यास तीन तास लागणे.
7) जर्मनीत ‘हाइडेलबर्ग’ला जाऊनसुद्धा तिकडचा प्रसिद्ध किल्ला न पाहणे.
8) झुरिच येथे तलावासमोरच्या हॉटेलमध्ये न उतरवता दूरच्या हॉटेलात राहणे.
9) मॅनेजर व ड्रायव्हरकडे हॉटेल शोधण्यासाठी नकाशा किंवा कोणतीही खूण नसणे.
10) पर्यटनस्थळांना आणि बाजारांमध्ये बंद होण्याच्या वेळेनंतर पोचणे.

वरील अडचणी पहिल्याच आठवड्यातल्या. दुसऱ्या आठवड्यातदेखील अशाच गैरसोयी झाल्या. या सगळ्या व्यवस्थापनातील त्रुटी दर्शवितात. ‘इंटरनॅशनल’ यांनी आपल्या परीने स्पष्टीकरणे दिली. आमची निरीक्षणे व निष्कर्ष असे-
1) अमितने कंपनीच्या मडगावस्थित एजंटकडे बुकिंग केले, त्याअर्थी तो इंटरनॅशनलचा ग्राहक झाला. व्यवहार गोव्यात झाल्यामुळे त्याला आमच्या आयोगासमोर तक्रार करायचा हक्क मिळाला. मुंबई आयोगातच ही तक्रार केली जाऊ शकते असे म्हणणे चुकीचे.
2) विमानात शेवटच्या सिट्स मिळणे यात ‘इंटरनॅशनल’चा दोष नाही. चांगल्या सिट्स मिळवल्या तर तशी प्रसिद्धी होऊन ‘इंटरनॅशनल’चाच फायदा होईल. पण हे त्यांनीच ठरवावे. अमितला पाहिजे त्या दिवशी परतीचे तिकीट न मिळणे यातसुद्धा त्यांचा दोष नाही. हे 15 दिवस आधीच कळविले होते.
3) ‘कनेक्टिंग- पुढच्या फ्लाईट्स’मध्ये कमी वेळ असणे- छापील कार्यक्रमात या वेळा होत्या. एखाद्या फ्लाईटला उशीर झाला तर दुसऱ्या फ्लाईटसाठी धावपळ करावी लागते. विमानप्रवासात असे होतेच.
4) रेल्वेस्टेशनला तासभर आधी घेऊन जाणे यात कंपनीचे कारण ग्राह्य आहे. वाहतूक-कोंडी केव्हा होईल सांगता येत नाही. ट्रेन चुकवायची नसली तर वेळेआधी स्टेशनला पोचावेच.
5) तिकीट-शुल्क जास्त आकारण्याविषयी कंपनी म्हणते की, बसभाडे, पार्किंग फी असे वरखर्च असतात. ते भरून काढण्यासाठी जास्त पैसे घेतले. पण 3.5 च्या ऐवजी 15 व 69 च्या ऐवजी 125 डॉलर्स अति झाले. मॅनेजर व ड्रायव्हरना हॉटेल्स शोधावे लागणे, ‘रोड साईन्स’ न वाचता येणे, मॅनेजरचा उद्धटपणा या बाबतीत टूर-व्यवस्थापनातील अंदाधुंदी दर्शवतात. पण हा गुन्हा नाही. हाच मॅनेजर चार वर्षे यशस्वीरीत्या टूर्स आयोजित करतो हे विश्वसनीय नाही. असे असते तर या तक्रारीनंतर मॅनेजरला परत का बोलावले?
6) यातील प्रत्येक गोष्ट मुळात किरकोळ आहे. पण सगळ्या एकत्रीतपणे पहिल्या तर एक अकुशल, अव्यावसायिक आणि बेजबाबदाररीत्या आयोजिलेली टूर दिसून येते.
अमितच्या दोन सहप्रवाशांनी या तक्रारींना पत्रांद्वारे पुष्टी दिली. कंपनीचे म्हणणे : सुरुवातीला ॲमस्टरडॅम येथील बस उच्च दर्जाची होती- पण प्रवाशांनी हट्ट केल्यामुळे चार दिवसात बदलली हे पटत नाही! खरीच जर ‘डिलक्स एअरकंडिशनन्ड कोच’ असती तर युरोपच्या चांगल्या हवेत सुंदर स्थळे पाहण्याच्या छोट्याशा कालावधीतला एक संपूर्ण दिवस प्रवाशांनी भांडणात वाया घालविला नसता.

कंपनी किंवा मॅनेजरने पैसे वाचवून स्वतःचे खिसे भरले. ‘हेग’ आणि ‘नीस’सारख्या शहरातील हॉटेल्सऐवजी ‘ग्रास’ व ‘एपे’ या दूरच्या छोट्या गावातील हॉटेल्स करणे हे याचे उदाहरण. या बदलामुळे येण्या-जाण्यात तीन तास वाया गेले. शहरातील हॉटेल्स गावातल्यापेक्षा महाग असतात. हा फरक प्रवाशांना परत केला गेला का? नाही! या बदलांसाठी दिलेली कारणे- फ्लॉवर शो, फुटबॉल मॅच व चित्रपट महोत्सव. हे अचानक उद्भवलेले प्रसंग नव्हते. कंपनीने जेव्हा अमित व इतरांना हॉटेल्सची नावे दिली तेव्हा वरील कार्यक्रम/उत्सव नक्कीच जाहीर झालेले असणार.

सांगितलेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये न नेता दोन तासावरच्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये नेणे यातसुद्धा पैसे वाचवले गेले. हे दूरचे रेस्टॉरंट अस्वच्छ होते आणि त्यात स्वतःमध्येच वाट्या असलेल्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये जेवावे लागले.
हाइडेलबर्ग किल्ला हा तेथील मुख्य आकर्षण. त्याठिकाणी जाऊन किल्ला न बघणे म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न पाहण्यासारखे! मॅनेजरने जे कारण दिले (किल्ल्याच्या व्यवस्थापनाला फॅक्स पाठवला पण उत्तर आले नाही) ते निखालस खोटे! किल्ल्याच्या दाराशी प्रवेशतिकीट खरेदी करून कोणालाही आत जाता येते. लेखकाने स्वतः तेथील एखाद्या खोलीएवढे अवाढव्य वाइनचे लाकडी पिंप पाहून बुटक्याची कथा ऐकली आहे.
वरील निष्कर्ष टूर-व्यवस्थापनातील त्रुटी दाखवतात. पण संपूर्ण खर्च- परतीचा दावा मान्य करावा का? वायद्याप्रमाणे ही ‘आरामशीर/आनंददायक’ टूर नक्कीच नव्हती. गैरसोयी सहन कराव्या लागल्या. पण विमानप्रवास आणि बसमधून फिरणे जरूर झाले.

मध्यमवर्गीय आयुष्यात एकदाच परदेशी जातो. जाऊन आल्यावर मित्रांना वर्णन रंगवून सांगतो. पु.लं.सारखे लेखन असतील तर प्रवासवर्णन लिहितात. प्लास्टिक प्लेट्समध्ये (ज्या आजकाल रेल्वेनेसुद्धा बंद केल्या आहेत), अस्वच्छ रेस्टॉरंटमध्ये जेवावे लागल्यास मग परदेशी जावेच कशाला? मॅनेजर हा परदेशातील आपला मित्र व मार्गदर्शक असावा. हा जर उद्धट असेल तर कंपनीने स्वतःच्या हितासाठी तरी बदलावा. अशा टूर्सचे आयोजन हे ‘आदरातिथ्य’ या उद्योगातले. अशा व्यक्तीला या उद्योगात स्थान नाही.
आम्ही तक्रार ग्राह्य मानली. टूरमधील त्रुटी व मॅनेजरचा खोटेपणा स्पष्ट आहेच. अमितने भरलेल्या पैशातला हिस्सा, भरपाई व खर्च मिळून इंटरनॅशनलने रु. 2 लाख द्यावेत असा आदेश दिला.
एखाद्या वाचकाला या प्रकरणाविषयी किंवा ग्राहक कायद्यासंबंधी प्रश्न असल्यास मी थोडक्यात उत्तर देऊ शकेन. त्यासाठी ई-मेल- वरपक्षेसऽूरहेे.लेा
(24 निवाडे असलेले, या लेखकाने संकलित केलेले इंग्रजीतील पुस्तक एम. जी. रोड, पणजी येथील गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये रु. 350 ला उपलब्ध आहे. आयोगाचे काम समजण्यास इच्छुक ग्राहकांनी जरूर वाचावे.)