विजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार : मुख्यमंत्री

0
4

>> घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी इशारा

नगरनियोजन खात्यात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे फातोर्डाचे आमदार व नगरनियोजन खात्याचे माजी मंत्री विजय सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचाही हात असल्याचा आरोप करणारे विजय सरदेसाई हे नगरनियोजन खात्याचे माजी मंत्री असून नगरनियोजन खात्याच्या फाईल्स कधीही मुख्यमंत्र्यांकडे येत नाहीत हे सरदेसाई यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे त्यांनी या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचाही हात आहे, असे म्हणणे हे चुकीचे आहे, असे काल मुख्यमंत्री म्हणाले. सरदेसाई हे कोणत्याही पुराव्यांशिवाय नगरनियोजन खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप करत असल्याचे सांगून आपण या प्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून न्यायालयात खेचणार असल्याचे सावंत यांनी काल स्पष्ट केले.

सरदेसाई यांनी एका पत्रकार परिषदेत यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात नगर आणि नियोजन खात्यात १६ (ब) अंतर्गत जमिनीची मोठी रूपांतरे करण्यात आली होती. आणि या विभाग बदल्यासाठी जमीन मालकांकडून तत्कालीन नगरनियोजनमंत्र्यांनी कोट्यवधी रूपये घेतले होते. या घोटाळ्यात डॉ. सावंत यांचाही हात होता, असा आरोप केला होता.
मुख्यमंत्री सावंत यांनी हा आरोप खोटा असल्याचे काल स्पष्ट केले.