गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नोकर्यांबाबत केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी काल दिले.
मोपा विमानतळावर केवळ ८ टक्के गोमंतकीयांना नोकर्या देण्यात आल्या असून, बिगर गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात नोकर्या दिल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी शनिवारी केला होता.
गोव्यातील नागरिकांनी विजय सरदेसाई यांनी मोपा विमानतळावरील नोकर्यांबाबत केलेले विधान गंभीरपणे घेऊ नये. सरदेसाई यांनी मोपा विमानतळाला पूर्वी विरोध केला होता. भाजप नेत्यांच्या दूरदृष्टीपणामुळे मोपा विमानतळाचे काम मार्गी लागले आहे. मोपा विमानतळाच्या बांधकामासाठी सध्या ५१९८ कामगार कार्यरत आहेत. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे कामगार निघून जातील. विमानतळासाठी दीर्घकालीन आवश्यक कर्मचारी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विमानतळासाठी आवश्यक विविध कर्मचारी नियुक्तीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत, असेही वेर्णेकर यांनी सांगितले.