विचार-नवनीतासाठी समुद्रमंथन

0
127

सुरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह – २०१४
– जनार्दन वेर्लेकर
गायन-वादनाची मैङ्गल ऐन रंगात आलेली असताना कलाकार अशी एखादी अनपेक्षित हरकत -जागा घेतो तेव्हा रसिकांची कळी खुलते आणि तो उत्स्फूर्तपणे उद्गारतो – क्या बात है| आपल्या अदाकारीतून – बोलण्यातून नव्हे कलाकार अशी बात पैदा करीत असतो. अभिषेकीबुवा म्हणायचे – गायकाने ङ्गार बोलू नये. जे काय सांगायचे-मांडायचे ते आपल्या स्वरसंवादातून! आपल्या गायकीतून असा गुढगंभीर समा बांधणारे, माहोल पैदा करणारे गायक होते उस्ताद अमिर खॉंसाहेब. गोवा कला अकादमीला चौतिसाव्या सुरश्री केसरबाई केरकर स्मृती समारोहाच्या निमित्ताने उस्ताद अमिर खॉं यांच्या गायनातील सौंदर्यबोध घ्यावासा वाटला आणि त्यासाठी पं. सत्यशील देशपांडे यांना खास निमंत्रित करण्यात आले. यंदाच्या संगीत समारोहाच्या पूर्वसंध्येला सत्यशीलजींनी आम्हा रसिकांना त्यांच्या या सौंदर्यशोधात सहभागी केले. या गद्यमैङ्गलीला त्यांनीच दुर्मिळ ध्वनीङ्गीती, गायनाचे प्रात्यक्षिक आणि दृकश्राव्य माध्यमाची जोड दिली. परिणामी सुङ्गी संत परंपरेतील एखादा अवलिया गायक परमकारूणिक अल्ला-ईश्‍वराशी एकरूप होत आहे – त्याची आळवणी करीत आहे असा सरभाव या मैङ्गलीत संचारला आणि तो उत्तरोत्तर गडद-गहिरा होत गेला. सत्यशीलजींच्या शब्दांत तो व्यक्त झाला तो असा –त्यांची गायकीच मुळी स्वत:च्या आनंदासाठी, आत्मशोधासाठी होती. या स्वर नव्हे आत्मसंवादांत त्यांची तंद्री लागायची. समोरच्या रसिकांसाठी त्यांचे गाणे नसायचे. आणि त्यांच्या या वेगळेपणामुळेच त्यांचे गाणे रसिकांना भावायचे. शांत, संथ, धीमी आलापी, विलंबित लयींतील ख्यालबढत आणि आक्रमक त्याहून अधिक आर्जवी तानक्रीया या शैलीविशेषांमुळे त्यांच्या एकूण गाण्याला एक प्रकारे भारदस्त – खरे तर आध्यात्मिक बैठकच प्राप्त व्हायची. त्यांचे गाणे बेतलेले, नेहमीच्या पठडीतले कधीच वाटायचे नाही. समर्पण हा त्यांच्या गाण्याचा स्थायीभाव वाटायचा. किराणा घराण्याच्या गायकीचा त्यांच्यावर असर नक्कीच होता. किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खॉं तसेच भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं यांचे संस्कारही त्यांच्या गायकीवर होते. मात्र, सवाई गंधर्वांचे शिष्य भीमसेनजी, गंगुबाई हनगल, ङ्गिरोझ दस्तुर, तसेच हिराबाई बडोदेकर, सुरेशबाबु माने यांच्या गायकीहून त्यांची शैली अलग, अनोखी होती. झनक झनक पायल बाजे, बैजु बावरा अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. डी. व्ही. पलुस्करांचे गाणे रसाळ, प्रासादिक, आकृतीबद्ध तर अमिरखॉं साहेबांचे गाणे मुक्तचिंतनात्मक, आवेगी त्यामुळे अनपेक्षित. हा वेगळेपणा दोघांच्याही गायनातून जाणवणारा. म्हणून तर एकदा भीमसेनजींना त्यांच्या चाहत्यांनी ‘आम्हांला अमिरखॉं साहेबांचे गाणे आवडत नाही – तुमचे बेहद्द आवडते’ असे सांगितल्यावर भीमसेनजींनी त्यांच्या चाहत्यांना सुनावले होते ‘‘ठीक आहे. मग तुम्ही माझेच गाणे ऐका. मी मात्र अमिर खॉंसाहेबांचेच गाणे ऐकणार.’’ मारवा, मालकंस, ललत, आसावरी, तोडी असे भारदस्त राग अमिर खॉं यांच्या ठेवणीतले. आपल्या प्रतिपादनाच्या ओघांत ध्वनीमुद्रीत संगीताची झलक रसिकांना ऐकवल्यामुळे ही शब्दस्वरयात्रा निखळ आनंददायी झाली. संवादिनीवर स्वत: सत्यशीलजी, तबल्यावर दयानंद कांदोळकर तर दृकश्राव्य उदाहरणांसाठी सत्यशीलजींचे सुपुत्र सृजन यांनी अडीचहून अधिक तास चाललेल्या या कार्यक्रमाची जबाबदारी चोख निभावली.
‘ख्यालगायकींतील परंपरा आणि नवता’ हा दुसर्‍या दिवशी सकाळी रंगलेल्या परिसंवादाचा विषय होता आणि पं. सुरेश तळवलकर, पं. विकास कशाळकर, पं. सत्यशील देशपांडे ही अधिकारी मंडळी श्रोत्यांशी संवाद साधायला उत्सुक होती. श्रोत्यांमध्ये पं. उल्हास कशाळकर, पं. प्रसाद सावकार, पं. कमलाकर नाईक, डॉ. सुधांशु कुलकर्णी, उस्ताद छोटे रहमतखॉं, शशांक मक्तेदार अशी मान्यवर मंडळी होती. मुंबईचे केशव परांजपे हे संगीत समीक्षक या परिसंवादाचे संयोजक आणि संचालक होते. दोन्ही कार्यक्रमांना संगीत विद्यार्थी, संगीत शिक्षक यांची भरपूरA – केशव परांजपे यांच्याच शब्दांत सांगायचे तर दृष्ट लागण्यासारखी उपस्थिती होती.
परिसंवादांत सहभागी झालेल्या चारही मान्यवरांनी आपल्या सखोल व्यासंगाचा, ज्ञानाचा परिसस्पर्श या परिसंवादाला दिला आणि आम्हा उपस्थित जिज्ञासुंच्या शंकांचे निरसन-निराकरण केलं. व्यक्तिश: पं. सुरेश तळवलकर यांच्या निर्वैर, निरअहंकारी आणि प्रांजळ मुक्तचिंतनाने मी अंतर्मुख झालो त्याहून अधिक भारावलो. ‘विद्या विनयेन शोभते’ हा दुर्लभ, दुर्मिळ आदर्श यांच्या रूपाने या परिसंवादित जणु मूर्तिमंत सगुण साकार झाला. निरंतर मनन-चिंतन करावे असे त्यांचे बोल (त्यांच्या तबल्याच्या अनिर्वचनीय बोलांसारखेच) हे लिहिताना शक्यतो त्यांच्याच शब्दांत माझ्या मनात गुंजत आहेत.
‘‘परस्परांबद्दल टोकाचे मतभेद होते. आणि ते जगजाहीर होते. या मतभेदामुळे दोघांच्या मोठेपणाला, त्यांच्या सांगीतिक कर्तृत्वाला बाधा येत नाही. म्हणून मतभेदांचा बाऊ करणे, तो विषय चघळणे मला मान्य नाही. संगीत साधक म्हणून गुणांची पूजा बांधणे, अवगुणांची कास सोडणे, दृष्टी विशाल, व्यापक करणे हे आपले काम. माझा भर आता उीेीी एर्वीलरींळेप – क्रॉस शिक्षणावर आहे. एवढी वर्षे संगीतविश्‍वात एक साधक-विद्यार्थी म्हणून वावरल्यावर मला उमजले आहे की माझे ईप्सित साध्य झालेलं नाही. अजूनही ते दृष्टीपथात नाही. जमेल तेवढे मी केले. आता माझी भिस्त आहे ती माझ्या विद्यार्थ्यांवर. मला जे जमले नाही ते त्यांनी करून दाखवावे हे माझे स्वप्न आहे. माझी क्रॉस शिक्षणाची आस्था ती ही. ती माझ्या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्याचा माझा प्रयत्न असतो-आहे.’’
तंत्र-शास्त्र-विद्या-कला या ख्यालच नव्हे तर अन्य संगीतप्रकारांवर प्रभुत्व मिळवण्याच्या पायर्‍या आहेत. शिक्षक आणि गुरू यांच्यामध्ये मोठा ङ्गरक आहे. माहिती देतो तो शिक्षक. संस्कार करतो तो गुरू. तंत्र-शास्त्र-विद्या एकवेळ आत्मसात करता येतात. कलेचं तसं नाही. कला दैवी देणगीच म्हणतां येईल. कलेच्या त्या क्षितिजाला गवसणी घालणे महाकर्म कठीण. गुरूनिष्ठा आणि संस्कारांतून ती तुमच्यावर प्रसन्न झाली तर तुम्ही भाग्यवान.
पं. सुरेश तळवलकर यांच्या या प्रतिपादनाला उस्ताद अल्लादिया खॉंसाहेब विरूद्ध उस्ताद रजनअलीखॉं तसेच उस्ताद अमिर खॉं विरूद्ध पं. कुमार गंधर्व यांच्यामधील तीव्र मतभेदांची किनार होती जी या परिसंवादाच्या वाटचालीतच उमटली होती. संगीतजगतांतील विरोधी भक्तीचेच तर हे प्रकार नव्हेत? पं. सत्यशील देशपांडे यांनी घराण्यांच्या बंदिस्त चौकटी, एकमेकांचे उणेदुणे काढणे आदींची आपल्या प्रतिपादनाच्या ओघांत वाच्यता केली खरी; मात्र त्यांनीही आपल्या तिरकस, बोचर्‍या शैलीत किशोरीताई आमोणकर, पं. बबनराव हळदणकर, डॉ. अशोक दामोदर रानडे, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यावर अकारण शेरेबाजी टिका केली. विचारमंथनाच्या दर्जाशी माझ्या मते ती अनावश्यक होती. त्यांचा किंचित संयम सुटला. त्यामुळेच पं. तळवलकरांच्या प्रतिपादनाला अधिक धार तर आलीच. शिवाय तिचे मोल वाढले. ती अनुकरणीय वाटली.
डॉ. विकास कशाळकर आणि केशव परांजपे यांनी संयमी वृत्तीने केलेले अभिनिवेशरहीत प्रतिपादन मनाला भावले. पं. गजाननबुवा जोशी – पं. कुमार गंधर्व यांच्या संदर्भांतील विकासजींचे भाष्य तसेच धोडुताई कुलकर्णी – किशोरीताई आमोणकर यांच्या संदर्भांतील केशव परांजपे यांचे ‘आकलन’ त्यांनी मोठ्यांचा आब राखून सौम्य भाषेत मांडले. मला त्यांचे कौतुक वाटले. संयम हा जर कलेचा गुण-अलंकार असेल तर वक्तृत्व कलेलाही तो तेवढाच गुणालंकृत करीत असावा.
ख्याल म्हणजे विचार. मला कल्पनाविलास हा शब्द अधिक समर्पक वाटतो. परिसंवादांत सहभागी झालेल्या गुणीजनांना मला आजकाल सतावणारा एक प्रश्‍न विचारायचा होता. कळत नकळत आताशा ख्यालगायनाची स्पेस (अवकाश) आक्रसत चालली आहे का? एक ते सव्वा तासाच्या अवधीत (सध्याची एकल मैङ्गलींची कमाल कालमर्यादा) ख्याल, ठुमरी, नाट्यगीत, भजन हे प्रकार कोंबायचे आणि श्रोत्यांनी तशी अपेक्षाही बाळगायची तर मग ख्यालगायनाला -कल्पनाविलासाला कितीसा वाव आणि न्याय? गुणीजनांची परवानगी मागून मला हा प्रश्‍न विचारायचा होता. पण शेवटी संयम बाळगणेच मी पसंत केले. इंग्रजीत एक म्हण आहे – ‘जिथे देवदूत पाय ठेवायला कचरतात तिथे मुर्ख सहज प्रवेश करायला धजावतो.’ माझ्या प्रश्‍नाला वाचा ङ्गुटायची नव्हती एवढं खरं.
ख्यालगायनातील परंपरा आणि नवतेचा हा शोध तसा न संपणारा. आणि माझ्या या लेखाच्या मर्यादेत नमावणारा, सामावणारा. एक प्रकारच्या निर्मळ कुतूहलाने, उत्सुकतेने या नादसमुद्रमंथनाला मी हजेरी लावली. दोन्ही कार्यक्रमांनी माझ्या संगीतविषयक आकलनात भर टाकली. या अमृतमंथनातून माझ्या अल्पमतीने मला गवसलेले हे विचार नवनीत. प्रसाद म्हणून सर्वांना ते वाटावे यासाठी हा लेखनप्रपंच!