वास्कोत पतीकडून पत्नीचा खून

0
4

कौटुंबिक वाद आणि भांडणातून शांतीनगर-नवेवाडे, वास्को येथे काल पतीने आपल्या पत्नीचा राहत्या घरातच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. चाळोबा केसरकर याने पत्नी वैशाली हिच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार करून तिचा खून केला. शेजाऱ्यांकडून या घटनेबाबत माहिती मिळताच वास्को पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चाळोबा याला घटनास्थळावरून अटक केली.

शांतीनगर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरात चाळोबा केसरकर आणि वैशाली चाळोबा केसरकर हे दांपत्य राहत होते. वैशालीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांपासून चाळोबा हा तिचा छळ करत होता. काल दुपारी 1.30 च्या दरम्यान चाळोबा याने वैशालीच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केले. वैशालीला घरात मारहाण झाल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळताच, त्यांनी जवळच राहत असलेल्या तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. यानंतर तिचे वडील वसंत साळस्कर यांनी त्वरित आपल्या मुलीच्या घराकडे धाव घेतली. चाळोबा याने त्यांना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी जावयाला बाजूला ढकलून ते आत शिरले. यावेळी त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. वैशालीचा खून झाल्याचे उघडकीस येताच आजूबाजूच्या लोकांनी वास्को पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलीस निरीक्षक कपिल नायक, उपनिरीक्षक रोहन नागेशकर व इतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आपल्या पत्नीचा खून करून चाळोबा हा घरातच बसून होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात पाठवून दिला. त्यानंतर चाळोबाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

वैशालीचे वडील वसंत साळस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून खटके उडत होते. चाळोबा हा वैशालीला मारहाण करत होता. मागील काही दिवसांत त्यांच्यात जास्तच खटके उडत होते. काल दुपारी पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडणे झाले आणि त्यानंतर चाळोबाने वैशालीचा खून केला. दरम्यान, या दांपत्याला एक 17 वर्षांचा मुलगा असून, यंदाच तो दहावीत उत्तीर्ण झाला आहे.