वाळूचे वादळ

0
16

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पक्षाच्या हातातील राजस्थानसारखे उरलेसुरले महत्त्वाचे राज्यही भारतीय जनता पक्षाच्या घशात घालणार का अशी परिस्थिती आता निर्माण झालेली दिसते. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक आणि उत्सुक असलेले, परंतु त्याचबरोबर आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्चीही सोडू न इच्छिणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या तब्बल ९२ पाठीराख्या आमदारांनी गेहलोत यांच्या समर्थनार्थ राजीनामास्त्रे बाहेर काढून आपल्या पक्षश्रेष्ठींची कोंडी केली आहे. गेहलोत यांना कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी पक्षाच्या ‘एक व्यक्ती एक पद’ ह्या धोरणानुसार मुख्यमंत्रिपद सोडायला हवे असे सूचित करणार्‍या आणि गेहलोत यांच्या जागी आपले तरुण मित्र सचिन पायलट यांना आणू पाहणार्‍या राहुल गांधी यांच्यासाठी देखील हा राजस्थानच्या बहुसंख्य कॉंग्रेस आमदारांनी दिलेला मोठा तडाखा आहे. ज्याने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या हट्टापायी पक्षाचे सरकार स्थापन करण्यात अडथळा आणला, त्याला आता मुख्यमंत्रिपद का द्यायचे असा ह्या आमदारांचा बिनतोड सवाल आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असलेल्या गेहलोत यांना निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदावरून उतरविण्याची अनावश्यक घाई कॉंग्रेस श्रेष्ठींकडून चालली होती. त्यासाठीच केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत राज्य विधिमंडळ गटनेतेपदाची बैठकही रविवारी बोलावली गेली. परंतु दोनवेळा बैठक बोलावूनही कॉंग्रेसचे गेहलोत समर्थक आमदार तेथे फिरकलेच नाहीत. ते सर्व गेहलोत समर्थक मंत्री शांतिकुमार धारिवाल यांच्या घरी गोळा झाले आणि सभापती सी. पी. जोशींकडे राजीनामे घेऊन रातोरात निघाले. गेहलोत यांनी अप्रत्यक्षपणे घडविलेले हे शक्तिप्रदर्शन कॉंग्रेस पक्षाला मोठ्या अडचणीत आणणारे आहे. राजस्थानातील ह्या घडामोडींनी कॉंग्रेस नेतृत्वाला पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे.
गेहलोत हे जरी कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असले तरी ते सुखासुखी सचिन पायलट यांना आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देणार नाहीत असे कालच्याच अग्रलेखात लिहिले होते. त्याची शाई वाळायच्या आधीच गेहलोत समर्थकांनी पायलटांची पाठराखण जरी राहुल गांधींनी चालवली तरी ती खपवून घेतली जाणार नाही हाच प्रखर इशारा गेल्या दोन दिवसांतील घडामोडींद्वारे दिला आहे. राहुल यांनी उदयपूर चिंतन शिबिरातील ठरावाची आठवण करून दिल्यानंतर गेहलोत स्वस्थ बसतील असे भासत होते, ते सपशेल खोटे ठरले आहे. वरवर त्यांनी जरी पक्षशिस्तीचा आव आणला, तरी मुळात व्यावसायिक जादुगाराच्या घराण्यातील असलेल्या गेहलोतांनी अशी काही जादूची कांडी फिरवली की कॉंग्रेस श्रेष्ठींची दाणादाण उडाली आहे. पूर्वी मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या सचिन पायलटांचे बंड पस्तीस दिवसांनी मोडून काढून गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदावरील आपली मांड पक्की केलेली आहे. एखाद्या राज्यातील अशा स्थिरस्थावर झालेल्या मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या तोंडावर हटवणे किती महाग पडू शकते हे पंजाबात कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या हकालपट्टीतून कॉंग्रेस शिकलेली नाही ह्याचे आश्चर्य वाटते. अमरिंदरसिंग यांना पदावरून काढले गेले आणि पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने ते राज्य गमावले. राजस्थान हे एकमेव महत्त्वाचे मोठे राज्य आज कॉंग्रेसपाशी आहे. मध्यप्रदेशातील कमलनाथ यांचे सरकार भाजपने ऑपरेशन लोटसद्वारे पाडले, तरी गेहलोत यांनी जिद्दीने आजवर आपले सरकार टिकवले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून उतरविण्याचा चाललेला प्रयत्न कॉंग्रेसच्याच पायांवर कुर्‍हाड घालणारा ठरू शकतो. हे पद जात असेल तरी ते सचिन पायलट यांच्याकडे जाऊ न देता गोविंदसिंग धोतसरा यांच्यासारख्या आपल्या समर्थकाकडे जावे अशी रणनीती गेहलोत अवलंबितील.
पक्षश्रेष्ठींचा फजितवडा करणार्‍या गेहलोत यांना कॉंग्रेस पक्षनेतृत्व धडा शिकवू पाहील असे आता दिसते, कारण या बंडातून राहुल यांची मानहानी झाली आहे. मुळात त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची उमेदवारी हे राहुल यांच्या नेतृत्वाला दिलेले आव्हान असाही त्याचा अर्थ घेतला गेला आहे. राहुल यांची अध्यक्षपद स्वीकारायची तयारी असेल तर आपण लढणार नाही असे गेहलोत यांनी जरी वारंवार सांगितले असले, तरी त्यांच्यामुळे राहुल यांच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण झाल्याचे दिसत असल्याने पक्षश्रेष्ठींच्या ते पचनी पडलेले नाही. शशी थरूर विरुद्ध गेहलोत असा सामना झाल्यास गेहलोत सहज जिंकतील असे दिसत असल्याने आता गेहलोत यांचा गेम करण्यासाठी एखाद्या तिसर्‍या उमेदवाराला निवडणुकीत उतरवले जाणार का हे पाहावे लागेल.