वायंगण

0
19
  • – विघ्नेश शिरगुरकर

भाग- ४

आबांनी सरळ आणि स्पष्ट शब्दांत भागेल्यांना सांगितलं की पुढच्या वर्षीपासून तुम्ही शेत करू नका. कोणतीही तडजोड झाली नाही. कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत. आणि शेकडो वर्षांपासून अविरतपणे चालू असलेलं शेत २००४ साली बंद पडलं जे आजतागायत परत चालू झालं नाही…

खळ्याच्या वरच्या बाजूला एक भलंमोठं रसाळ जातीच्या ङ्गणसाचं झाड आजही डौलानं उभं आहे. हे झाड एकेकाळी शेतात येणार्‍या बैलजोड्यांचं हक्काचं विश्रांतीस्थान होतं. जमिनीत लोखंडी सळई खोलवर पुरून, त्या सळईच्या वाकवलेल्या आकड्यात सगळे भागेली बैलांना दावणीला बांधून ठेवायचे. एकदा एका भागेलीच्या बैलाच्या पायाला कसलातरी विकार झाला होता आणि दोनतीन भागेली मिळून त्या बैलाला जमिनीवर आडवा झोपवायचा प्रयत्न करत होते. विकार झालेला भाग त्यांनी धारदार ब्लेडने जसा कापून काढला, तसं त्या बैलाच्या पायातून भळाभळा रक्त वाहू लागलं. लगोलग त्यांनी पाण्याने जखम धुवून त्यावर हळदपुड लावली व बारीक वाटून आणलेला कसलातरी पाला त्यावर लावून जखम ङ्गाळीने बांधली.
भागेली सन २००१ पासून शेत करायला आढेवेढे घेत होते. काही भागेली नियमित दरवर्षी यायचे, तर काही भागेली आलटून-पालटून यायचे. जर का एक वर्ष एक भागेली आला नाही तर दुसर्‍या वर्षी दुसरा दडून बसायचा.

वायंगणी शेत करणं हे तसं कष्टाचं काम. दसर्‍यानंतर बांधाची घालायची तयारी करून बांधापासून शेताच्या टोकापर्यंत पाट स्वच्छ करा, दिवाळीनंतर बेणणी करा, जोतं घेऊन या, नांगरणी करा, रोप लावा, शेण घाला, खत घाला, लावणी, खुरपणी, कापणी, मळणी, वारं, भात पोत्यात भरणं आणि शेवटी ते आबांच्या देखरेखीखाली टेम्पोत भरून बाजारात नेणे यात सात ते आठ महिने कसे सरले हे कळतदेखील नव्हतं. टेम्पो शेतातून वर येणं हे मोठं दिव्य असायचं. टेम्पो म्हणजे आयशर कंपनीचा कँटर हे मालवाहू वाहन. आमच्या लहानपणी मोठ्या चारचाकी किंवा सहाचाकी मालवाहू गाड्यांना टेम्पो म्हणायचे. त्यामागे काहीतरी पाश्चात्त्य नाममाहात्म्य आहे हे नक्की. तर असा हा टेम्पो सगळे भागेली, आबा आणि इतर मंडळी शेतातून वर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. चिखल झालाय तिथं सावळ घाल, दगड घाल, चिरे टाक, माती टाक आणि कसातरी तो टेम्पो शेतातून वर आणत. कधीकधी मीदेखील हे काम करायचो. एवढुशा जीवाचा म्हणून काय तो जोर लागणार! ते लोक एकामेकाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऐस्सा’ की ‘हयस्सा’ असा हाकारा करायचे! अन् असं म्हटल्यावर कुणीतरी मध्येच कृष्णाआपाला चिडवण्यासाठी ‘नालायक कृष्णा’ असा हाकारा करायचे. ‘हयस्सा’ किंवा ‘ऐस्सा’ म्हटलं की लगेच हे शब्द उच्चारले जायचे आणि ते थोडे तालात बसायचे. तर, हे सगळे भगीरथ प्रयत्न करून टेम्पो शेतातून बाहेर यायचा अन् भात गिरणीपर्यंत पोहोचायचं.

एकदा माझ्या थोरल्या भावाने मला टेम्पो ढकलताना बघितलं आणि माझ्या मागे लागला. पण मी बहुतेकवेळा हाती लागत नव्हतो. ‘अरे तू त्या टेम्पोला ढकलायला कशाला गेलेलास? गाडीखाली सापडलास तर काय करणार?’ असं म्हणून तो मला धरायला आणि धरून बदडायला माझ्या मागे लागायचा. पण तेवढ्यातच मी शेताचं दुसरं टोक गाठलेलं असायचं. हा आमच्यातला ‘टॉम अँड जेरी शो’ असायचा. पण भागेल्या-भागेल्यांतली चेष्टामस्करी, कडाक्याची भांडणं, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्या मारामार्‍या आणि अन्य अशा झुंजीचे आम्ही प्रेक्षक होतो.
२००१ साली मी पहिल्यांदाच पॉवर टिलर शेतात उतरलेला पाहिला. पण जसा नांगराचा ङ्गाळ जमिनीच्या पोटात घुसून शेतजमीन खणून काढायचा तसा पॉवर टिलर खणत नव्हता आणि जमीन चांगली खणलेली बघायची सवय असल्याने मला ते थोडं विचित्र वाटायचं. पॉवर टिलरच्या हँडलला सायकलसारखे ब्रेक पाहून मजा वाटायची. पॉवर टिलर चालवणार्‍या माणसाला तेव्हा आणि आजही ऑपरेटर म्हणतात. त्या ऑपरेटरला ‘ह्या मशिनाक सीट कित्याक ना? तु तुजे पाय चिखलान कित्याक बुडयता? हेका एक बरेंऽ सीट बसोवपाक जाय मरे?’ असे प्रश्‍न विचारून भंडावून सोडायचो. तो कधीकधी मशीन बंद करून माझ्या हातातही द्यायचा. पण मग ते त्याचं हँडल ङ्गिरवलं किंवा लिवर दाबलं की टिलर उधळलाच म्हणून समजा. मग ऑपरेटर म्हणायचा, ‘आंसु, आंसु! तु ल्हान आसा! तुका जावचें ना ते!’ मला नेहमी वाटायचं की जोताला किंवा पॉवर टिलरला एक लाकडी किंवा लोखंडी खुर्ची असावी आणि त्या खुर्चीवर बसून चिखल न लागता नांगरणी करावी. पण चिखलात उतरल्याशिवाय भाताच्या सोनेरी लोंब्या पिकवता येत नाहीत.
शेताचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे ङ्गटङ्गटं. हे ङ्गटङ्गटं शेताच्या नैऋत्येला थोडंसं उंचावर पण पाटाच्या खालच्या बाजूला बसवायचे. मध्ये एक दणकट आडव्या लाकडी काठीने जोडलेलं आणि दोन उभ्या मजबूत काठ्यांवर उभं केलेलं ते ङ्गटङ्गटं दर वीस सेकंदांनी पाटाच्या पाण्याने भरून जायचं आणि म्हादई नदीतून खास आणलेल्या गुळगुळीत दगडांवर ङ्गट् असा आवाज करून आपटायचं. बांबूच्या एका विशिष्ट जातीचं जाड खोड वापरून हे ङ्गटङ्गटं तयार केलं जायचं. एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला अशी दोन ङ्गटङ्गटी बसवलेली असायची. दर वीस ते तीस सेकंदांनी दोन्ही ङ्गटङ्गटी इशारत द्यायची. शेताची नासधूस करणार्‍या उपद्रवी प्राण्यांना अटकाव करण्यासाठी ह्या नादयंत्रांचा भारी उपयोग व्हायचा. आमची आई म्हणायची, ‘रानडुक्कर म्हणतो माझे शेत! हरण म्हणते माझे शेत! मोर म्हणतो माझे शेत! सारे म्हणती माझे शेत! अशा परिस्थितीत ही ङ्गटङ्गटी आणि बुजगावणी काय तो शेतकर्‍यांना आधार!

२००३ साल उजाडलं! या वर्षी भागेली एकत्र आले आणि शेतीकामाला सुरुवातदेखील झाली. पण लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. एकीकडे तांदळाला तसा भाव मिळत नव्हता आणि उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवताना तसेच भागेल्यांची देणी निभावताना आबांची तशी कसरतच होत होती. २००४ च्या हंगामाचं पीक टेम्पोत भरून बाजारात नेलं आणि सगळे भागेली आबांकडे गेले. आबांचा तसा दरारा होता. त्यांच्यापुढे बाष्कळ बडबड करणारा माणूस सहसा उभा राहत नसे. सगळ्यांनी मिळून आबांना सांगितलं की, आता आम्हाला शेत करणं शक्य होणार नाही. आम्हाला पस्तीस किलो तांदूळ रेशनकार्डवर मिळतात. आबांनी सरळ आणि स्पष्ट शब्दांत सांगितलं की पुढच्या वर्षीपासून तुम्ही शेत करू नका. कोणतीही तडजोड झाली नाही, कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत आणि शेकडो वर्षांपासून अविरतपणे चालू असलेलं शेत २००४ साली बंद पडलं जे आजतागायत परत चालू झालं नाही. त्या वर्षीपासून शेतात कुणीही नांगर धरला नाही. सुकडात एकही बैलजोडी दिसली नाही. परत कधीही रोप लागलं नाही की लावणी झाली नाही. बांध सुकला तो कायमचा. खळ्याचं खळं झालं ते आजतागायत तिथं परत शेणाचा सडा आणि पेटण्याचा पेट बसला नाही. आज सगळीकडे रान माजलंय. गुरांचे मुजोर मालक आपली गुरं बेजबाबदारपणे सोडून देतात आणि त्यावर आयत्या बिळात नागोबा होतात. पेरूची दहाबारा झाडं तर कधीच उन्मळून पडून मरून गेली. आता शेत हिरवंगार होतं ते पावसात आणि वैराण होतं उन्हाळ्यात.