वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी सुभाष वेलिंगकरांविरोधात गुन्हा नोंद

0
7

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी केल्या प्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात काल रात्री डिचोली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 299 नुसार हा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी तक्रार दाखल केली होती. तत्पूर्वी, सुभाष वेलिंगकर यांना अटक करावी, या मागणीसाठी काल शेकडो लोकांनी मडगाव पोलीस स्थानकावर धडक दिली होती.

काही दिवसांपूर्वी डिचोलीतील एका सभेत बोलताना प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सदर विधान केले होते. ह्या वक्तव्य प्रकरणी सुभाष वेलिंगकर यांना अटक करण्याची मागणी करीत मडगाव पोलीस स्थानकासमोर शेकडो लोकांचा जमाव जमला व त्यांना अटक केल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी आम आदमी पक्षाचे आमदार क्रूझ सिल्वा, प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेस नेते मोरेनो रिबेलो, सावियो कुतिन्हो येशू डिकॉश्ता हेही त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल अत्यंत हीन शब्दांत वक्तव्य केल्याने गोमतकीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.

पोलीस अधीक्षक सुनीता सावंत व संतोष देसाई यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन तपास करण्याचे आश्वासन दिले; पण आंदोलनकर्ते ऐकायला तयार नव्हते. वेलिंगकर यांना अटक केल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी रस्ता अडविला. त्यामुळे वातावरण तंग बनले. यानंतर वेलिंगकरांविरोधात गुन्हा नोंद केला जाईल, असे आश्वास सुनीता सावंत यांनी दिले. त्यानंतर डिचोली पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.