मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन ही रुपेरी पडद्यावरील एका शालीन, सोज्वळ पर्वाची इतिश्री आहे. विलक्षण बोलक्या डोळ्यांच्या आणि तृप्त, समाधानी चेहऱ्याच्या सुलोचनाबाईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या घरगुती, कुटुंबवत्सल भूमिकांमधून, विशेषतः आईच्या भूमिकांमधून एक मानदंड निर्माण केला. मराठी आणि हिंदीतील अनेक पिढ्यांसमवेत काम करणारी ही वात्सल्यमूर्ती आता आपल्यातून कायमची निघून गेली आहे. चिकोडी तालुक्यातील खडकलाटसारख्या छोट्या गावातील शंकरराव दिवाणांची ही कन्या. नागपंचमीला जन्मली म्हणून तिचे नाव ठेवले गेले नगाबाई. पण प्रेमाने तिला सगळे ‘रंगू’ म्हणायचे. मूलबाळ नसलेल्या मावशीने तिला आपले लाटकर हे आडनाव लावले, तेव्हा त्या खेडेगावात कोण गहजब झाला होता. अशा या रंगूला परिस्थितीमुळे लहानपणीच चित्रपटसृष्टीची वाट धरावी लागली. वयाच्या चौदाव्या वर्षी मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांनी ‘चिमुकला संसार’ साठी चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला. पण अल्पावधीत मास्टर विनायकांनी आपली चित्रसंस्थाच मुंबईला हलवायचा निर्णय घेतला. त्यामुळे रंगूंच्या आयुष्यात चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांसारखी गुरूतुल्य व्यक्ती आली, जिने केवळ तिचे नावच नव्हे, तर अवघे आयुष्यच बदलून टाकले. भालजींनी ‘रंगू’ला तिच्या भावपूर्ण डोळ्यांना साजेसे नाव दिले – ‘सुलोचना.’ कै. माधवी देसाई या भालजींच्या कन्या. त्यांचेही नाव भालजींनी सुलोचनाच ठेवले होते. या नव्या नावाने सुलोचना यांनी आपली चित्र कारकीर्द परिश्रमपूर्वक उभी केली. भालजींचा जयप्रभा स्टुडिओ आणि प्रभाकर चित्र ही त्यांची चित्रसंस्था केवळ एक चित्रसंस्था नव्हती, ती एक चित्रसंस्कृतीच होती. रोज प्रार्थनेने कामाला सुरूवात करणाऱ्या या चित्रसंस्थेमध्ये विलक्षण शिस्तीच्या संस्कारात त्या वाढल्या. स्वतःचा मेकअप स्वतःच करायचा, चित्रीकरणातील कंटिन्यूटी स्वतःच लिहून ठेवायची, लायब्ररीतली पुस्तके वाचायची, ती वाचल्याचा पुरावा म्हणून त्यावर टिपणे लिहून द्यायची, फावल्या वेळेत चित्रपट संकलनही शिकायचे अशा शिस्तीच्या वातावरणात सुलोचनाबाईंनी आपल्या भावी कारकिर्दीचा भक्कम पाया रचला. बोलके पाणीदार डोळे, मराठमोळा हसरा, सात्विक चेहरा आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सुलोचनाबाईंची घोडदौड सुरू झाली. दुर्दैवाने गांधीहत्येनंतर भालजींचा स्टुडिओ जाळला गेला. पुढील कारकिर्दीखातर सुलोचनाबाईंना पुण्यात आणि नंतर तेथून मुंबईत यावे लागले. याच काळात मराठीतून हिंदीत त्यांनी पाऊल टाकले. मराठी आणि हिंदीत नायिकेची कामे करीत असताना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षीच एक चरित्र भूमिका त्यांच्या वाट्याला आली आणि ‘दीर्घ चित्रपट कारकीर्द हवी असेल तर येईल ती भूमिका स्वीकारावी’ या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच्या सल्ल्याने त्यांनी ती स्वीकारली. मात्र, त्यामुळे त्यांची नायिकेची कारकीर्द संपुष्टात आली आणि पुढे केवळ आई, बहीण, वहिनी अशा चरित्र भूमिकाच त्यांच्या वाट्याला येत गेल्या. एकदा तमाशापटात त्यांनी नृत्य काय केले, त्यांच्या सोज्वळ, सात्विक भूमिकांवर प्रेम करणारे प्रेक्षक त्यांच्यावर तुटून पडले. ‘तुम्ही नाचलात तर आमच्या घरच्या पोरीबाळीही नाचतील. त्यांनीही बोर्डावर नाचावं का?’, या त्यांच्या सवालामुळे सुलोचनाबाईंनी पुन्हा पायाला चाळ बांधले नाहीत. सुलोचनाबाईंच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी असे भरभरून प्रेम केले. मराठीतच नव्हे, तर हिंदीमध्येही आई असावी तर अशी अशी प्रतिमा निर्माण होईपर्यंत त्यांच्या भूमिकांनी मानदंड निर्माण केला. पृथ्वीराज कपूरपासून पुढच्या पिढीतील राज कपूर, शक्ती कपूर, शशी कपूर आणि त्याही पुढच्या पिढीतील रणधीर कपूर, ऋषी कपूरपर्यंत वेगवेगळ्या पिढ्यांसमवेत त्यांनी काम केले. खरे तर मराठी असल्याने त्यांना हिंदी बोलता येत नसे, पण हिंदी चित्रपटांत आल्यावर गीता बालीने ‘घबराना नही, धीरे धीरे सीख पाओगी’ असा धीर दिल्यानं त्या हिंदी शिकल्या. त्यांच्या मराठी चित्रपटांतील भूमिका 50, तर हिंदी चित्रपटांतील भूमिका 250 आहेत! हिंदीतच काय, दाक्षिणात्य चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. अर्थात, ह्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीमागे तेवढीच धडपड आहे, मेहनत आहे. मुंबईत दिवसभर चित्रीकरण करायचे, मग रात्री पुण्यात जाऊन तेथे चित्रीकरण करायचे, पुन्हा पहाटे मुंबईत परतायचे असे प्रचंड परिश्रम करूनच त्यांनी हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीमधील आपले स्थान कायम केले हे विसरून चालणार नाही. अशी समर्पितता, असे वाहून घेणे आज कलेच्या क्षेत्रात, वाढत्या व्यावसायिकरणात दुर्मीळ होत चालले आहे. त्यामुळेच अशा थोर व्यक्ती आपल्यातून निघून जातात तेव्हा मागे अपरिहार्यपणे पोकळी उरतेच.