लॉकडाऊनचा भातशेती कापणीवर परिणाम

0
206

>> केंद्रीय कृषी मंत्र्यांना कळेकरांनी दिली माहिती

लॉकडाऊनमुळे राज्यातील खरीप हंगामातील भातशेतीच्या कापणीवर परिणाम झाला असल्याची माहिती कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून त्यांना दिली.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील कृषीमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करुन सर्व राज्यातील शेती व पिकासंबंधीची माहिती मिळवली. यावेळी आपण तोमर यांना सध्या गोव्यात भातशेतीची कापणी करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिल्याचे कवळेकर यांनी सांगितले.

राज्यातील भातशेती कापणीसाठी तयार आहे. मात्र झटपट कापणीसाठी ज्या ‘कम्बाईल्ड हार्व्हेस्टर’चा वापर करण्यात येत असतो ते चालवायला यंत्रचालक शेजारच्या राज्यातून आणावे लागतात. मात्र लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमा बंद करण्यात आलेल्या असल्याने शेजारच्या राज्यातून यंत्रचालकांना आणता येत नाहीत. त्यांना आणले तरी १४ दिवस सामाजिक विलगीकरणात ठेवावे लागणार आहे. मात्र, भातशेतीची कापणी लवकरात लवकर करण्याची गरज असून अन्यथा शेती करपून जाण्याची भीती असल्याचे आपण केंद्रीय मंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्याचे कवळेकर म्हणाले.

कवळेकर यांनी यावेळी लॉकडाऊनमुळे राज्यातील फूल उत्पादकांनाही फटका बसला असल्याचे केंद्रीय मंत्र्यांचा नजरेस आणून दिले.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीला खात्याचे सचिव कुलदीप सिंग, कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो व सहकारी संस्थाचे निबंधक विकास गावणेकर हेही उपस्थित होते.