लडाखमध्ये भारताकडून सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्र

0
17

चीनला शह देण्याची योजना

संरक्षणमंत्री करणार शिलान्यास

भारताकडून लडाखच्या न्योमा भागात जगातील सर्वात उंच लढाऊ हवाई क्षेत्राची निर्मिती करण्यात येणार असून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या योजनेचा शिलान्यास करणार आहेत. त्यानंतर उद्या दि. 12 रोजी जम्मूमधील देवक पुलापासून याची सुरुवात करण्यात येईल. भारताकडून चीनला हा एक संदेश असल्याचे मानले जाते आहे.

पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे हे हवाई क्षेत्र उभारण्यात येत असून त्यासाठी एकूण 218 कोटी रुपये खर्च येणार आहे. चीनला चोख उत्तर देण्यासाठी या योजनेची निर्मिती असून भारताकडून उचलण्यात आलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

उच्चस्तरीय चर्चा
चीनसोबत सध्या एलएसीवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. चीनसोबत सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांत उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. भारत आणि चीनची सीमावाद अनेक वर्षे सुरू असून सध्या भारतीय सैन्याकडून चीनच्या प्रत्येक कुरापतीला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे हे हवाई क्षेत्र उभारण्यात येत असल्यामुळे ही चीनला देण्यात आलेला एक संदेश असल्याचे मानले जात आहे.

मागील तीन वर्षांपासून पूर्व लडाखमधील न्योमा ॲडव्हान्स लँडिंग मैदानाचा वापर भारतीय सैन्याकडून केला जात आहे. वाहतुकीसाठी आणि युद्धाच्या सामग्रीची ने- आण करण्यासाठी या मैदानाचा वापर भारताकडून केला जात आहे. 2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे.