लक्ष गुजरातकडे

0
46

सार्‍या देशाचे लक्ष लागून राहिलेली गुजरात विधानसभेची निवडणूक अखेर निवडणूक आयोगाने काल जाहीर केली. हिमाचल प्रदेशबरोबरच तिची घोषणा न करता विलंब लावल्याबद्दल निवडणूक आयोग विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेला आहे. परंतु त्याची पर्वा न करता आणि गुजरात विधानसभेची मुदत संपायला बराच अवधी असल्याचे सांगत एक आणि पाच डिसेंबरला अशा दोन टप्प्यांत गुजरातची निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मतमोजणी मात्र हिमाचल प्रदेशबरोबरच आठ डिसेंबरला होणार आहे. हिमाचल प्रदेशपेक्षाही गुजरातकडे देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे, कारण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मातृभूमीतील ही निवडणूक आहे. स्वतः मोदी गुजरातचे चौदा वर्षे मुख्यमंत्री होते. तेथूनच ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. गुजरातशी असलेली आपली नाळ त्यांनी आणि शहांनी आजही तुटू दिलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या पक्षाचा पाडाव करण्याचा विडा उचलून काही घटक कामाला लागलेले आहेत. गुजरातमधील मतदारांसंदर्भात अत्यंत सखोल सर्वेक्षणे याच कुतूहलापोटी चाललेली दिसतात.
१९९८ पासून म्हणजे गेली चोवीस वर्षे गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घेत भाजप सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी यावेळी आम आदमी पक्ष हिरीरीने पुढे सरसावलेला दिसतो. गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस सध्या नेतृत्वहीन स्थितीत असल्याने आणि पक्षनेते राहुल गांधी ‘भारत जोडो’त दंग असल्याने त्या संधीचा फायदा उपटून किमान प्रमुख विरोधकाची जागा पटकावण्यासाठी आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावलेली दिसते.
जवळजवळ पंचवीस वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपाला मतदार कंटाळले आहेत; महागाई, वीजदरवाढ, प्रकल्पांसाठी सरकारकडून होणारे भूसंपादन, बेरोजगारी वगैरेंमुळे नाराज बनले आहेत असे एक तेथील सरकारबाबत निराशाजनक चित्र निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न आम आदमी पक्षाने चालवलेला दिसतो. शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत गुजरातमध्ये कशी पीछेहाट झाली आहे, शेतकरी कसा अस्वस्थ आहे वगैरे वगैरे चित्र पद्धतशीरपणे रंगवले जात आहेत. परंतु ह्या सगळ्या विरोधी प्रचाराला पुरून उरत मोदी – शहांचा भाजप पुन्हा गुजरातमध्ये भरारी घेणार का, हा त्यामुळे जागतिक औत्सुक्याचा विषय बनलेला आहे.
‘डबल इंजिन सरकार’ चा फॉर्म्युला इतर राज्यांत जसा कामी आला तसा तो गुजरातमध्येही येईल हा विश्‍वास भाजपा नेतृत्वाला आहे. शिवाय विधानसभेच्या १८२ जागांपैकी विक्रमी जागा संपादन करून सत्तेवर येण्याच्या दिशेने भाजपाने काटेकोर नियोजन चालवले आहे. यापूर्वी सर्वाधिक १४९ जागा जिंकण्याचा विक्रम गुजरातमध्ये १९८५ मध्ये कॉंग्रेसच्या नावावर आहे. तो मोडून पुन्हा दमदारपणे सत्तेवर येण्याचे स्वप्न भाजप पाहतो आहे. त्यासाठी मतदारांमधील कथित नाराजी दूर सारण्यासाठी गुंतवणुकीपासून रोजगारापर्यंत जोरदार प्रयत्न भाजपाने चालवले आहेत. नुकतेच महाराष्ट्रातून जे दोन बडे औद्योगिक प्रकल्प गुजरात सरकारने पळवले ते यासाठीच. नरेंद्र मोदींच्या काळात गुजरातने मोठी झेप घेतली होती, परंतु त्यांच्यानंतरच्या काळामध्ये ती विकासाची गती सरकारला राखता आली नाही. त्यामुळे विजय रुपानींचे मुख्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले. काहीही करून भाजपाला गुजरातमध्ये आपला प्रभाव येत्या निवडणुकीत पुनर्प्रस्थापित करावा लागणार आहे, कारण नंतर लोकसभा निवडणुका येणार आहेत आणि यदाकदाचित गुजरात गमावले तर मोदीयुगाच्या ओहटीची ती नांदी ठरेल हे भाजपा जाणून आहे. त्यामुळेच सर्व शक्तिनिशी आम आदमी पक्षाच्या आक्रमक प्रचाराचा सामना करीत भाजपा मैदानात उतरणार आहे.
आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आज ठरेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी जनतेचा कौल मागवण्याचा फार्स करण्यात आला. त्यातून लोकप्रिय पत्रकार इमुदान गढवी आणि पटिदार आंदोलनातील नेते गोपाल इटालिया यांच्यात जोरदार चुरस आहे. त्या दोघांतून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आम आदमी पक्ष आज जाहीर करील अशी अपेक्षा आहे. भाजपाची भिस्त मात्र मोदी – शहांवरच अधिक दिसते. मोदींची गुजरातमधील लोकप्रियता वादातीत आहे. तिच्या बळावर मतदार पुन्हा एकवार पक्षाच्या हाती सत्ता देतील ह्या विश्‍वासातून भाजपा विक्रमी जागांचे बेत रचत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत वास्तविक कॉंग्रेसला काही भागांमध्ये अनपेक्षित यश मिळाले होते, परंतु यावेळी त्या पक्षाची जागा आपने घेतल्याचे दिसते. त्यामुळे लढत तिरंगी असेल. ती चुरशीची असेल. शेवटी बाजी कोण मारते ते पाहूच!