रेल्वेतून पर्स चोरून 1.28 लाखांचा गंडा

0
26

धावत्या रेल्वेत केरळमधील महिलेच्या बॅगची चोरी

कोकण रेल्वेच्या रेलगाडीतून पर्स चोरून डेबिट कार्डचाही वापर करत एका महिलेला 1.28 लाखांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. मुंबई ते केरळ असा प्रवास करत असताना पेडणे ते मडगाव स्थानकादरम्यान केरळ येथील महिलेच्या बॅगची चोरी करीत चोरट्याने बॅगेमधील 6 हजारांची रोकड, आयफोन, घड्याळ असा 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर डेबिट कार्डचा वापर करत 68,028 रुपयांच्या वस्तूंची खरेदी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी केरळमधील रिया मेरी यांनी कोकण रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेतून महिलांच्या पर्सची चोरी करून त्यातील मुद्देमाल चोरण्याच्या तसेच एटीएम किंवा डेबिड कार्डद्वारे आर्थिक फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोटटयाम-केरळ येथील रिया मेरी या महिलेबाबतही असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्यांनी कोटटयाम-केरळ येथील पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. परंतु, चोरीची घटना गोव्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण कोकण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

रिया मेरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मेरी या 23 ऑगस्ट रोजी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोचुवेली सुपरफास्ट एक्स्प्रेसने (22113) प्रवास करत असताना पेडणे रेल्वेस्थानक ते मडगाव जंक्शनदरम्यान अज्ञाताने त्यांच्याकडील गुलाबी बॅगची चोरी केली. या बॅगेत 50 हजारांचा आयफोन, घड्याळ, वायरलेस ब्ल्यूटुथ, आयसीआयसीआय व आयडीबीआय बँकेची डेबिट कार्ड यासह 6 हजारांची रोख रक्कम होती. चोरी केल्यानंतर चोरट्याने आयडीबीआय बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करत 68,029 रुपयांच्या वस्तू पीओएसद्वारे खरेदी केल्या. अशाप्रकारे चोरट्याने आपल्याकडील 1,28,028 रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मे महिन्यातही 6.76 लाखांची चोरी
गेल्या मे महिन्यात अशाचप्रकारे मडगाव स्थानकानजीक रेल्वे आली असता एका महिलेच्या पर्सची चोरी करण्यात आली. पर्समधील एटीएमचा वापर करून 6.76 लाख रुपये काढल्याची तक्रार पुणे येथील मैथरी गोपीदास यांनी केलेली होती. पुणे (महाराष्ट्र) येथील मैथरी गोपिदास यांची पर्स मडगाव रेल्वे स्थानकानजीक धावत्या रेल्वेतून चोरण्यात आली. सदर पर्समध्ये 3.75 लाखांचे सोन्याचे दागिनेे तसेच सव्वा लाख रुपये रोख होते. यानंतर चोरट्याने एटीएमच्या वापर करत आणखी 1.76 लाख रुपये काढले. असा सुमारे 6.86 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

11 मे 2023 रोजी पुणे येथील मैथरी गोपिदास या पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील ए 1 डब्यातून प्रवास करत होत्या. ही गाडी मडगाव स्थानकानजीक आली असता अज्ञाताकडून सीटवर ठेवलेली लेडीज बॅग चोरी करण्यात आली. या बॅगेत तीन सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या चेन, तीन अंगठ्या, एक कानातले रिंग असे 3 लाख 75 हजारांचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल, 1.25 लाखांची रोख रक्कम याशिवाय एसबीआयचे एक एटीएम होते. या एटीएमचा वापर करत विविध एटीएम मशिन्समधून चोरट्याने आणखी एक लाख 76 हजार 900 रुपयांची रक्कम काढली. अशाप्रकारे रोख रकमेसह 6 लाख 86 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार गोपिदास यांनी नोंदवलेली आहे. याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.