वास्कोहून निजामुद्दीनला निघालेल्या गोवा एक्सप्रेसमधील एका जनरल डब्यातल आठ प्रवासी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळून आल्यानंतर खळबळ माजली. ही घटना सोमवारी घडली. यापैकी सात प्रवाशांची प्रकृती चांगली असून, एका प्रवाशाची प्रकृती गंभीर आहे.
मध्यप्रदेशमधील खांडवा येथे जाण्यासाठी आठ प्रवासी गोव्याहून 12779 या क्रमांकाच्या ‘निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेस’ने निघाले होते. हे सर्वजण शेवटच्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. सावर्डे रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यानंतर ते सर्वजण झोपलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही. त्यावेळी ते बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेच बेळगाव पोस्टच्या आरपीएफने रेल्वे डॉक्टरांसह त्यांची तपासणी केली.