>> पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर हल्लाबोल; मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या; भाजप देशद्रोही असल्याचीही टीका
संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेला काल काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या भाषणाने सुरुवात झाली. या चर्चेदरम्यान राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर हल्ला चढवला. तसेच मणिपूरवरूनही मोदींना धारेवर धरले. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली म्हणून पंतप्रधान मणिपूरमध्ये जात नाही, असे राहुल गांधी म्हणाले. याशिवाय भाजप हा देशभक्त नाही, तर देशद्रोही पक्ष असल्याची टीकाही त्यांनी केली. इतक्यावरच न थांबता राहुल गांधींनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षरित्या रावणाची उपमा, तर तर शहा आणि अडाणी यांना मेघनाथ आणि कुंभकर्ण म्हणत टीका केली. राहुल गांधींच्या या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जनतेमध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असून, त्यासाठी हा अविश्वासाचा प्रस्ताव मांडला आहे, असे शहा म्हणाले.
विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, काल दुसऱ्या दिवशी यावरील चर्चेवेळी राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपच्या मित्रांनी आज घाबरू नये. मी आज अदानींवर बोलणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी चिमटा काढला. तसेच ‘आज मैं दिमाग से नहीं, दिल से बोलना चाहता हूँ,’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांना टोमणे हाणले.
भारतमातेची हत्या केली
त्यानंतर राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर भारताचा हिस्सा नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. त्यांनी मणिपूरचे दोन भाग केले. भारत एक आवाज आहे. हा जनतेचा आवाज आहे, हृदयाचा आवाज आहे. तो आवाज तुम्ही मणिपूरमध्ये मारला, म्हणजे मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, देशभक्त नाही. म्हणूनच पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकत नाहीत; कारण त्यांनी मणिपूरमध्ये हिंदुस्थानची, भारतमातेची हत्या केली. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात, असा घणाघात राहुल गांधींनी केला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, भारत माता आपली माता आहे, सभागृहात बोलताना शिष्टाई जपा, असा सल्ला राहुल गांधींना दिला. तसेच तसेच त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणी किरेन रिजिजू यांनी केली.
रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण!
नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नाहीत, ते फक्त दोन लोकांचे ऐकतात. रावणही दोन लोकांचे ऐकायचा. मेघनाथ आणि कुंभकर्ण. तसेच नरेंद्र मोदी दोघांचे ऐकतात अमित शहा आणि अडाणी, असे राहुल गांधी म्हणाले.
लष्कराला का पाचारण करत नाही?
राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मणिपूरमध्ये भारतीय लष्कर एका दिवसात हिंसाचार संपवू शकते; पण भारत सरकारला हिंसाचार थांबवायचा नाही, म्हणून ते लष्कराचा वापर करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींवर गैरवर्तनाचा आरोप?
कालच्या भाषणातून सभागृह दणाणून सोडणाऱ्या राहुल गांधींवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गैरवर्तनाचा आरोप केला. इराणींनी राहुल गांधींवर संसदेत कथित ‘फ्लाईंग किस’ दिल्याचा आरोप केला. याबाबत जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात राहुल गांधी हे ‘फ्लाईंग किस’ देत असल्याचे कुठेही स्पष्ट होत नाही. राहुल गांधी हे लोकसभा सभापतींकडे पाहून बोलण्याच्या ओघात एक बोट पुढे करून काहीतरी सांगत आहेत; मात्र स्मृती इराणींनी ती कृती ‘फ्लाईंग किस’ असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारीचे पत्र दिले आहे.
हिंसाचाराच्या घटना लाजिरवाण्याच;
पण राजकारण चुकीचे : अमित शहा
मणिपूरमध्ये हिंसेचे तांडव झाले, यात काही शंकाच नाही. आम्ही त्याचे समर्थन करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. मणिपूरची घटना लाजिरवाणीच आहे. मणिपूरमध्ये अशा घटना, दंगली घडणे हे अत्यंत वाईट आहे, मात्र यावर राजकारण करणे हे घडलेल्या घटनांपेक्षा वाईट आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवेळी सांगितले. त्यानंतर लोकसभेत एकच गदारोळ सुरू झाला.
मणिपूरच्या प्रकरणावर एक असा समज पसरवला जातो आहे की आमच्या सरकारला यावर चर्चा नको. मात्र मी या लोकसभेला सांगू इच्छितो मी पत्र लिहून अध्यक्षांना सांगितले होते की मणिपूरच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, असेही अमित शहा म्हणाले.
पहिल्या दिवसापासून आम्ही चर्चेला तयार आहोत. मात्र विरोधकांना चर्चा नकोय फक्त विरोध करायचा आहे. पंतप्रधानांनी तुमच्या मागणीचा विचारही केला असता, मात्र तुम्ही मलाही बोलू देत नाहीत. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे? आरडा ओरडा करुन आमचा आवाज तुम्ही शांत कराल का? 130 कोटी जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही, असेही शहा म्हणाले.