रायगड येथे सापडल्या दोन संशयास्पद बोटी

0
19

>> एका बोटीत एके ४७ व कागदपत्रे

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट सापडली असून बोटीत तीन एके-४७ व काही कागदपत्रे आढळली. तसेच हरिहरेश्वर येथेही एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला आहे. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. या बोटींमध्ये तीन एके-४७ तसेच २०० ते २२५ जिवंत काडतूसे सापडली.

सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास ही बोट आली. त्यांनी ही माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बोटीची पाहणी केली असता, त्यात हत्यारे दिसून आली. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत दहीहंडी आणि गणपती उत्सव आहे. त्यापूर्वी ही संशयास्पद बोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी काल गुरुवारी सायंकाळी बोटीच्या ठिकाणी पाहणी केली. तसेच बोटीमध्ये मिळालेल्या साहित्याचीही त्यांनी पाहणी केली. दरम्यान, त्यांनी बोट समुद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
दहशतवाद्यांशी संबंध नाही ः फडणवीस
रायगडच्या किनार्‍यावर सापडलेली बोट ही लेडी हान नावाची असून याची मालकी ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेची आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. बोटीचे इंजिन खराब झाले आहे.
बोटीतील प्रवाशांना कोरियन युद्धनौकेने वाचवले आहे. पाणी तुंबल्याने बोट ओढता आली नाही आणि त्यामुळे ती वाहून गेली. हीच ती बोट असल्याचे नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने सांगितले आहे. तसेच बोट जप्त करून तपासण्यात आली असली तरी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. या बोटीचा दहशतवाद्यांशी काहीही संबंध नसल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.