राज्यात ८३ दिवसांत ९०१ नमुन्यांची तपासणी

0
157

 

कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ८३ दिवसात ९०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. राज्यात ३ एप्रिलनंतर कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच, सातही कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २९ जानेवारी २०२० पासून आत्तापर्यंतच्या काळात गोमेकॉच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित म्हणून १६५ जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहेत.

गोमेकॉत प्रयोगशाळा

गोमेकॉमध्ये कोविड तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्याने कोरोनाअंतर्गत नमुन्याच्या तपासणीच्या कामाला गती प्राप्त झालेली आहे. गोव्यात प्रयोगशाळा सुरू करण्यापूर्वी नमुन्यांच्या तपासणी पुणे येथील प्रयोगशाळेतून करून घेतली जात होती. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीसाठी जास्त वेळ लागत होता. राज्यात कोरोनाची सामाजिक पसरण झालेली नाही, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. विदेशातून आलेल्या सहा जणांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याचेही बांदेकर म्हणाले.

 

गोमेकॉत ५ संशयित दाखल

बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित ५ रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून खास वॉर्डात ११ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत.  आरोग्य खात्याने १६ जणांना क्वारंटाईन केले आहेत.  गोमेकॉच्या कोरोना प्रयोगशाळेत १०३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना प्रयोगशाळेतून ८१ नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला असून सर्व ८१ नमुने नकारात्मक आहेत. तर, ६८ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. सरकारी क्वारंटाईनखाली ५७ जणांना ठेवण्यात आले आहेत.

 

विमानतळ, बंदरावर

कोविड तपासणी केंद्रे

राज्यातील औद्योगिक वसाहती, विमानतळ, बंदर आणि मुख्य तपासणी नाक्यावर कोविड तपासणी केंद्रे सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर  राज्यात  वैद्यकीय तपासणीला गती देण्यासाठी विविध ठिकाणी खास केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणजी शहर आरोग्य केंद्र, वेर्णा, कुंडई, म्हापसा, कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहती, दाबोळी विमानतळ, एमपीटी, पत्रादेवी, केरी, पोळे, मोले, दोडामार्ग येथील तपासणी नाक्यावर अद्ययावत केंद्रे सुरू केली जाणार आहेत, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.