गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेची कारवाई
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मटका जुगाराविरुद्ध मोठी कारवाई काल केली. राजधानी पणजीसह म्हापसा, पर्वरी, मडगाव, वास्को, फोंडा, मांद्रे, पेडणे आदी ठिकाणी छापे घालून 12 मटका बुकींंना अटक केली. तसेच, गुन्हा विभागाने तीन मटका चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात मुंबईतील जया चड्डा, गुजरातमधील चंदूभाई ठक्कर आणि घनःश्यामभाई यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच, एफआयआरमध्ये गोव्यातील 12 मुख्य दलालांच्या नावांचा समावेश केला आहे.
गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने मटकाविरोधात जोरदार कारवाई करताना 12 जणांना अटक केली. या मटका बुकींकडून रोख रक्कम आणि इतर मटका जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील मटका दलाल आणि प्रमुख मटकाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी रामचंद्र रामनाथ बिंद, (50, वास्को), बलाप्पा हनुमंत तलवार (55, फातोर्डा), अली अशरफ शेख (28, रेईश मागूश), कर्मराज कुमार (25, हरमल मांद्रे), प्रकाश टाककट (46, बागवाडा, माशेल), गंगाप्पा सोमलप्पा लमाणी (40, मडगाव), जेरेमियास प्रीतिसन नायक (41, रामनगर बेती), धनंजय देवेंद्र वराडे (69, खलपवाडा, पाली, म्हापसा), परशुराम हणमंत मदार (26, शापूर बांदोडा), अनिलकुमार तुकाराम सूर्यवंशी (37, रा. काणका म्हापसा), आरिफ मुनाफ मुलुगुंद (32, रामनगर, बेती), नवनात हरिश्चंद्र कशेलकर (51, सरमाळे, पेडणे) यांना अटक केली आहे. मटका बुकींग स्वीकारणाऱ्या बुकीविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये गोव्यातील त्यांच्या दलाल किंवा हँडलरची नावेदेखील समाविष्ट आहेत. त्यात अण्णा, परेश, सुभाष, नीलेश, मौसीन, गुलजार, अप्पू तिवारी, नारायण परब, सोमनाथ, भरत, रमेश, अमरेश या नावांचा समावेश आहे.
तसेच, मुख्य मटका जुगारचालकांची ओळख पटली आहे आणि त्यांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात चंदुभाई ठक्कर ऊर्फ डिसा (अहमदाबाद, गुजरात), घनःश्याम भाई (अहमदाबाद, गुजरात) आणि जया चड्डा ( मुंबई, महाराष्ट्र) यांच्या नावांचा समावेश आहे. गुन्हा शाखेने गोवा जुगार प्रतिबंधक अंतर्गत 12 वेगवेगळे एफआयआर नोंदवले आहेत.