रशियातील ‘वॅग्नर’ गटाची माघार

0
11

रशियात संभाव्य विद्ध्वंस टळला

वॅग्नर सैन्य गट युक्रेनमध्ये रुजू होणार

शनिवारी सकाळीच रशियात वॅग्नर या पुतिन यांच्या समांतर सैन्यगटाने बंड केले होते मात्र काल रविवारी बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आणि ‘वॅग्नर’ ने माघार घेतली. त्यामुळे रशियात उद्भवलेला मोठा विद्ध्वंस टळला आहे.

वॅग्नर या गटाचा प्रमुख प्रिगोझिन याने शनिवारी थेट रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनाच आव्हान देत मॉस्कोच्या दिशेने सैन्याला आगेकूच करण्याचे आदेश दिले. त्यामुळे रशियात खुद्द पुतिन यांच्यासमोर आजपर्यंतचे सर्वात मोठे आव्हान आणि धोका निर्माण झाला होता. वॅग्नर ग्रुपचे सैनिक रशियातील वेगवेगळ्या शहरांमधून मार्च करत ती शहरे ताब्यात घेतल्याचा दावा करत होते. या पार्श्वभूमीवर रशियात विद्ध्वंस होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पुतिन यांची मवाळ भूमिका
प्रारंभी या बंडामध्ये जे जे गुंतले असतील, त्या सर्वांना शिक्षा करण्यात येणार असल्याचे पुतिन यांनी म्हटले होते. मात्र पुतिन यांनी तहामध्ये काहीशी मवाळ भूमिका घेतली असून बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपला किंवा त्या ग्रुपचा प्रमुख प्रिगोझिनला देशद्रोह किंवा इतर कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून अभय देण्यास पुतिन यांनी मान्यता दिली. रशियामध्ये रक्तपात आणि अंतर्गत लढा होऊ नये हेच पुतिन यांचे ध्येय असल्यामुळेच त्यांनी प्रिगोझिन आणि त्याच्या सैन्याला जाऊ दिल्याचे स्पष्टीकरण पुतिन सरकारकडून देण्यात आले.

बेलारूस राष्ट्राध्यक्षांची मध्यस्थी
बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको हे पुतिन यांचे जवळचे मित्र असून वॅग्नर ग्रुप वेगाने मॉस्कोच्या दिशेने सरकत असल्यामुळे ल्युकाशेंको यांनी या वादात मध्यस्थी केली.

एकीकडे वॅग्नर ग्रुपचे सैनिक मॉस्कोच्या दिशेने मार्च करत असताना दुसरीकडे प्रिगोझिन ल्युकाशेंको यांच्याशी रशियातील संभाव्य परिस्थितीबाबत वाटाघाटी सुरू होत्या. या वाटाघाटी पार पडल्यानंतर ल्युकाशेंको यांनी जाहीर केलेल्या या निवेदनात प्रिगोझिन सैन्य माघारी घेण्यास तयार झाल्याचे म्हटले. या तहानुसार, रशियात घुसलेले वॅग्नर सैन्य माघारी फिरून पुन्हा युक्रेनमधील आपल्या नियोजित तळावर रुजू होईल.

वॅग्नर ग्रुपमधल्या ज्या सैनिकांनी या बंडामध्ये सहभाग घेतला नाही, त्यांना रशियन संरक्षण मंत्रालयाकडून नोकरीची संधी देण्यात येईल, असे पुतिन सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.