योग्य ‘नामांकन’ कसे करावे?

0
11
  • शशांक मो. गुळगुळे

जर ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल तर ठराविक रकमेपर्यंतचा दावा बँकेचा शाखाधिकारी त्याच्या अधिकारात संमत करू शकतो. पण रक्कम जर जास्त असेल व ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल तर मात्र उत्तराधिकारी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मृत व्यक्तीची रक्कम कायदेशीर वारसाला मिळू शकत नाही.

राहते मालकीचे घर, जमीनजुमला, दागदागिने, रोख पैसे, गुंतविलेले पैसे हे ज्याचे आहेत, त्याच्या पश्चात कोणाकडे जावेत यासाठी ‘नामांकन’ अवश्य करावे. बऱ्याच गुंतवणूक पर्यायांच्या फॉर्मवर ‘नॉमिनेशन’ची माहिती भरण्यास सांगितलेली असते, ती अवश्य भरावी. तो फॉर्म कोरा ठेवू नये. जर नामांकन केलेले असेल तर तुमची संपत्ती सहजतेने ‘नॉमिनी’ला मिळू शकेल; जर नामांकन केलेले नसेल तर संबंधित वारसाला पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

आपली जमापुंजी, मालमत्ता आपल्यानंतर आपल्या वारसांना किंवा आपल्या मर्जीनुसार योग्य व्यक्तीच्या हाती गेली पाहिजे यासाठी ‘नामांकन’ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी संपत्तीधारकाने योग्यवेळी कार्यवाही केली पाहिजे. हे जर केले नाही तर त्याचा त्रास आपल्या जवळच्या माणसांना/नातलगांना होऊ शकतो. कोणाही व्यक्तीचा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मालमत्ता व्यवस्थापन. एखाद्याने संपूर्ण आयुष्यभर परिश्रम करून जमविलेल्या सर्व मालमत्तेची व्यवस्थित नोंद करायला हवी. याचबरोबर आपल्या पश्चात सर्व मालमत्ता योग्य व्यक्तीकडे विनासायास कशा हस्तांतरित होतील, यासाठी नामांकन करणे हेच मालमत्ता व्यवस्थापन! बरेच जण हे करीत नाहीत म्हणून बँकांकडे करोडो रुपयांच्या ठेवी ‘अनक्लेम्ड’ म्हणून पडून आहेत. अशा ठेवी सार्वजनिक उद्योगातील बँकांना रिझर्व्ह बँकेकडे वर्ग कराव्या लागतात. फेब्रुवारी 2023 पर्यंतच्या अशा वर्ग केलेल्या ठेवींचे प्रमाण 35 हजार 12 कोटी रुपये इतके होते. संपत्तीदाराने त्याच्या आर्थिक मालमत्ता कुटुंबातील योग्य व्यक्तींपर्यंत लवकरात लवकर तसेच कायदेशीर प्रक्रियेमध्ये न अडकता पोहोचाव्या याची दक्षता घ्यायला हवी.
नामांकन करणे म्हणजे आपल्या खात्यातील रक्कम किंवा ठेवी आपल्या पश्चात कोणाला मिळावी याविषयी संबंधित संस्थेला किंवा जिथे गुंतवणूक केली आहे तिथे निर्देश देणे. नामांकन लेखी स्वरूपात करावे लागते. नामांकन हे वैयक्तिक ठेवी, गुंतवणुकींसाठी प्रामुख्याने केले जाते. एका नावे खाते असो किंवा संयुक्त खाते असो, त्याकरिता नामांकन करता येते. बऱ्याच गुंतवणूकदारांना असे वाटते की, आमचे संयुक्त खाते आहे व खाते चालविण्यासाठी बँकेला ‘आयदर ऑर सर्व्हायव्हर’ अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे संयुक्त खात्यातील एकाचा मृत्यू झाला तरी दुसरा खातेदार खाते चालवू शकतो. पण समजा मोठा अपघात होऊन एकाच वेळी दोघेही खातेदार मृत्युमुखी पडले तर काय? त्यामुळे ‘आयदर ऑर सव्हायव्हर’ सूचना असल्यामुळे ‘नामांकन’ नको हा चुकीचा विचार डोक्यातून काढून टाकावा.

‘प्रोपरायटरशीप कंपनी’मध्ये एकच व्यक्ती व्यवसाय सांभाळत असल्याने अशा खात्यांसाठीही नामांकन करावे. ‘लॉकर’साठीही नामांकन करता येते. भागीदारी कंपन्या, मर्यादित दायित्व भागीदारी कंपन्या आदींसाठी नामांकनाची सुविधा उपलब्ध नसते. कोणतेही खाते उघडतानाच नामांकन करावे. खाते उघडताना नामांकन करायचे नसल्यास फॉर्मवर तसे लिहून त्याखाली सही करावी लागते. खाते उघडताना नामांकन केले नाही तर नंतर ते कधीही करता येते. नामांकन करणे म्हणजे त्या व्यक्तीचे नाव, वय व पत्ता देणे. सज्ञान नसलेल्या व्यक्तीलाही ‘नॉमिनी’ करता येते. नामांकनाचे नियमितपणे पुनरावलोकन करावे. बदलत्या परिस्थितीनुसार नामांकनात कधीही बदल करता येतात. नामांकनात बदल करताना अगोदरच्या ‘नॉमिनी’ची संमती/परवानगी घ्यावी लागत नाही. नामांकनात बदल केल्यामुळे, ठेवींवर किंवा गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. एक किंवा अनेक व्यक्तींना ‘नॉमिनी’ करता येते, पण त्यांना किती मालमत्ता जावी याची टक्केवारीही देता येऊ शकते. समजा, तिघांना ‘नॉमिनेट’ केलं तर 35, 30, 30 अशी टक्केवारी देता येऊ शकते. हे उदाहरण आहे. संपत्तीमालकाने त्याला योग्य वाटेल ती टक्केवारी ठरवावी.

मूळ गुंतवणूकदार हयात असताना गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये ‘नॉमिनी’ काहीही निर्णय घेऊ शकत नाही. ‘सेबी’ने नुकतेच सर्व म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फोलिओंवर नामांकन करणे आवश्यक केले आहे. यासाठीची अंतिम मुदत वाढवून 30 सप्टेंबर 2023 केली आहे.
सर्वसामान्यतः नामांकन हे पती किंवा पत्नी, मुले, आई, वडील यांच्या नावे केले जाते. नामांकन हे शक्यतो जबाबदार व्यक्तीच्या नावे करावे. तुमचा मित्र किंवा अन्य नातलगाच्या नावेही करता येऊ शकते. दुसऱ्या देशाचे नागरिक असलेल्या व्यक्तीलाही ‘नॉमिनी’ करता येऊ शकते. यात रकमेचे हस्तांतरण सुलभ व्हावे व करविषयक गुंतागुंत होऊ नये म्हणून दुसऱ्या देशाचा नागरिक असणाऱ्या व्यक्तीकडे भारतीय ‘पॅन’ हवे. अज्ञान व्यक्तीला ‘नॉमिनी’ केल्यास त्याच्या ‘नॅचरल गार्डियन’ची माहिती द्यावी लागते. अज्ञान व्यक्ती जोपर्यंत सज्ञान होत नाही तोपर्यंत अशा नामांकनाद्वारे मिळालेली रक्कम/संपत्ती सांभाळून ठेवणे ही ‘नॅचरल गार्डियन’ची जबाबदारी असते. नामांकन करताना ती व्यक्ती आर्थिक बाबी हाताळण्यासाठी सक्षम आहे का नाही, याचा विचार करण्याची आवश्यकता नसते. नामांकन करताना आपल्या पश्चात कमीत कमी वाद कसे होतील, याची दक्षता घेणे गरजेचे असते. समजा वैवाहिक नात्यात बदल झाले- मग ते लग्नामुळे असोत की घटस्फोटामुळे असोत- नामांकन बदलता येते. कुटुंबामध्ये नव्या सदस्याचे आगमन झाले म्हणजे मुलगा किंवा मुलगी झाली, नात किंवा नातू झाला तरी नामांकन बदलता येते. ‘नॉमिनी’चा मृत्यू झाल्यास नवीन नॉमिनी द्यावाच लागतो. इच्छापत्र व नामांकन या दोन वेगळ्या बाबी आहेत. नॉमिनी जर स्वतः कायदेशीर वारस असेल तर तो संपत्ती घेऊ शकतो. तो जर स्वतः कायदेशीर वारस नसेल तर कायदेशीर वारसांकडे संपत्ती/पैसा सुपूर्द करणे हे ‘नॉमिनी’चे काम असते. इच्छापत्रात किंवा मृत्युपत्रात संपत्तीचे/पैशांचे वाटप कोणाला व कसे कसे व किती प्रमाणात व्हावे याचा पूर्ण तपशील असतो. ‘नॉमिनेशन’ केल्यानंतर ज्याला ‘नॉमिनी’ केले असेल त्याला याची पूर्ण माहिती द्यावी. ‘नॉमिनी’ हा ठेवीदार किंवा गुंतवणूकदारांच्या वतीने कायदेशीर वारसांचा विश्वस्त म्हणून काम करतो. संपत्तीधारकाने ‘विल’ केलेली नसेल तर मृत व्यक्तींना लागू होणाऱ्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे त्याचे वाटप करावे लागते. संपत्तीधारकाचा नॉमिनीस संपत्ती/पैसा मिळावा म्हणून अर्ज करावा लागतो व अर्जासोबत केवायसी डॉक्युमेन्ट्स सादर करावे लागतात. नामांकन केलेले नसेल तर वारसांना सक्षम नायायालयाकडे ‘प्रोबेट’ अथवा उत्तराधिकारी प्रमाणपत्रासाठी (सक्सेशन सर्टिफिकेट) अर्ज करावा लागतो व ते सादर केल्यानंतर संपत्ती/पैशाचे हस्तांतरण होऊ शकते.

प्रत्येकाने आपल्या मालमत्तेबाबत काही काळजी घेणे अपेक्षित आणि अत्यावश्यक आहे. आपल्या सर्व मालमत्तांची नोंद व्यवस्थितपणे करावी. त्याची माहिती पती/पत्नी यांना पूर्णपणे द्यावी. सर्व मालमत्तांचे (स्थिर तसेच अस्थिर) नामांकन करावे. कुटुंबातील बदलत्या परिस्थितीनुसार नामांकनामध्ये गरज वाटेल तेव्हा बदल करावेत. नामांकनाबरोबरच इच्छापत्रही करावे.

आयुर्विमा ः आयुर्विमा पॉलिसीचा धारक एकच असतो. यात पती/पत्नी, अपत्ये, आईवडील, जवळचा किंवा दूरचा नातेवाईक किंवा मित्र यांपैकी कोणालाही नॉमिनी करावे. सर्वात जवळची नातेवाईक व्यक्ती लाभार्थी नामनिर्देशित व्यक्ती ठरू शकते व तिला सर्व रक्कम दिली जाते. नामनिर्देशित व्यक्ती ही कुटुंबाचा सदस्य नसेल तर जास्त काळजी घेतली जाते.

बँक खाती, लॉकर ः धारक एक किंवा संयुक्त असू शकतात. पती/पत्नी, मुले, आईवडील, दूरचा/जवळचा नातेवाईक किंवा मित्र यांपैकी एकाला ‘नॉमिनी’ केले जाते. बँक खात्यासाठी एकच नॉमिनी स्वीकारला जातो. लॉकरसाठी दोन व्यक्तींना ‘नॉमिनी’ करता येऊ शकते. वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे नॉमिनी करता येतात.
शेअर ः एकाच्या नावे किंवा संयुक्त नावे घेता येतात. नॉमिनी शक्यतो नातेवाईक असावा. एकाच व्यक्तीला नॉमिनी करता येते. नॉमिनी ही शेअरधारक होऊ शकते.

म्युच्युअल फंड ः 1 ते 2 व्यक्तींना ‘नॉमिनी’ करता येते. ‘नॉमिनी’ कोणीही चालतो. चॅरिटेबल किंवा धार्मिक ट्रस्टलाही ‘नॉमिनी’ करता येते. जास्तीत जास्त तीन व्यक्तींना त्यांच्या वाटपाच्या प्रमाणासह ‘नॉमिनी’ करता येते. ‘नॉमिनी’ म्युच्युअल फंडाची युनिटधारक होऊ शकते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ः एकाच नावे खाते उघडता येते. ‘नॉमिनी’ शक्यतो कुटुंबाचा सदस्य असावा. अनेक नॉमिनी असल्यास त्यांना दिलेल्या हिश्श्यानुसार मालमत्तेची काळजी घ्यावी लागते. कायदेशीर वारसांना योग्य वाटप करावे लागते.

कर्मचारी भविष्य निर्वाह फंड (ईपीएफ) ः एकच व्यक्तीच्या नावे खाते असते. नोकरदाराच्या नावे खाते असते. ‘नॉमिनी’ घरातील सदस्य असावा. एक किंवा जास्त व्यक्तींना त्यांच्यातील वाटपाच्या प्रमाणासह नामनिर्देशित व्यक्तीला फंडातील रक्कम मिळते. कुटुंब नसेल तर तो कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना भविष्य निर्वाह निधीधारक नॉमिनी करू शकतो.

जर ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल तर ठराविक रकमेपर्यंतचा दावा बँकेचा शाखाधिकारी त्याच्या अधिकारात संमत करू शकतो. पण रक्कम जर जास्त असेल व ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल तर मात्र उत्तराधिकारी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मृत व्यक्तीची रक्कम कायदेशीर वारसाला मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक गुंतवणुकीत आवर्जून नॉमिनेशन करावे.