यंदाचा फेब्रुवारी महिना गोव्यासाठी सर्वात उष्ण

0
21

>> गेल्या 50 वर्षातील ठरले विक्रमी तापमान

गोव्यातील यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या 50 वर्षातील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात मुरगाव तालुक्यातील तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असणारे दिवसही गेल्या 54 वर्षांतील सर्वाधिक होते.
हे दिवस 8 होते, असे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील राजधानी पणजी तसेच मुरगाव तालुक्यातील कमाल व किमान तापमान हे 1969 नंतरपासूनचे सर्वाधिक होते.

यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात रणरणत्या उन्हाचा व असह्य अशा उष्म्याचा अनुभव गोवाभरातील जनतेने घेतला.
यंदा फेब्रुवारी महिन्यात कित्येकदा राजधानी पणजी तसेच अन्य काही शहरातील तापमान 35 अंश सेल्सिअसपासून 36 अंश सेल्सिअसच्याही वर गेल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर यंदाचा उन्हाळा हा असह्य उकाड्याचा असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

देशात उष्णतेच्या लाटेचा इशारा

या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याने गरमीचे मागच्या 122 वर्षांचे सगळे विक्रम मोडले आहेत. हवामान तज्ज्ञांनुसार पुढच्या 3 महिन्यांमध्ये उन्हाळा नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. 1 मार्चपासून संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. देशाच्या अनेक भागांमधलं तापमान मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असण्याचा आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर-पूर्व, पूर्व आणि मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागातही मार्च महिन्यापासून तापमानामध्ये वाढ होईल. पुढच्या तीन महिन्यांमध्ये वाढलेल्या तापमानाचा परिणाम जनजीवनावरही होईल. दक्षिण भारत, मध्य भारताचा काही भाग, पश्चिम आणि उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचे परिणाम जाणवतील असा इशारा दिला आहे. पुढच्या तीन महिन्यांमध्ये दिवसाचंच नाही तर रात्रीचे सरासरी तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळच्या काही भागात भीषण उन्हाळ्याची शक्यता आहे. तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उन्हाळ्याच्या लाटेसह रात्रीचे तापमानही जास्त असेल.