आतापर्यंत पाच संशयितांना अटक
गेल्या आठवड्यात गणेशपुरी, म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणाला पाच दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती मुख्य दरोडेखोर लागलेले नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे, मात्र या पाचजणांनी दरोड्यामध्ये मदतनीसाची भूमिका बजावली होती अशी पोलिसांनी माहिती दिली. त्यामुळे सध्या पोलिसांसमोर मुख्य दरोडेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान आहे.
मिळालेल्या माहितीनुसार
हैदराबाद येथे अटक केलेल्या पाचही संशयितांना घेऊन पोलिसांची काही पथके माघारी परतली आहेत. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलीस तपासाची दिशा ठरवणार आहेत. मुख्य दरोडेखोर भूमिगत झाले असून त्यामुळे पोलीस तपासात अडचणी येत आहेत.
मुख्य दरोडेखोर अद्याप मोकाटच आहेत. पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्या देखरेखीखाली उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, म्हापसाचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा व गुन्हा शाखेचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे, मात्र त्यांच्याकडून काय माहिती मिळाली ते अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, संशयित दरोडेखोरांची रेखाचित्रे आणि तांत्रिक माध्यमाच्या आधारे पाच संशयितांचा मागोवा काढत त्यांना अटक केली आहे. मात्र हे संशयित मुख्य दरोडेखोर नसून या दरोड्यात संशयितांना मदत करणारे आहेत. पोलिसांकडून त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
गेल्या मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी पहाटे डॉ. घाणेकर यांच्या घरावर सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी दरोडा घालून घाणेकर कुटुंबियांना बंधक बनवून 35 लाखांचा मुद्देमाल पळवला होता.

