म्हापशातील स्फोट सिलिंडर गॅस गळतीमुळेच

0
3

डांगी कॉलनी, म्हापसा येथील ब्रीज अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये स्फोट होऊन मोठे नुकसान झाले होते. हा स्फोट सिलिंडरमधील गॅस गळतीमुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यावर तपासाअंती काल अग्निशामक दल व म्हापसा पोलिसांनी शिक्कामोर्तब केले. हा बॉम्बस्फोट नसून, गॅस सिलिंडरच्या वाहिनीमध्ये गळती लागल्यामुळे हा स्फोट झाल्याचे म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी
स्पष्ट केले.

रविवारी पहाटे हा स्फोट झाला होता, त्यात शेजारील काही घरांच्या भिंतींना तडे, तर काहींची काचेची तावदाने फुटली होती. तसेच काही दुचाकी व चारचाकींचे नुकसान झाले होते. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत उलगडा झाला नव्हता.
याबाबत काल पत्रकार परिषदेत बॉस्को फेर्राव यांनी माहिती दिली. आपण घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, त्यात सिलिंडरच्या गॅसचे वहन करणाऱ्या वाहिनीला गळती लागली होती असे दिसून आले. तसेच ती वाहिनी आयएसआय प्रमाणित नव्हती. या गळतीमुळेच स्फोट झाला, असे फेर्राव यांनी
सांगितले.

दरम्यान, सदर बार अँड रेस्टॉरंटच्या मालक मयेकर यांनी घातपाताचा संशय व्यक्त करून कुणीतरी ही आग लावल्याचे म्हटले होते; मात्र म्हापसा पोलीस व अग्निशामक दलाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला.

म्हापसा येथील स्फोट दुर्घटनेला जबाबदार असलेल्यावर योग्य कारवाई केली जाणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

  • डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

म्हापसा येथील सिलिंडर स्फोटामागे संशय घेण्यासारखे काहीच कारण नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एफएसएलने केलेल्या पाहणीत सुरक्षा उपाययोजना करण्यात न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • जसपाल सिंग, पोलीस महासंचालक.