म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रिय जलशक्ती मंत्र्यांची भेट

0
120

>> गोव्याला विश्‍वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन गोवा सरकारला विश्वासात घेतल्याशिवाय कर्नाटकच्या म्हादई नदीवरील कुठल्याही प्रस्तावावर निर्णय घेऊ नये, अशी मागणी काल केली.यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची उपस्थिती होती. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई पाणी तंटा लवादाचा निवाडा अधिसूचित केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारचा निवाड्याच्या कार्यवाहीला स्थगिती देणारा अर्ज फेटाळल्याने नाराजीत वाढ झाली आहे. विरोधकांकडून भाजप सरकार, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर म्हादई प्रश्‍नी निष्क्रियतेचा आरोप केला आहे. कर्नाटक सरकारने म्हादई नदीवरील कळसा, भांडुरा प्रकल्प हाती घेण्यासाठी जोरदार हालचाल सुरू केलेली आहे. तसेच, कर्नाटक सरकारने वार्षिक अर्थसंकल्पात म्हादई नदीवरील विविध प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद गुरूवारी केली आहे.

मोपा विमानतळासंदर्भात चर्चा
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा बांधकामाबाबत चर्चा केली. तसेच, गोवा विमानतळाच्या परिसरातील बांधकामांसंदर्भात स्थानिकांच्या समस्यांकडे केंद्रीय राज्यमंत्री पुरी यांचे लक्ष वेधण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. दरम्यान, मोपाचे सुरू असलेले काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.