>> वास्कोत भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक
कायदेशीर, राजकीय, तांत्रिक अशा सर्वच बाबींच्या आधारे सरकार म्हादई हा विषय पूर्णत्वास नेणार आहे. आम्ही सभागृह समिती स्थापन केली आहेे. ती समिती म्हादई विषयाचा पाठपुरावा करणार आहे. ज्याला म्हादई विषयी बाबतीत माहिती आहे त्यांनी पुढे येऊन सरकारचे हात मजबूत करावेत. महाराष्ट्र सरकार आमच्याबरोबर आहे. ही लढाई आम्ही जिंकणारच असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
काल वास्कोत भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. वास्कोत भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक आज रविवारी (दि. 22) रोजी हॉटेल एचक्यूमध्ये संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी खास उपस्थिती लावली.
या बैठकीची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रोहन खवंटे, मंत्री माविन गुदिन्हो आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीला वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, मुरगाव मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर, वास्को मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, दाबोळी मंडळ अध्यक्ष संदीप सुद, मुरगावचे प्रभारी जयंत जाधव तसेच आजी-माजी मंत्री आमदार व नेतेमंडळी उपस्थित होते.
संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, बैठकीत लोककल्याण, विकास संबंधी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी दिली.
नड्डा यांचे अभिनंदन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची फेरनिवड झाल्याबद्दल यावेळी अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पक्ष आणखी एक विजय नोंदवत आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थान प्राप्त करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मानव विकास आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत कार्यकारिणी समाधान व्यक्त करत असल्याचाही ठराव घेण्यात आला.
मोदींचे अभिनंदन
यंदाचे जी-20 अध्यक्षपद मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले. झुआरी पूल, मोप विमानतळ, आयुष इस्पितळाचे उद्घाटन, मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेला मिळालेला प्रतिसाद याबाबत यावेळी सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबद्दल कार्यकारिणीत समाधान
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार राज्याच्या वाढ आणि विकासाच्या विविध मापदंडांवर नवीन उंची गाठत आहे याबद्दल कार्यकारिणीत समाधान व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या प्रमुख कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन आणि त्या अनुषंगाने स्वयंपूर्ण गोवा उपक्रम राबविल्याने तळागाळातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल असे तानावडेे यांनी सांगितले.