मोपा विमानतळाजवळ सनबर्न महोत्सवासाठी हालचाली सुरू

0
43

सनबर्न ईडीएम संगीत महोत्सव मोपा विमानतळाच्या जवळील जागेत आयोजित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या 28 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान सनबर्न संगीत महोत्सव घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे; मात्र सनबर्न महोत्सवाचे स्थळ अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

गेली कित्येक वर्षे सनबर्न संगीत महोत्सवाचे वागातोर येथे आयोजन केले जात आहे. या संगीत महोत्सवामुळे किनारी भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने संगीत महोत्सव अन्य ठिकाणी आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सनबर्न संगीत महोत्सव मोपा येथे विमानतळाजवळ आयोजित करण्यासाठी हालचाल सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
सनबर्न संगीत महोत्सवासाठी जीएमआर कंपनीने जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या संयोजकाने मोपा येथे सनबर्न आयोजित करण्यासाठी मान्यता मिळविण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्राथमिक चर्चा केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.