>> विमानाचे लँडिंगही यशस्वी
>> हवाई वाहतुकीसाठी विमानतळ सज्ज
राज्यातील नवीन मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाची आरएनपी (आवश्यक नेव्हिगेशन परफॉर्मन्स) प्रक्रिया यशस्वीरीत्या काल दि. ५ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली असून पहिले व्यावसायिक विमान मोप आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि विमानाने उड्डाणही केले.
जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीजीआयएएल), जीएमआर एअरपोर्टस् लिमिटेडच्या (जीएएल) उपकंपनीने येथे नव्याने बांधलेल्या धावपट्टीच्या १० आणि २८ या दोन्ही पद्धतींसाठी आरएनपी (आवश्यक नेव्हिगेशन परफॉर्मन्स) प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस ३२० विमानाने आरएनपी उपकरणांनी सुसज्ज असलेल्या आरएनपीची अचूकता आणि उड्डाण क्षमता तपासली आणि प्रमाणित केली आहे, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.
मोपा या नवीन गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवश्यक नेव्हिगेशन परफॉर्मन्स प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आरएनपी अखंडता आणि अचूकता निश्चित करतो आणि बोर्ड उपकरणे वापरून विमानाला विशिष्ट मार्गांचे अनुसरण करण्यास मदत करतो. ही प्रक्रिया ऑपरेशनल कार्यक्षमता देखील वाढवते, अशी माहिती जीजीआयएएलचे सीईओ आर. व्ही. शेषन यांनी दिली. या यशस्वी उड्डाणामुळे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आमच्या टीमने विमानतळ सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, असेही त्यांनी सांगितले.
खड्ड्यांमुळे रनवेला धोका?
मोपा विमानतळ पठारावर नैसर्गिक पोकळी असलेले खड्डे असल्याचे यापूर्वीच मोपा विमानतळ पंचक्रोशी जनसंघटनेने सरकारला निवेदन दिले आहे. त्यानुसार या समितीचे सरचिटणीस बया वरक यांनी वेळोवेळी सरकारला स्मरणपत्रे पाठवून अगोदर या असलेल्या खड्ड्यांचा शोध घ्यावा अशी मागणी केली. चार दिवसांपूर्वी विमानतळ रनवेला मोठ्या प्रमाणात खड्डा पडल्याने दोनशे ट्रक माती घालून तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. हा खड्डा म्हणजे ही नैसर्गिक पोकळीच असून भविष्यात रनवेला मोठ्या प्रमाणात धोका असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
सर्वांगीण विकासाचे स्वप्न
लवकरच पूर्ण ः मुख्यमंत्री
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रथम चाचणी लॅडिंग आणि उड्डाण यशस्वी झाले असून गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे पायाभूत सुविधांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केली. इंडिगो एअरलाईन्सच्या व्यावसायिक विमानाचे मोपा विमानतळावर यशस्वी लॅण्डिंग व उड्डाण केले आहे. मुंबईहून डीजीसीएच्या अधिकार्यांना घेऊन विमान मोपा विमानतळाच्या नवीन धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरले, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.
जमीन दिलेल्यांना योग्य मोबदला नाही
मोप विमानतळाच्या कामाला २०१६ साली सुरूवात करण्यात आली होती. गेल्या सहा वर्षांपासून हे काम सुरू आहे. या विमानतळाच्याकामाला स्थानिक शेतकर्यांनी विरोध दर्शवला आहे. मोप विमानतळासाठी सरकारने एक कोटीपेक्षा जास्त चौरस मीटर जमीन संपादन केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन शेतकर्यांनी आणि जमीनदारांनी दिली असली तरी त्यांना अजून योग्य तो मोबदला दिला गेला नाही. त्यामुळे हे पीडित शेतकरी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.