मोदी अमेरिकेत

0
16

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका भेटीवर रवाना झाले आहेत. मुख्यतः क्वाड म्हणजेच अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान ह्या चार देशांच्या परिषदेसाठी मोदींची ही अमेरिका भेट आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या यजमानपदाखाली त्यांच्याच विमिंग्टन ह्या गावी ही परिषद होणार आहे. ह्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ‘समिट ऑफ फ्यूचर’ ह्या भविष्यवेधी अधिवेशनातील त्यांची उपस्थिती, अमेरिकस्थ भारतीयांच्या लाँग आयलंड येथील अधिवेशनातील उपस्थिती, जॉर्डनच्या राजाच्या यजमानपदाखालील दहशतवादविरोधी बैठकीतील उपस्थिती असा मोदी यांचा ह्या तीन दिवसांतील भरगच्च कार्यक्रम आहे. अलीकडेच भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे एकीकडे रशियाशी हातमिळवणी करणारा भारत दुसरीकडे महासत्ता अमेरिकेशी असलेले आपले संबंध कसे कायम राखतो ह्याचे दर्शन मोदींच्या ह्या भेटीत निश्चित घडेल. क्वाड देशांच्या परिषदांचे ब्रीदवाक्यच पीस, प्रोग्रेस अँड प्रॉस्पॅरिटी असे आहे. म्हणजेच आपल्या इंडो पॅसिफिक उपखंडातील शांतता, प्रगती आणि समृद्धी ह्यासाठी हा चार देशांचा गट सक्रिय असतो. टोकयोमध्ये मागे झालेल्या क्वाड देशांच्या परिषदेनंतर तेथे आखण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी किती प्रत्यक्षात उतरला आणि अजून काय करायचे आहे, त्यावर ह्या पुढील बैठकीत चर्चा होईल. हवामान बदलापासून आरोग्यापर्यंत आणि तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानापासून सुरक्षेपर्यंत अनेक विषयांवर ह्या चारही देशांमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर सहमती झालेली आहे. त्यामुळे ह्या येणाऱ्या परिषदेतूनही काही ठोस फलनिष्पत्ती घडेल अशी अपेक्षा आहे. 2004 साली हिंद महासागरात आलेल्या त्सुनामीनंतर ह्या चारही देशांनी परस्पर सहकार्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांची त्यात मोलाची भूमिका होती. त्यानंतर कोवीडकाळातही क्वाड देशांनी परस्परांना सहकार्य केले. आता सध्या एकीकडे रशिया – युक्रेन, तर दुसरीकडे इस्रायल – हमास युद्धाचा भडका उडालेला असल्याच्या पार्श्वभूमीवर हे चार देश एकत्र येत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा कार्यकाळ यंदा संपतो आहे. फेरनिवडणुकीला ते उभे नाहीत. जपानचे पंतप्रधान किशिदा ह्यांचाही कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्या देशांच्या निवडणुकांचे निकाल काय लागतात त्यावर ह्या क्वाड परिषदेतील निर्णयांच्या अंमलबजावणीचे भवितव्य खरे तर अवलंबून आहे. अमेरिकेत बायडन यांच्या पक्षाच्या वतीने कमला हॅरीस निवडणूक लढवत आहेत. त्या भारतीय वंशाच्या आहेत. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा रिंगणात आहेत आणि गेल्यावेळी मोदींनी ट्रम्प यांच्याशी अमेरिकस्थ भारतीयांच्या अधिवेशनात हातमिळवणी करूनही शेवटी निवडणुकीट बायडन निवडून आले होते. यावेळीही मोदींच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प यांना भेटण्याचा कार्यक्रम आहे. येणाऱ्या निवडणुका, ट्रम्प यांच्यावर लागोपाठ झालेले दोन प्राणघातक हल्ले ह्या पार्श्वभूमीवर ह्या मोदी – ट्रम्प भेटीकडेही जगाचे लक्ष आहे. भारताला ह्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली कामगिरी जगापुढे मांडण्याची संधी मिळत असते. पंतप्रधान मोदींना यावेळी आपल्या सरकारने जाहीर केलेल्या आयुष्मान भारत ह्या सत्तर वर्षांवरील सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना विमा संरक्षण पुरविणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या, सरकार पुरस्कृत महत्त्वाकांक्षी आयुर्विमा योजनेची माहिती जगापुढे ठेवण्याची संधी लाभणार आहे. सौरऊर्जेच्या वापरासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेले प्रयत्न आणि त्याला भारताने दिलेली साथ हा विषयही ह्या वेळी जगापुढे मांडला जाण्याची शक्यता आहे. औषधांसंदर्भात काही महत्त्वाचे करारमदार, तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी चर्चा असे अनेक विषय मोदींच्या ह्या अमेरिका दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये आहेत. लाँग आयलंडमधील अमेरिकस्थ भारतीयांची भेट ही लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा भारतात सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदींसाठी महत्त्वाची आहे ह्यात शंका नाही. अमेरिकेतील भारतीयांचे तेथील अर्थव्यवस्थेला, बुद्धिमत्तेला मोठे योगदान राहिले आहे. अमेरिकेतील सत्तर टक्के भारतीय हे उच्चशिक्षित किंवा किमान पदवीधर आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण केवळ 36 टक्के आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तेथील भारतीय दीड टक्का असले, तरी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अमेरिकेच्या येणाऱ्या निवडणुकीनंतर नव्याने सत्तेवर येणाऱ्या सरकारचा भारताबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक राहावा यासाठी पूर्वपीठिका निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदींकडून ह्या दौऱ्यात होईल अशी अपेक्षा करूया.