मोदींची 9 वर्षे

0
12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळास काल नऊ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने या सरकारने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याची माहिती देशभरात पोहोचवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे आणि त्यानुसार देशभरात कार्यक्रम होत आहेत. मोदींचा कार्यकाळ हा निश्चितच देशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि देशाचा इतिहासाला कलाटणी देणारा असा कालखंड आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षांतील हे एक असे पर्व आहे, ज्याचे स्मरण येणाऱ्या काळाला ठेवावेच लागणार आहे. मोदींच्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळातील विविध उपलब्धी आपल्यासमोर आहेच. त्याचा केवळ एक धावता आढावा यानिमित्ताने घेणे अप्रस्तुत ठरू नये. सर्वांत महत्त्वाची जी गोष्ट त्यांच्या कार्यकाळात घडली असेल, तर ती म्हणजे जगभरामध्ये भारताची उंचावलेली प्रतिमा. जगभरातील छोट्या मोठ्या देशांमधील पंतप्रधानांचे दौरे, तेथील भारतीयांशी त्यांचा साधला जाणारा सुसंवाद, तेथे होणारे जंगी स्वागत, या साऱ्यातून भारताविषयीची एक सकारात्मक प्रतिमा अवघ्या जगात उभी राहिली आहे आणि त्याचा फायदा भारताला आणि भारतीयांना मिळू लागला आहे. मोदीपर्वाची दुसरी सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादावर त्यांनी मिळवलेले नियंत्रण. त्यांचे सरकार येण्यापूर्वीच्या काळातील देशांतर्गत आणि सीमेपलीकडील दहशतवादाच्या भीषण झळा देशाला सोसाव्या लागल्या होत्या. मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून देशांतर्गत दहशतवादाची आणि त्याच्या आर्थिक रसदीची मानगूट अचूकपणे पकडली गेली आणि परिणामी दहशतवादाच्या ठिकठिकाणच्या स्लीपर सेल आणि मॉड्यूल्स उद्ध्वस्त झाली. देशातील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला जरब बसवणाऱ्या सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटच्या कारवाईने सीमेपारच्या दहशतवादाचा कणाच मोडून टाकला आहे. त्यांची वळवळ पूर्णांशाने जरी थांबलेली नसली, तरी भारत आपल्यावरील हल्ले निमूट सोसणार नाही हा संदेश निश्चितपणे देशाच्या हितशत्रूंना गेला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधनसुविधा विकासावर आणि तंत्रज्ञानावर दिला गेलेला भर. तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे आज सरकारी कार्यालयांचा चेहरामोहराच पालटून गेला आहे. साधनसुविधा विकासाचे फार मोठे काम देशभरामध्ये सुरू आहे. पूल, बोगदे, महामार्ग, वंदेभारतसारख्या आधुनिक रेलगाड्या, नवे विमानतळ या साऱ्यामधून एक नवा भारत उदयाला येतो आहे. त्यांच्या सरकारने केलेले संकल्प समाजाच्या तळागाळाला स्पर्श करून जाणारे आहेत यातही काही शंका नाही. जनधन, उज्ज्वला, आयुष्मान भारत, स्वच्छ भारत, जनऔषधी अशा ज्या ज्या योजनांचा संकल्प मोदींनी आखला, त्यातून देशाच्या चौफेर विकासाची आसच प्रकटली. आता यापैकी काही योजना प्रत्यक्षात किती आल्या आणि कागदावर किती राहिल्या याचा लेखाजोखाही मांडण्यासारखा आहे, परंतु त्याचा दोष अंमलबजावणीत आहे, संकल्पात नाही. मोदींनी देशात घडविलेले सांस्कृतिक पुनर्जागरण, प्राचीन सांस्कृतिक मूल्यांना केंद्रस्थानी आणणे वगैरेंबाबत वाद होऊ शकतात, परंतु त्यातून प्राचीन भारतीय मूल्यांना आकर्षक स्वरूपात जगापुढे प्रस्तुत करून भारताची एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे हेही विसरून चालणार नाही. जागतिक योग दिवसापासून वसुधैव कुटुंबकमसारख्या आपल्या विचारसरणीपर्यंत भारताची मानवकल्याणकारी उदात्त प्रतिमा जगापुढे ठळकपणे आली आहे. आत्मनिर्भर भारतच्या संकल्पांतर्गत संरक्षणापासून सेमीकंडक्टरपर्यंत देश स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेली पावलेही महत्त्वपूर्ण ठरतात. नोटबंदी, जम्मू काश्मीरचे कलम 370 हटवणे, राममंदिराची उभारणी, बालाकोटची कारवाई अशा बेधडक गोष्टी कोणाला रुचोत, न रुचोत, परंतु त्याचे स्मरण येणाऱ्या भविष्यात सदैव राहील. कोरोनासारख्या महामारीला देश समर्थपणे तोंड देऊ शकला तोही मोदींसारखे कणखर नेतृत्व देशाला लाभल्यामुळे. विरोधकांकडून त्यांच्यावर होणारा एकचालकानुवर्तीत्वाचा आरोप, ईडी, सीबीआय, आयकरासारख्या केेंद्रीय यंत्रणांचा विरोधकांविरुद्ध होणाऱ्या वापराबद्दलची तक्रार, बड्या उद्योगपतींशी हितसंबंध असल्याची, इव्हेंटबाजीचा सोस असल्याची टीका ह्या सगळ्या मुद्द्यांवरही चर्चा जरूर होऊ शकते, परंतु गेल्या नऊ वर्षांतील आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय जनतेचे जीवन सुखकारक करण्यासाठीच घेतला असे काल पंतप्रधान म्हणाले ते खोटे नाही. त्यांनी घेतलेले सगळेच निर्णय योग्य होते असे नव्हे, परंतु त्यामागील लोकहिताची आकांक्षा प्रामाणिक नव्हती असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल.