मूकबधिरांनाही द्या सामान्य जीवन जगण्याचा हक्क!

0
9

डॉ. मनाली म. पवार

बहिरेपणाचा- मुकेपणाचा त्रास असलेले लोक सांकेतिक भाषा शिकून, आणि विशेष प्रशिक्षणाच्या मदतीने इतर लोकांशी संवाद साधू शकतात. मात्र यासाठी केवळ मूकबधिरपणाचा सामना करणाऱ्या लोकांनाच नाही तर त्याच्याशी संबंधित लोकांनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून मूकबधिरांना सामान्य जीवन जगता येईल.

26 सप्टेंबर हा जागतिक मूकबधिर दिवस म्हणून ओळखला जातो. परंतु आताच्या काळात साधारण सप्टेंबर महिन्याचा शेवटचा सप्ताह हा मूकबधिर सप्ताह म्हणून ओळखला जातो. जागतिक मूकबधिर संघटना ‘डब्ल्यूएफडी’ने वर्ष 1958 पासून जागतिक मूकबधिर दिवसाला सुरुवात केली. या दिवसांमध्ये मूकबधिर नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक व राजनीतिक अधिकारांप्रति लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासोबत, समाजात आणि देशभरात त्यांच्या उपयोगितेबद्दल पण सांगितले जाते.
काही शारीरिक व्यंगे ही बघताक्षणी दिसून येतात. उदा. अंधत्व, अपंगत्व, तिरळेपणा. परंतु कर्णबधिरता हे अदृश्य असे व्यंग आहे. ध्वनिलहरींचे वहन आंतरकर्णापासून मेंदूपर्यंत पोहोचत नसल्याने कर्णबधिरपणा येतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 32 कोटी 80 लाख इतक्या व्यक्तींना कर्णबधिरत्व आहे. हे प्रमाण एकूण टक्केवारीच्या 5 टक्के इतके आहे. भारतात हे प्रमाण 0.1 टक्के इतके आहे.

कोणतेही व्यंग असलेली व्यक्ती किंवा शारीरिकरीत्या विकलांग असलेल्या व्यक्तीला सर्वसामान्यासारखेच जगण्याचा अधिकार आहे हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतले पाहिजे व ते आचरणात आणले पाहिजे. अशा व्यक्तींना सहानुभूतीची नाही तर प्रोत्साहनाची गरज असते. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की कुठलीच व्यक्ती शारीरिकरीत्या विकलांग राहू शकत नाही. गरज आहे ती प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून अशा व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची. सहानुभूती दाखवून त्याच्या मनाचे खच्चीकरण न करता त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन, पंखांना बळ देण्याची गरज असते. त्यामुळे सर्वप्रथम सर्वांनी एका गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे की, हा दिवस मूकबधिर नागरिकांना सांत्वन देण्यासाठी नाही, तर त्यांच्या जीवनात एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे. मूकबधिर असणे कोणत्याही प्रकारचे अपंगत्व किंवा कमजोरी नाही. त्याच्यामधील संभाषणाचे माध्यम वेगळे असते एवढेच.

काहीवेळा अशा व्यक्तींना प्रबोधनाच्या अभावामुळे पुढे हे व्यंग घेऊनच आयुष्य कंठावे लागते. समाजात आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या अपंग व्यक्तींच्या धडपडीची धडधाकट असलेली माणसे किती दखल घेतात, असा कधी कधी प्रश्न पडतो. प्रवासीगाड्यांमध्ये अपंगांच्या जागी होणारी धडधाकटांची घुसखोरी पाहिली की शरमेने मान खाली जाते. स्वतःपुरतेच बघण्याची वृत्ती इतकी टोकाला जाते की शारीरिकदृष्ट्या दुर्बल अशा या घटकांना आपण मदतीचा हात दिला पाहिजे, हे भानच राहत नाही. त्यांचा हक्क त्यांना प्राथमिकतेने प्रत्येक ठिकाणी दिला गेला पाहिजे.

मूकबधिर मुलांना शिकवण्याच्या ज्या अनेक पद्धती आहेत, त्यातील प्रमुख पद्धत आहे ती खुणांनी शिकवण्याची आणि दुसरी ओठांच्या हालचाली समजून घेऊन त्यानुसार अर्थ लावण्याची. त्यांना ऐकू येत नसल्यामुळे ते शब्द ग्रहण करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना भाषा येत नसते. अशावेळी त्यांना एकेक शब्द शिकवण्यासाठी असंख्य प्रयत्न करावे लागतात. पुण्या-मुंबईत या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत. परंतु लहान गावांमध्ये अशा सोयीच नसतात. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षण देणे ही तेथील पालकांसमोर मोठीच अडचण असते. पण या सर्व अडचणींवर मात करीत विद्यार्थी यश मिळवत असतात. आपणही सर्वसामान्य मुलांइतकेच सक्षम आहोत हे दाखवण्याचा अशा मुलांचा सतत प्रयत्न असतो. मात्र आपण या प्रयत्नांकडे कौतुकाने पाहण्याचे सोडून एका वेगळ्याच नजरेने त्यांच्याकडे पाहतो. याचाच अर्थ आपल्या त्यांच्याप्रति संवेदना बधिर होत चालल्या आहेत.

जागतिक मूकबधिर दिनाची सुरुवात रोम, इटली येथे 1958 मध्ये झाली. 1959 मध्ये जागतिक मूकबधिर संघटनेला संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली. तेव्हापासून दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा जागतिक कर्णबधिर सप्ताह म्हणून साजरा करतो. बहिरेपणाची कारणे, उपचार आणि व्यवस्थापन यांबाबत सर्वसामान्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यापासून त्रस्त असलेल्यांना सर्वतोपरी मदत करणे आणि त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य ठरते. पण प्रबोधनाअभावी तसे होताना दिसत नाही.

कर्णबधिरांना इतरांशी संवाद साधणे सोपे व्हावे या उद्देशाने 2018 मधील इंटरनॅशनल वीक ऑफ द डेफ दरम्यान आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषेलाही मान्यता देण्यात आली. बहिरेपणाची कारणे समजून घेणे आणि त्यावर वेळीच उपचार करण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच कर्णबधिरांना समाजात आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्याची संधी निर्माण करणे आवश्यक आहे.

आता थोडे बहिरेपणाविषयी जाणून घेऊ. बहिरेपणा दोन प्रकारचा असतो. ध्वनिलहरीच्या वहनाशी संबंधित (कन्डक्टिव्ह) किंवा त्यांच्या संवेदनांशी संबंधित (सेन्सॉरीन्यूरल). यातील पहिल्या प्रकारचा बहिरेपणा हा बाह्य किंवा मध्यकर्णाला इजा झाल्यामुळे निर्माण होतो. डॉक्टरी उपचारांनी ते सहज बरे होऊ शकतात. पण ध्वनिलहरींच्या संवेदनांशी संबंधित दोष असल्यास त्यासाठी कृत्रिम उपकरणांचा वापर करावा लागतो.

अनेकदा बहिरेपणा जन्मजात असतो. गर्भारपणात आईने घेतलेली स्टिरॉइडस्‌‍सारखी औषधे, गर्भारपणातले आजार किंवा जनुकीय दोष अशी त्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. हे बहिरेपण लवकर लक्षात येणे आवश्यक असते. मोठ्या आवाजाने दचकणे, आवाजाला प्रतिसाद देत डोळे मिचकावणे, तिसऱ्या महिन्यानंतर ओळखीच्या आवाजाकडे तोंड वळवणे अशा क्रिया मूल करीत नसले तर त्याच्या श्रवणक्षमतेची चाचणी करून घ्यावी. आता सर्व वयोगटाच्या व्यक्तींसाठी अशा चाचण्या करणारी यंत्रे उपलब्ध असल्याने आपल्या श्रवणक्षमतेचा नेमका अंदाज प्रत्येकाला येऊ शकतो. बहिरेपणा जन्मजात असेल आणि शस्त्रक्रियेने तो दूर होण्यासारखा नसेल तर तेव्हा श्रवणयंत्रे आणि कर्णबधिरांसाठीच्या खास शाळांच्या माध्यमातून अशा मुलांचे पुनर्वसन करता येऊ शकते.

सतत येणारा खूप ताप, मेंदुज्वर, सेरेब्रल मलेरिया यांसारख्या काही आजारांमुळेही अनेकदा बोलू लागण्यापूर्वीच मुलांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींतही अशा आजारांमुळे बहिरेपणा निर्माण झाल्याचे दिसते. तसेच कामाच्या जागी सातत्याने मोठा आवाज कानावर आदळत राहिल्याने काही विशिष्ट कंपनेच्या ध्वनिलहरी ग्रहण करण्याची क्षमता कान गमावून बसतो. अशा आंशिक बहिरेपणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कानांचे रक्षण करण्यासाठी उपलब्ध असणारी हेडफोनसारखी उपकरणे वापरणे अशावेळी महत्त्वाचे ठरते.

आयुर्वेदशास्त्राप्रमाणे पंचज्ञानेंद्रियांपैकी श्रोतेंद्रियांचे अधिष्ठान म्हणजे कान, तसेच पंचमहाभूतांपैकी आकाश महाभूताचा संबंध श्रोतेंद्रियांशी आहे. जेथे जेथे आकाश म्हणजे पोकळी आहे तेथे प्रत्येक ठिकाणी वायूचे साहचर्य असते. म्हणून कानांच्या आरोग्यासाठी कानात वातदोष वाढत नाही ना याची दक्षता घेणे महत्त्वाचे असते. अशा लोकांना ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नाही. लौकिकार्थाने मूकबधिर म्हणूनच त्यांची गणना होते. स्वतःच्या या व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेली अशी मुले कुचेष्टेच्या भीतीने सामान्यजनांपासून चार हात दूर राहणे पसंत करतात. त्यांना शक्यतो घरातल्या घरातच मार्गदर्शन करावे. काही मुलांना ‘स्पीच थेरपी’चा फायदा होतो.

आज अशा अपंगत्वावर मात करण्यासाठी विविध खास शाळा उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ या मुलांनी घ्यावा. बहिरेपणाचा- मुकेपणाचा त्रास असलेले लोक सांकेतिक भाषा शिकून, आणि विशेष प्रशिक्षणाच्या मदतीने इतर लोकांशी संवाद साधू शकतात. मात्र यासाठी केवळ मूकबधिरपणाचा सामना करणाऱ्या लोकांनाच नाही तर त्याच्याशी संबंधित लोक, त्यांचे मित्र आणि इतरांनीही या दिशेने प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मूकबधिरांना सामान्य जीवन जगता येईल.