मालीम येथील प्रस्तावित खासगी जेटीविषयी कल्पना नाही : खंवटे

0
3

8 कोटी रु. खर्चून आपल्या पर्वरी मतदारसंघातील मालीम येथे येऊ घातलेल्या खासगी जेटी प्रकल्पाविषयी आपणाला काहीही माहीत नसल्याचे पर्वरी मतदारसंघाचे आमदार व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासंबंधी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानंतरच आपणाला या प्रकल्पाची माहिती मिळाल्याचे खंवटे यांनी म्हटले आहे.

‘इनलॅण्ड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने वरील प्रकल्पासाठी गेल्या 9 एप्रिल रोजी मरिना इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीला पहिला डिजिटल ना हरकत दाखला दिलेला आहे. आपण स्थानिक आमदार असताना या प्रकल्पासंबंधी कुणीही आपणाला कल्पना दिलेली नाही असे स्पष्ट करून रोहन खंवटे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक लोक तसेच मच्छीमारांनाही याबाबत विश्वासात घ्यायला हवे होते. पण त्याची कुणालाही आवश्यकता वाटली नाही, अशा शब्दांत खंवटे यांनी पुढे बोलताना नाराजी व्यक्त केली.
यासंबंधी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलणार असल्याचे सांगून केंद्रालाही यासंबंधी लिहिणार असून स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेन्ह – द – फ्रान्स
पंचायतीचाही विरोध

दरम्यान, वरील प्रकल्पाबाबत कुणीही आम्हाला काहीही सांगितलेले नसून या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे, असे स्थानिक पंचायत असलेल्या पेन्ह – द – फ्रान्स पंचायतीने म्हटले आहे. याबाबत आम्ही स्थानिक आमदार व मंत्री रोहन खंवटे यांच्याशी बोलणार असून त्याशिवाय मरिना इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीलाही पत्र लिहून या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे कळवणार असल्याचे पंचायतीने स्पष्ट केले आहे.