मायभूमीत कलाकौशल्य साकारण्यास अत्यानंद : सुशांत तारी

0
250

– मुलाखत : महेश गावकर
ष् महोत्सव म्हटला की सजावट ही हटकून असतेच. उत्सवानुरूप केलेली आकर्षक सजावटीमुळे पाहुण्यांचे मन प्रसन्न होते. इफ्फी अर्थात आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा गोव्याची शान वाढविणारा महोत्सव आहे. या महोत्सवाच्या सजावटीची जबाबदारी आपल्यावर सोपविल्यानंतर कसे काय वाटले?
– खूप अत्यानंद झाला. खरं सांगू, कलावंत आपली कलाकृती साकारत असतो. त्यात रमत असतो. गमत असतो. जगण्यातले अनुभव आपल्या कलाकृतीतून रसिकांपुढे मांडत असतो. आपले कलाकौशल्य आपल्या मातीतील लोकांसमोर साकारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ती संधी मला इफ्फीत सजावटीच्या कामामुळे मिळत होती. आपल्या भूमीत कलाविष्कार घडविण्याचा मान एका कलाकाराला सुवर्णापेक्षा मोठा असतो. तो मान मला मिळाला होता. आपल्या मायभूमीत स्वत:च्या कलेचे दर्शन घडविता येणार असल्याने मन हर्षून गेले होते.
ष् आपण एक कलाकार म्हणून गोव्यात प्रसिद्ध आहात. गोवा आपली जन्मभूमी पण खरी कर्मभूमी मुंबई आहे. आपल्याविषयी काही माहिती सांगाल का?– माझा जन्म कलाकारांची भूमी असलेल्या सांतइस्तेव, माशेल या गावी झाला. बालपणापासूनच मला चित्रकलेची आवड होती. चित्रकलेतच चित्रे रेखाटत जीवनप्रवास सुरू झाला. पुढे गोवा कला महाविद्यालयातून १९९० साली फाइन आर्ट्‌सची पदवी मिळविली. करिअर करण्यासाठी नेहमीच मोठ्या संधी शोधायच्या असे माझे मत. म्हणून मुंबई गाठली. सिनेसृष्टीत सजावट करून नाव करण्याची इच्छा होती. इच्छेनुसार भरारी घेण्यासाठी स्व. समीर चंदा, नितीन देसाई आणि अजित पटनाईक यांच्या हाताखाली चित्रपट सृष्टीत सजावटीचे काम केले. सुरूवातीच्या काळात अनुभव घेत शिकत गेलो. अहो, शिकण्याची मनीषा असली की तुम्ही कोणत्याची क्षेत्रात मोठा पल्ला गाठू शकतात. मन लावून शिकत शिकत झेप घेत गेलो. सध्या मुंबईत टीपीटी प्रॉडक्शन प्रा. लि. या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहे.
ष् इफ्फी गोव्यात २००४ साली आला. आतापर्यंत गोवा शासनाने या महोत्सवाच्या यजमानपदाची यशस्वीपणे जबाबदारी पेलली आहे. देशविदेशांतील बॉलिवूड-हॉलिवूडचे कलावंत, दिग्दर्शकांनी इफ्फीची प्रशंसा केली आहे. अजूनतरी या महोत्सवाच्या सजावटीची जबाबदारी गोमंतकीय कलाकाराला मिळाली नव्हती. आपल्याला ती कशी काय प्राप्त झाली?
– चित्रपट सृष्टीशी निगडित कलाविष्कार गोव्यात घडविण्याची इच्छा होती. चित्रनगरी मुंबईत सीनेसृष्टीत सजावट करीत होतो. म्हटलं, गोव्यात इफ्फी भरतोय. तिथे सजावटीचे काम मिळविण्यासाठी का प्रयत्न करू नये? आपल्या भूमितील चित्रप्रेमींना, गोमंतकीय बंधुंना माझ्या कलेची ओळख तरी होईल. यंदाच्या इफ्फी आयोजनाची तयारी जवळ येऊन ठेपली होती. गोवा मनोरंजन सोसायटीने इफ्फी सजावटीची निविदा जाहीर केली होती. आमच्या आस्थापनातर्फे आम्ही निविदेत भाग घेतला आणि आमची निवड झाली.
ष् इफ्फीत देशविदेशी दिग्गज कलाकार, चित्रपट दिग्दर्शकांची मांदियाळी असते. या महोत्सवातील सजावट ही डोळ्यांचे पारणे फेटणारी असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या विषयानुसार सजावट असते. प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यापूर्वी सजावटीची पार्श्‍वभूमी आपण कशी काय जाणून घेतली?
– इफ्फी कला दिग्दर्शक म्हणून माझी इफ्फी संयोजन समितीने निवड केल्यानंतर मला प्रख्यात हस्ती प्रल्हाद कक्कर यांच्यासारख्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी मला सजावटीचा विषय असलेल्या ७० च्या दशकातील चित्रपटांचा विषय समजून सांगून अप्रत्यक्ष संवादातून दर्शन घडविले. त्यानुसार आम्ही ७० सालच्या दशकातील चित्रपटसृष्टीचा प्रवास, कलाकार लक्षात ठेवून सजावटीच्या कामाला प्रारंभ केला. चित्रपटसृष्टीच्या कला दिग्दर्शनाची सवय असल्याने कठीण प्रसंग उद्भवले नाही.
ष् इफ्फीतील सजावट नेहमीच नेत्रदीपक असते. सजावटीचा इफ्फीच्या यशस्वीतेत मोठा वाटा असतो. यंदाच्या इफ्फीतील प्रमुख सजावट कशा प्रकारे केली आहे?
– इफ्फीचे बोधचिन्ह असलेला मयूर सजावटीचा प्रमुख केंद्रबिंदु आहे. इतर सजावट एकंदर सजावटीला हातभार लावणार आहे. इतर सजावटीत ७० च्या दशकातील चित्रपटसृष्टीच्या प्रवासाचा आलेख मांडला जाणार आहे. त्यात ७० च्या दशकात नावाजलेले कलाकार, चित्रपट यांचे दर्शन सजावटीद्वारे घडविण्यात आले आहे.
ष् आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा गोव्यातील एक मोठा महोत्सव! अशा बड्या कार्यक्रमाची सजावट म्हणजे मोठी जबाबदारी असते. विशेष म्हणजे ही सजावट विषयाला धरून असते. एवढी मोठी जबाबदारी आपण कशी काय पेलली? – हे पहा, आम्ही कलाकार मंडळी नेहमीच नाविन्याच्या शोधात असतो. कौशल्याचा कस लावून निर्मिती करण्यास आम्ही उत्सुक असतो. इफ्फीत आम्हांला कलाकौशल्य आमच्या मातीत दाखविण्याची संधी मिळाली. आम्ही ती उमेदिने कष्टाने पेलली आहे. कोणतीही उणिव जाणू न देता जबाबदारी प्रयत्नपूर्वक पार पाडण्यासाठी आमचे १४ फाइन आर्टीस्ट उसंत न घेता रात्र-दिवस कलेत दंग होते. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सुमारे २०० मदतनीस कार्यरत होते. मी पदोपदी त्यांना मार्गदर्शन करीत होतो. हा प्रकल्प पूर्ण करणे सुखद आनंद होता.
ष् सजावट म्हटली की अनेकविध प्रकारचे साहित्य, रंग यांची गरज असते. हल्ली तर प्लॅस्टिकचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आपण इफ्फीत सजावटीसाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले आहे?
– आम्ही इफ्फीत सजावटीसाठी पर्यावरणपुरक साहित्याचा वापर केला आहे. त्यासाठी फायबरग्लास, लाकूड, धातू, कपडा इ. प्रकारच्या साहित्याचा वापर करून सजावट दीपवून टाकणारी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ताज्या टवटवीत फुलांचा वापर सजावटीत करण्यात आलेला नाही. यंदाच्या इफ्फीत रेडकार्पेट पाहुण्या कलाकारांना नवा अनुभव असेल. ते पूर्वीच्या इफ्फीप्रमाणे निश्‍चितच नसेल. यंदाच्या इफ्फीत रेडकार्पेट रंगसंगती केलेले असेल. त्यावरून चालताना पाहुण्यांना वेगळेपणाचा अनुभव येईल. त्याचप्रमाणे आयनॉक्स गेट, कला अकादमी, बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर, पणजी कदंब बसस्थानक अशा ठिकाणी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या कलावंतांचे मोठमोठे स्थापित केलेले ‘कटआउट्‌स’ खास आकर्षण असेल.
ष् मायभूमीत होत असलेल्या आंतराष्ट्रीय महोत्सवात सजावटीची संधी मिळणे म्हणजे मोठा मान. आपले कलाकौशल्य कायम स्मरणात राहावे म्हणून आपण कोणत्या प्रकारे मार्गदर्शन केले?
– आम्ही इफ्फीचा माहोल व संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या सजावटीवर भर दिला आहे. आम्हांला खात्री आहे की, यंदा इफ्फीला येणार्‍या प्रज्ञावंतांचे सजावट पाहून मन प्रसन्न होईल. खरा इफ्फीचा नजारा आम्ही उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी रात्रंदिवस तहान-भूक विसरून श्रम केले आहेत. प्रत्येक कलाकृती तयार करण्यास मी स्वत: जातीने लक्ष घातले आहे. आणि म्हणूनच आकर्षक सजावट अंतिम स्वरूपात कलाप्रेमींना भुरळ पाडत आहे.