‘माझी बस’ प्रवाशांच्या सेवेत

0
2

>> मडगावात शुभारंभ; पहिल्या टप्प्यात 25 खासगी बसेस ताफ्यात

राज्य सरकारच्या ‘माझी बस’ योजनेचा शुभारंभ मडगाव येथे काल करण्यात आला. कदंब महामंडळाने या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 खासगी प्रवासी बसगाड्या चालविण्यासाठी ताब्यात घेतल्या आहेत. ही माझी बस योजना सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहे.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर आणि आमदार दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

सहा महिन्यांत ॲप कार्यान्वित
कदंब महामंडळाच्या नियंत्रणाखाली चालणाऱ्या प्रवासी बसगाड्यांची माहिती प्रवाशांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यात उपलब्ध केली जाणार आहे, असे माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
इंधन अनुदान लवकरच देणार
खासगी बसमालकांचे प्रलंबित इंधन अनुदान लवकर वितरित केले जाणार आहे. जुन्या खासगी बसगाड्या बदलण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित केली जाणार आहे, असेही गुदिन्हो म्हणाले.

पणजीत 48 इलेक्ट्रिक बसेस
स्मार्ट सिटी योजनेखाली पणजी परिसरात 48 इलेक्ट्रिक बसगाड्या आगामी दोन आठवड्यात कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पणजीतील खासगी प्रवासी बसगाड्या माझी बस योजनेखाली इतर प्रवासी मार्गावर चालविण्यात येणार आहेत, असे माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

‘माझी बस’ योजनेत महत्त्वपूर्ण दुरुस्ती
राज्य सरकारने माझी बस योजनेमध्ये दुरुस्ती केली असून, ही योजना प्रवासी बसगाड्या व्यतिरिक्त इतर खासगी बसगाड्यांसाठी देखील खुली केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या बुधवारी झालेल्या बैठकीत माझी बस योजनेमध्ये दुरुस्तीला मान्यता देण्यात आली. आता, ही योजना सर्व खासगी बसगाड्यांसाठी खुली करण्यात आल्याने माझी बस योजनेला चांगला प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.