मागील 3 महिन्यांपासून वीज बिले न भरलेल्यांची ‘बत्ती गुल’

0
6

>> वीजमंत्र्यांकडून वीज जोडण्या तोडण्याची अभियंत्यांना सूचना

ज्या वीज ग्राहकांनी आपली बिले गेल्या तीन महिन्यांपासून भरलेली नाहीत, त्यांच्या वीज जोडण्या तात्काळ तोडण्यात याव्यात, अशी सूचना आपण वीज खात्याचे कनिष्ठ अभियंते व सहाय्यक अभियंत्यांना केली आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली.
वीज बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर आता कडक कारवाई करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. वीज बिले न भरलेल्या ग्राहकांवर कारवाई करण्यात संबंधित वीज अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना त्यासाठी जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही ढवळीकर यांनी दिला.

वीज खात्याने आपल्या ग्राहकांसाठीच्या एकरकमी परतफेड योजनेचा अवधी आणखी एका महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देखील ढवळीकर यांनी दिली. ग्राहकांसाठीची वीज बिल एकरकमी परतफेड योजनेची मुदत मंगळवारी संपल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.