महाराष्ट्रात नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

0
14

महाराष्ट्र राज्यत मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, व इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन खात्यांचा कारभार देण्यात आला असला, तरी त्यांनी काम पाहिलेले महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ग्रामविकास खात्याचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे. सांगलीच्या सुरेश खाडे यांच्याकडे कामगार खाते, तर सातारच्या शंभुराज देसाईंकडे राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्रिपद देण्यात आले आहे.