महागाई नियंत्रणाच्या प्रयत्नांना खीळ : दास

0
8

देशात महागाई कमालीची वाढली आहे. अन्नधान्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे, तर पेट्रोल-डिझेलचे दर काही कमी करण्याचे नाव घेत नाही. अशातच महागाई कमी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याची कबुली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. दास यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात महागाईवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांवर आणण्याचा आरबीआय प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले; परंतु अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती महागाई कमी करण्याची प्रक्रिया संथ करत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. या वाढलेल्या किमतींचा विरोध हा तीव्र असून याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठ्याशी संबंधित आव्हाने असल्याचे ते म्हणाले. अन्नधान्याच्या किमतींवर हवामानाच्या परिस्थितीचाही परिणाम होतो. महागाई कमी करण्याचा प्रवास हा शेवटच्या टप्प्यापर्यंत मंदावत असल्याचे आपण काही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये पाहिले आहे, असेही दास म्हणाले. अन्नधान्य चलनवाढीचा दर कायम आहे. गेल्या सात महिन्यांत अन्नधान्याची सरासरी महागाई 8 टक्क्यांच्या आसपास आहे, असेही दास यांनी नमूद केले.