मशाल विरुद्ध ढाल – तलवार

0
24

प्रबोधनकार ठाकरे यांनी ५६ वर्षांपूर्वी दिलेले ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गमावण्याची पाळी आलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने अखेर ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आणि ‘ढाल – तलवार’ हे चिन्ह मिळाले आहे. अर्थात, खरी शिवसेना कोणती हा वाद सध्या आयोगापुढे विचाराधीन तसेच न्यायप्रवीष्टही असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली ही तात्पुरती सोय आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. हा काही निवडणूक आयोगाचा अंतिम निवाडा नव्हे. येत्या नोव्हेंबरमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक व्हायची आहे, त्यासाठी ही तात्पुरती व तातडीची सोय उद्धव ठाकरे गटासाठी आवश्यक होती आणि जेव्हा असा विवादित विषय असतो तेव्हा मूळ चिन्ह गोठवून वेगळे चिन्ह देण्याची पद्धतही आहे. त्यानुसार ही चिन्हे दिली गेली आहेत.
निवडणूक आयोगाकडे गेल्या रविवारी उद्धव गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन संभाव्य चिन्हे सादर झाली होती. गमतीचा भाग म्हणजे सोमवारी शिंदे गटाने त्याची सरळसरळ नक्कल करीत त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हे आयोगाकडे मागितली होती. निवडणूक आयोग राजकीय पक्षांना जेव्हा निवडणूक निशाणी देते, तेव्हा त्याचे काही नियम असतात. त्यामुळे त्रिशूळ, गदा असली धार्मिक चिन्हे आयोगाच्या चिन्हांच्या यादीतून केव्हाच बाद झालेली आहेत. उगवता सूर्य हे तर द्रमूकचे निवडणूक चिन्ह आहे आणि निवडणूक आयोगाच्या १९६८ च्या नियमावलीनुसार एका राजकीय पक्षाचे चिन्ह सहसा दुसर्‍याला दिले जात नाही. त्यामुळे उद्धव यांना त्यांनी दिलेल्या तीन चिन्हांपैकी ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले. शिवसेनेला हे चिन्ह खरे तर अपरिचित नाही. छगन भुजबळ हे १९८५ साली शिवसेनेचे पहिले आमदार बनले, तेव्हा मुंबईतील माझगाव मतदारसंघामध्ये ‘मशाल’ चिन्हावरच त्यांनी निवडणूक लढवली होती व जिंकले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गट एका अर्थी पुन्हा एकदा नवी सुरूवात ह्या चिन्हाद्वारे करू पाहतो आहे असेच म्हणावे लागेल. ‘मशाल’ हे खरे तर अलीकडे समता पक्षाचे चिन्ह होते, परंतु ठराविक संख्येने मते मिळाली नाहीत, तर पक्षाची मान्यता रद्द होते, त्यामुळे समता पक्षाच्या पतनानंतर २००४ पासून त्याने चिन्हही गमावले होते. त्यामुळे सध्या तरी शिवसेनेला सध्याच्या अंधारात आपली मशाल प्रज्वलित करून नवी वाट शोधावी लागणार आहे असे दिसते.
शिंदे गटाने उद्धव यांच्या निवडणूक आयोगाकडील मागणीची सहीसही नक्कल चालवलेली दिसून आली. निवडणूक चिन्हेच नव्हे, तर नावांच्या बाबतीतही ही नक्कल केली गेली. अर्थात, त्यामागे धूर्त चाल होती. उद्धव यांना कोणते नाव आणि चिन्ह मिळू नये ह्यासाठीच ही त्याच नावाची आणि निशाणीची मागणी शिंदे गटाकडून हेतुपुरस्सर केली गेली होती हे उघड आहे. उद्धव गटाने दिलेले ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हे नाव शिंदे गटानेही दिले. त्यामुळे ते उद्धव गटाला मिळू शकले नाही. त्यामुळे उद्धव गटाला सरतेशेवटी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ढाल – तलवार हे चिन्ह मिळाले आहे. ह्या दोन्ही नावांचा वापर ह्या गटांकडून कशाप्रकारे केला जाईल हेही एव्हाना स्पष्ट झाले आहे. उद्धव गटाने शिवसेना हे नाव ठळक मोठ्या अक्षरात, तर खाली उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव छोट्या अक्षरात वापरायला सुरूवात केली आहे. शिंदे गटाला मात्र बाळासाहेबांची शिवसेना हेच नाव ठळक अक्षरात वापरण्याची पाळी आली आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह जरी नसला तरी आजवर खरे समर्पक प्रतीक राहिलेला ढाण्या वाघ मात्र दोन्ही गटांकडून प्रचारात वापरला जाईल असे दिसते. शिंदे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून ढाल – तलवार मिळाली आहे. त्यामुळे आता त्यातली तलवार परजली जाते की बचावासाठी ढाल पुढे करावी लागते हे येणार्‍या निवडणुकाच सांगतील. छगन भुजबळांसारखा शिवसेनेतील पहिला फुटीरदेखील संघटनेतील ही उभी फूट क्लेशदायक असल्याचे सांगतो आहे. आम शिवसैनिकाची भावनाही ह्यापेक्षा वेगळी नाही. शिवसेनेसारखी एक लढाऊ, जहाल आणि मराठी माणसाच्या व नंतर हिंदुत्वाच्या हितरक्षणासाठी सदैव लढत आलेली संघटना कोणाच्याही चुकीने का होईना, परंतु आपली सगळी शान अशी गमावून बसावी ही काही आनंदाची बाब खचितच नव्हे. भाजपच्या वळचणीतील शिंदे आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुशीतले उद्धव ह्या दोघांनीही संघटनेचा आजवरचा दरारा कायमचा घालवला आहे हे मात्र खरे!