मला काय त्याचे?

0
35

(क्षणचित्रं… प्राणचित्रं…)

  • प्रा. रमेश सप्रे

मी समाजाचा कुणीतरी लागतो, खरे तर समाजामुळेच माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे, ही दृष्टीच लुप्त झालीय. म्हणून समाजासाठी, म्हणजे माझ्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींसाठी, सामाजिक कारणांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही वृत्तीही असून नसल्यासारखी झालीय.

प्रसंग तसा अनेक ठिकाणी अनुभवास येणारा.
तेलाचा टँकर आणि छोटी गाडी यांच्यात समोरासमोर टक्कर होते. गाडीचा चेंदामेंदा. चालक आणि शेजारी बसलेल्या सहप्रवाशांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झालेले. मागच्या आसनावरील चालकाच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा शिरच्छेद. तिच्या शेजारी बसलेल्या युवतीचा चेहरा कापला गेलेला. पण तिच्या शरीरात धुगधुगी होती. अतिशय भीषण अपघात होता तो. खरा प्रसंग पुढेच आहे. सारे देह, तुटलेले अवयव रस्त्यावर विखरून पडलेले. काहीच वेळात शेकडो बघे जमले. ती युवती तळमळत होती. वेदनेने कण्हत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कोणीही तिला मदत करण्यासाठी पुढे सरेना. इतक्यात एका जीपमधून काही परदेशी व्यक्ती जात होत्या. गर्दी पाहून ते प्रवासी खाली उतरले. ती युवती जिवंत असलेली पाहून कोणताही विचार न करता तिला उचलून आपल्या गाडीत घेतलं, सरकारी रुग्णालयात पोचवलं नि ते निघूनही गेले. काही महिने कोमा अवस्थेत राहिल्यावर ती युवती बरी झाली. तिचा देखणा चेहरा जरी विरूप झाला असला तरी बुद्धी, स्मृती शाबूत होती. थोडा वेळ जरी उशीर झाला असता तरी अतिरिक्त रक्तस्रावामुळे तिची प्राणज्योत मावळली असती. पण नियतीला ते मान्य नव्हते. खरा प्रश्न आहे तो त्या परदेशी प्रवाशांच्या कृतीचा नाही तर शेकडो इतर लोक जमलेले असूनही कोणालाही मदत करावीशी वाटली नाही. (त्यावेळी ‘108 अँब्युलन्स’ नव्हती.) कारण एकच- ‘मला काय त्याचे?’ ही अतिशय असंवेदनशील, बेफिकिरीची वृत्ती!

  • आपल्या समाजाचा हा फार मोठा दोष आहे. मी समाजाचा कुणीतरी लागतो, खरे तर समाजामुळेच माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे, ही दृष्टीच लुप्त झालीय. म्हणून समाजासाठी, म्हणजे माझ्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींसाठी, सामाजिक कारणांसाठी (सोशल कॉज) काहीतरी केलं पाहिजे ही वृत्तीही असून नसल्यासारखी झालीय. निदान शिक्षित (सुशिक्षित नव्हे!) मध्यम वर्गातल्या व्यक्तींमध्ये तरी ही वृत्ती अपवादानेच आढळते. याचे असेच आणखी एक उदाहरण.

व्यवसाय आणि समाजकार्य यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क असलेली व्यक्ती. आपल्या दुचाकीवरून वायुवेगाने जाणारी. मित्रमंडळींनी नावच दिले होते- ‘मि. सुपरसॉनिक.’ अतिवेगात जाणाऱ्या वाहनाला स्वतःमुळे जसा धोका असतो त्याहून जास्त दुसऱ्या वाहनांच्या म्हणजे चालकांच्या चुकांमुळे होणारा असतो. जीवन संपल्यावर ‘चूक कोणाची होती?’ या प्रश्नाचे उत्तर मृत व्यक्तीच्या दृष्टीने कवडीमोलाचे असते. भले लाखो रुपयांची विम्याची (इन्शुरन्सची) रक्कम जिवाभावाच्या नातेवाइकांना मिळाली तरी या दुर्दैवी व्यक्तीने आपला जीव गमावलेला असतो… तर अपघातात सापडलेले मि. सुपरसॉनिक रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. तसे ते शुद्धीवर असतात. दोन्ही दिशांनी जाणाऱ्या अनेक वाहनांना, आतील व्यक्तींना ते ओळखत असतात. कदाचित खूणही करत असतील. क्षीण आवाजात ‘हेल्प! हेल्प!’ म्हणतही असतील. नेहमीप्रमाणे अनेक बघे अवतीभवती जमलेले, पण कोणीही मदतीसाठी पुढे होत नाही. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात काही तरुण फुटबॉल खेळत होते. वाढणारी गर्दी पाहून ते अपघाताच्या दिशेने धावले. त्यांच्यातल्याच एकाने त्यांना ओळखले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये आणले. मधल्या काळात अपघातात सापडलेल्या व्यक्तीची शुद्ध हरपली होती. डॉक्टरांनी तपासणी करून जाहीर केले की वाटेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. अर्धा तास आधी आणलं तर वाचू शकले असते. असे घडण्याचे कारण तेच- ‘मला काय त्याचे?’ ही निंदनीय वृत्ती.

  • एका पाहणीनुसार (सर्वे) काही वर्षांपूर्वी एखादा बसला अपघात झाला किंवा एखाद्या चित्रपटगृह, सभागृह अशा ठिकाणांना आग लागली तर जखमींच्या, मृतांच्या संख्येत अधिक तरुण असायचे. वृद्ध-प्रौढ व्यक्तींना बाहेर काढायला अधिक महत्त्व दिले जायचे. आता बरोबर उलटे चित्र दिसते. सारे तरुण आधी स्वतःचा जीव वाचवतात. भले, हे करत असताना वृद्धमंडळींना त्रास झाला तरी हरकत नाही. ‘मरू देत की, मला काय त्याचे!’
  • ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती चांगल्या प्रसंगीही दिसून येते. एका शाळेतील बक्षीस समारंभ. सभागृह पालकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी खचाखच भरलेले. एकेक बक्षीस, नव्हे पारितोषिक देऊ जाऊ लागले. पारितोष म्हणजे अनेकांना मिळणारा आनंद. टाळ्यांचा कडकडाट होत होता. शेवटी ‘बेस्ट ऑलराऊंडर’ किंवा ‘चँपियन ऑफ द यिअर’चे नाव जाहीर झाले. लोक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट होत राहील (स्टँडिंग ओव्हेशन) असे वाटले होते, पण अवघे काही लोकच सभागृहात उरले होते. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलाला बक्षीस मिळाल्यावर निघून जाणेच पसंत केले. पुढच्या वर्षी आरंभी सांगूनही तोच प्रकार. त्याच्या पुढच्या वर्षापासून ते पारितोषिक आरंभीच देऊ लागले. पण त्यातला सस्पेन्स मात्र संपला. असे व्हायचेही तेच कारण- ‘मी दुसऱ्यांच्या मुलांचं कौतुक का करायचं?’
  • एक मजेदार प्रसंग. शाळेच्या स्नेह(?)संमेलनातील मुलींचं गरबा नृत्य. जितक्या मुली तितके पालक. फक्त आपल्याच मुलीच्या पदन्यासाचे, नंतर चेहऱ्याचे फोटो घेण्याच्या प्रयत्नात स्टेजवर दुसरा फेर धरून नाचत होते. दुर्दैव हे की ज्यावेळी पायांचा फोटा काढला त्यावेळी चेहऱ्याचा नाही काढला. कुणाचे पाय, कुणाचा चेहरा काहीच कळेना. पण कुठल्याही महाभागाला सर्व नृत्याचा फोटो घ्यावा असे वाटलेच नाही. ‘मी-माझं’ सोडून दुसऱ्याचा विचारच नाही!
  • या पार्श्वभूमीवर हे चित्र पहा. एक साधा कामगार पेढे घेऊन आला. कशाचे रे? कारण त्याचा स्वतःचा मुलगा परीक्षेत नापास झाला होता. तो म्हणाला, ‘माझा मुलगा नाही पास झाला, पण माझ्या शेजाऱ्याचा मुलगा त्याच्या शाळेत पहिला आला. ते लोक गरीब आहेत म्हणून मीच वाटतोय त्यांच्यासाठी पेढे.’ हा कामगारही तसा गरीबच होता. पण मनाने श्रीमंत होता. मुख्य म्हणजे ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती त्याची नव्हती. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणत ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर करत पंढरीला जाण्याचा खरा अधिकार अशा लोकांचाच असतो. इतर शिक्षित, मध्यमवर्गी किंवा पैसेवाले (श्रीमंत नव्हेत) लोक ‘मला काय त्याचे?’चा जप करत- ‘मी कोण त्याचा?’ ‘तो कोण माझा?’ ‘आम्ही कोण एकमेकाचे?’ अशी एकेक पायरी उतरत राहतात. माणुसकीच्या पातळीवरून! अशा लोकांसाठीच एक तुफान गाजलेला चित्रपट आला होता- ‘हम आपके है कोन.’ विशेष म्हणजे चित्रपटाच्या नावानंतर प्रश्नचिन्ह नव्हते. कारण नुसते उत्तर नको होते, तर चिंतन हवे होते परस्परातल्या नात्यांबद्दल… संबंधांबद्दल. खरेच आपण विचार करायला हवा असं तुम्हाला नाही वाटत?