मराठी असे आमुची मायबोली

0
73
  • – शंभू भाऊ बांदेकर

मराठी आणि कोकणी येथे पोर्तुगीज काळात सुखा-समाधानाने नांदत होत्या. याबाबतीत हिंदू-ख्रिश्‍चनांमध्ये कोणताही दुरावा नव्हता, मतभेद नव्हते. त्यामुळे संघर्षाचा प्रश्‍नच नव्हता! हा वाद मुख्यत्वे गोवा मुक्तीनंतर सुरू झाला. काही राजकारण्यांनी तो प्रथम उकरून काढला.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या म्हणण्याला काही किंमत नव्हती. परंतु आज लोकशाहीच्या तत्त्वानुसार प्रत्येकाच्या मताला किंमत आहे. ते मत विचारात घेऊन आपण त्यांच्या अडचणीचे निवारण केले पाहिजे. पोर्तुगिजांनी पोर्तुगीज भाषा शिकवली. लोकमताची त्यांनी कधीच कदर केली नाही. त्यामुळे शास्त्रे आणि शासक यांच्यात फरक निर्माण झाला. आजसुद्धा एका विशिष्ट भाषेमुळे शासक आणि शास्त्रे यांच्यात फरक दिसून येत आहे. हा फरक लक्षात घेऊन तो शक्य तितक्या प्रमाणात कमी केला पाहिजे म्हणून आज जी राजपत्रे इंग्रजी आणि पोर्तुगीजमधून काढली जातात ती लोकांची गरज ओळखून मराठीतून काढली पाहिजेत. तसेच सरकार जी परिपत्रके काढते तीही इंग्लिश भाषेमध्ये असतात. ती पत्रकेसुद्धा मराठी भाषेतून काढावीत.

यामध्ये मगो आणि युगो आमदार असे सरळ दोन तट पडले आणि गजानन पाटील, दत्ताराम चोपडेकर, के. बी. नाईक, प्रा. गोपाळराव मयेकर, अँथनी डिसौझा, शशिकलाताई काकोडकर हे समर्थपणे मराठीची बाजू मांडू लागले; तर डॉ. लुईस प्रोत बार्बोझा, बाबू नायक, रॉक सांतान फर्नांडिस, यशवंत देसाई, अब्दुल रझाक आदी डॉ. सिक्वेरांची बाजू उचलून धरू लागले. मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी ‘चर्चेत अनेकदा हस्तक्षेप करून विरोधक केवळ वेळ घालवत आहेत. मराठी ही घटनेने मान्यता दिलेल्या १४ भाषांपैकी एक आहे, हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. मग मूळ ठरावावरील दुरुस्त्या मागे घ्या, फेटाळून लावा असे करत करत रात्रौ बाराच्या नंतर १९ विरुद्ध १२ मतांनी श्री. राणे यांचा ठराव संमत झाला.
वास्को येथे चौगुले एज्युकेशन सोसायटीच्या माता सेकंडरीची एस.एस.सी. म्हणजे त्यावेळच्या अकरावी मराठीची पहिली बॅच १९६९ साली बाहेर पडली, त्या बॅचचा मी विद्यार्थी. विद्यार्थी असताना कवी माधव ज्युलियन (पटवर्धन) यांची मराठी भाषेचा महिमा सांगणारी कविता आम्ही तोंडपाठ केली होती. एकूण वीस ओळींच्या या कवितेचा महिमा वर्णन करताना कवी म्हणतात ः
मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्‍वर्य या माउलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे
भाषेचे हे संस्कार घेऊनच आम्ही मोठे झालो. गोमंतकातील पुरोगामी विचारवंत व लेखक अर्जुन जयराम परब हे एस.एस.सी.पर्यंत आम्हाला इतिहास विषय शिकवीत असत. त्यांनी मला ‘इतिहास’ विषयाचा लळा लावला म्हणून मी माझ्या बी.ए. परीक्षेसाठी इतिहास विषय निवडला होता. तसेच आमचे संस्कृतचे शिक्षक प्रिन्सिपॉल पी. एच. पी. पाणंदीकर आणि प्रा. श्री. शं. फडके व अर्जुन परब सर या गोमंतकीय शिक्षकांनीही आम्हाला मराठी भाषेचे ऐश्‍वर्य किती मोठे आहे, ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें| परि अमृतातेंही पैजां जिंके|’ हे संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी कसे सिद्ध केले, येथील मराठी भाषा व तिचा पुरातन वारसा किती गौरवशाली आहे हे आमच्या गोव्यातील शिक्षकांबरोबरच महाराष्ट्रातील वाय. बी. सुतार (चित्रसेन शबाब), ना. बा. रणसिंग, सौ. मुतालिक टिचर आदींनी आमच्यावर बिंबवले होते व त्या वातावरणात विद्यार्थीदशेपासून पुढे नोकरी-व्यवसाय करताना मी सुखेनैव वावरत होतो. शिवाय संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर यांच्या वाङ्‌मयाबद्दल उत्सुकता वाढवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझ्या वाचनात आले होते. बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘यच्चयावत सर्व मराठी पुस्तके, ग्रंथ भांडार उद्या कोणी अरबी समुद्रात बुडवून टाकले तरी मला विशेष दुःख होणार नाही; पण याला फक्त दोन अपवाद एक ‘तुकारामांची गाथा’ आणि दुसरी ज्ञानेश्‍वरांची ‘ज्ञानेश्‍वरी’!’’ त्यामुळे पुढे मी संत एकनाथ महाराजांची भारुडे, संत शिरोमणी रोहिदास यांचे दोहे व अभंग यांबरोबरच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या वाङ्‌मयाचा आस्वाद घेत होतो.

तर मराठी-कोकणीच्या संदर्भात जरा विस्ताराने सांगायचे म्हणजे, मराठी आणि कोकणी येथे पोर्तुगीज काळात सुखा-समाधानाने नांदत होत्या. याबाबतीत हिंदू-ख्रिश्‍चनांमध्ये कोणताही दुरावा नव्हता, मतभेद नव्हते. त्यामुळे संघर्षाचा प्रश्‍नच नव्हता! दोन्ही धर्मीय एकोप्याने व सहकार्याने जगत होते. पण हा वाद मुख्यत्वे गोवा मुक्तीनंतर सुरू झाला. काही राजकारण्यांनी तो प्रथम उकरून काढला व त्याचा परिणाम गोव्याचे शांततेचे व सुसेगाद जीवन गढूळ बनण्यात झाला. यामुळे ओढवलेल्या संघर्षाचा दुष्परिणाम जीवितहानी व वित्तहानी होण्यात झाला.

खरंतर विमुक्त गोव्यात मुक्तपणे संचार करणारा बहुजन समाज विकासाच्या अपेक्षेत होता; पण या वादामुळे विकास सोडाच, पण माणसाचे जीवनच भकास बनून गेले. यासंदर्भात विश्‍लेषण करताना पुरोगामी विचारवंत व मराठीचे जाज्ज्वल्य अभिमानी अर्जुन जयराम परब यांनी आपल्या ‘मराठी असे आमुची मायबोली’ या पुस्तकातील ‘मला काही सांगायचंय’ या प्रकरणात म्हटले आहे ः ‘ज्ञान, विज्ञान, प्रगत शिक्षण, बुद्धिप्रामाण्यवाद, तर्कचिकित्सावादामध्ये जर बहुजन समाजाने आघाडी मारली तर आपली शैक्षणिक मक्तेदारी व जातीय, वर्णीय, वर्गीय हितसंबंध धोक्यात येतील या भीतीपोटीच धर्मांध प्रतिगाम्यांनी तत्कालीन बहुजनांविरुद्ध आघाडी उघडून त्यांच्या सर्वांगीण विकासप्रक्रियेत बिघाडी निर्माण केली व स्वतःचे आत्मिक समाधान साधून घेतले. या त्यांच्या अफाट राजकीय कारस्थानामुळे गोव्याची शांती तर भंग पावलीच, शिवाय परस्परांचे भावनिक संबंधसुद्धा दुरावले. तसेच सामान्य लोकांचे, विशेषतः उगवत्या भावी पिढीचे बरेच नुकसान झाले ते वेगळेच. खरे तर हा विकास, प्रगतीच्या विरोधात साधा भाषिक वाद नव्हता, तर नाहक वितंडवाद होता. त्यावेळचे लोकप्रिय व ध्येयवादी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने होऊ घातलेल्या शैक्षणिक प्रगती व चौफेर विकासाला बुद्धीपुरस्सर घातलेला तो अडसर होता, हेच सिद्ध झाले.’ यावरून भाषिक वादामुळे येथील बहुजन समाजाला विकासापासून कसे वंचित व्हावे लागले हे आपल्या लक्षात येते. विशेष म्हणजे काही बहुजन समाजातीलच माणसे कोकणी हीच ‘मायभास’ म्हणून चळवळीत सक्रिय झाली होती.

येथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे, नव्या काबिजादीतील मराठी भाषिकांमध्ये दोन वर्ग होते. एक वर्ग मराठी ‘भाषा’ आणि मराठीच ‘बोली’ म्हणणारा, तर दुसरा वर्ग भाषा मराठी आणि कोकणी ही तिची बोली मानणारा होता. जुन्या काबिजादीतील बहुतेक सर्वच कोकणी हीच भाषा आणि प्रादेशिक फरकाने कोकणी ही बोली मानणारे होते. नव्या काबिजादीतील कोकणी भाषिक देवनागरी लिपीचा पुरस्कार करणारे होते, तर जुन्या काबिजादीतील कोकणी भाषिक रोमन लिपीचे पुरस्कर्ते होते. पण नव्या काबिजादीतील कोकणी भाषिकांना रोमन लिपीचा पुरस्कार नको होता. त्यामुळे रोमन लिपीचा पुसस्कार करणार्‍यांचे घोडे पुढे जाऊ शकले नाहीत व नाईलाजाने का होईना त्यांना ‘देवनागरी’ घेऊनच कोकणीला पुढे न्यावे लागले.

‘लिपी’च्या संदर्भात बोलताना मी एके ठिकाणी जाहीरपणे म्हटले, आपल्या देशातील सर्व भाषांची लिपी एकच झाली आणि ती ‘देवनागरी’ झाली तर देशातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही राज्यातील, कोणतीही भाषा शिकणे सोपे जाईल आणि त्यामुळे कळत-नकळत का होईना राष्ट्रीय एकात्मता साधण्यास मदत होईल. त्यातून आपल्या देशाची विविधतेतून एकता व एकतेतून विविधता ही संकल्पना वाढीस लागेल. यावर हिंदू कोकणीवाद्यांनी माझे कौतुक केले, तर ख्रिश्‍चन कोकणीवाद्यांनी ‘हो चड शाणो जाला’ म्हणून हेटाळणी केली.

खरं तर ‘महाराष्ट्रवादी गोमंतक’ या स्थानिक पक्षाचा जन्मच मुळी मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा यासाठी झाला होता. या पक्षाने गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून देणे, या दोन प्रमुख उद्दिष्टांनी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती. पण १६ जानेवारी १९६७ रोजी झालेल्या जनमत कौलामुळे गोवा प्रांत स्वतंत्र राहावा, असा शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्‍न निकालात निघाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत बहुजन समाजाने मगोला पुन्हा सत्तेवर आणले ते मराठी भाषेच्या प्रेमापोटी. पण या पक्षाने तळमळीने, जिद्दीने व हिरीरीने मराठी भाषेचा पाठपुरावा केला नाही. त्याची फळे त्या पक्षाला व मराठी भाषिकांना अजून भोगावी लागत आहेत. तुम्हाला मराठी हवी तर महाराष्ट्रात जा. गोवा प्रदेश हा कोकणीचा, कोकणी बोलणार्‍यांचा व कोकणीसाठी सडेतोड भूमिका घेणार्‍यांचा आहे. मराठी गोव्यासाठी ‘उपरी’ भाषा आहे, असा प्रचार पद्धतशीरपणे सुरू करण्यात आला. यासाठी मग गोव्यात मराठी भाषा मुळीच उपरी नाही, मराठी भाषेचा प्राचीन वारसा या प्रदेशाला लाभला आहे यावर मग वाणी व लेखणीने उत्तरे-प्रत्युत्तरे सुरू झाली. काणकोणचे सुपुत्र, जाज्वल्य मराठीभिमानी आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी मराठीचा वारसा सांगणारा तब्बल २७० पृष्ठांचा ग्रंथ लिहिला आणि येथे मराठीच कशी रुजली, फळली व जोपासली जाते त्यावर झणझणीत प्रकाशझोत टाकला आहे. आम्ही मग त्या पुस्तकाचा आधार घेऊन मराठीचा आकसापोटी द्वेष करणार्‍यांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला होता व यासाठी प्राचार्य गोपाळराव मयेकर, माजी आमदार जयसिंगराव आ. राणे, माजी आमदार जयसिंगराव व्यं. राणे, शशिकांत नार्वेकर, गो. रा. ढवळीकर, नारायण आठवले, माधवराव तळावलीकर, भास्कर भांडारे, भिकू पै आंगले आदी मंडळी सातत्याने आम्हाला साथ देत होती.