27 C
Panjim
Saturday, September 19, 2020

मन:शांती उपनिषदांतून प्रलोभनांवर मात


प्रा. रमेश सप्रे

हरीण नावाच्या प्राण्याला फार बुद्धी नसल्यामुळे ते आत्मघात करून घेतं तर फार बुद्धी असल्यामुळे कळून सवरून मनाच्या अशांतीच्या वाळवंटात भटकणारे नि भरकटणारे आपण! जास्त आत्मघातकी कोण? नचिकेतानं मात्र बुद्धीची दिशा मुक्तीकडे ठेवलीय. असा नचिकेता आपल्या आतही आहे. शोधायला मात्र हवा.

कठोपनिषदात आलेल्या यम-नचिकेताच्या प्रसंगावर, विशेषतः मौलिक विचारांवर आपण सहचिंतन करत आहोत. या दोघातला संवाद त्यातील मानवकल्याणाच्या विषयामुळे अमर झालाय. अनेक विद्यावंत, प्रतिभावंत मंडळींवर त्याची छाप पडलीय. उगीच नाही स्वामी विवेकानंदांसारखे महामानवी या उपनिषदाच्या अभ्यासाचा आग्रह धरतात.

आपल्या अनुपस्थितीत नचिकेता हा तेजस्वी बालक तीन दिवस नि रात्री निराहार – निर्निद्रा राहिला म्हणून अपराधी भावनेनं यमराज त्याला तीन वर देऊ करतात.

 • पहिला वर – मी जेव्हा परत घरी जाईन तेव्हा माझ्या पिताश्रींचा माझ्यावरचा राग नि त्यांना झालेलं दुःख दोन्ही दूर होऊन ते माझं नेहमीच्या प्रेमानं स्वागत करतील. यावर यमराजांनी ‘तथास्तु’ म्हटलं, पण यमलोकातून परत जाण्याचा वर मागणार्‍या त्या बुद्धिमान बालकाचं त्यांना कौतुक वाटलं.
 • दुसरा वर – स्वर्गलोकात मृत्यू, म्हातारपण, व्याधी, दुःख नसल्यामुळे सर्वांना तो हवासा वाटतो. त्या स्वर्गलोकाची प्राप्ती कोणत्या अग्नीची (यज्ञाची) उपासना करण्याने निि्‌‌‌‌‌श्‍चत होते- ते कृपया स्पष्ट करून सांगावं.
  यावर यमराज पुन्हा त्याची स्मृती नि प्रतिभा यांचं कौतुक करून यमधर्मांनी व्यवस्थित वर्णन करून यज्ञाचा विधी, अग्नीची उपासना याची माहिती दिली. दहा वर्षांच्या मुलाचं स्वर्गलोक, त्याची प्राप्ती, त्याविषयी करावयाची साधना याविषयीची जिज्ञासा पाहून प्रसन्न मनानं त्यांनी नचिकेताला आणखी एक वर आपणहून दिला. तो असा की अशा प्रकारचा यज्ञ नि अग्नीची उपासना केली जाईल, त्या अग्नीला नचिकेताचं नाव यापुढे दिलं जाईल. त्या अग्नीला ‘नचिकेत अग्नी’ म्हटलं जाईल. हजारों वर्षांनंतर आजही त्याला नचिकेत अग्नी म्हटलं जातं हे पाहून आपल्या देशाची अखंड सां्‌स्कृतिक परंपरा आठवून मन आश्चर्य नि आनंद यांनी भरून येतं. अभिमान वाटतो या वारशाचा नि कृतज्ञता वाटते तो वारसा आपल्यापर्यंत पोचवणार्‍या गुरु-शिष्य परंपरेचा.
 • तिसरा वर – यमदेव म्हणतात, ‘तृतीय वरं नचिकेतो वृणीष्व|’
  नचिकेता म्हणतो- काही लोक म्हणतात, मृत्यूनंतरही आत्म्याला अस्तित्व आहे तर काहींच्या मते मृत्यू हा आपल्या आस्तित्वाचा शेवट आहे. अर्थात् मृत्यूसंबंधी हे जे गूढ रहस्य आहे ते कृपया मला स्पष्ट करून सांगा. खरं पाहायला गेलं तर मृत्यूचं रहस्य सांगायला यमराजांसारखी दुसरी अनुभवी व्यक्ती नाही. यमराजांना कौतुक वाटलं नि त्यांनी मृत्यूबद्दलच्या रहस्याचं ज्ञान देण्यासाठी नचिकेता योग्य (सत्पात्र) व्यक्ती आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला ऐहिक, प्रापंचिक भोगांचं प्रलोभन दाखवलं. पण यमदेवांनी देऊ केलेल्या – अलंकार, दास-दासी, रमणीय तरुणी, हत्ती-घोडे-रथ आदि संपत्ती, दीर्घायुष्य, पृथ्वीचं निष्कंटक राज्य इ. सर्व भोगवस्तू देण्याचं आमिष दाखवलं. पण नचिकेत्याचं ‘पात्र’ कच्चं नव्हतं. तो म्हणाला, ‘हे यमराज, मृत्यूच्या रहस्याच्या बदल्यात मला तुम्ही एवढं देऊ करताय याचा अर्थ ते रहस्य या सार्‍या गोष्टींपेक्षा मौल्यवान आहे. म्हणून मला तेच हवंय. कृपया सांगा.

यमदेवांनी दाखवलेल्या विविध प्रलोभनासंदर्भात नचिकेता काय म्हणतो ते महत्त्वाचं आहे. एवढ्या लहान वयात एवढं महान ज्ञान त्यानं कोठून मिळवलं. त्याची बुद्धी ही ‘बालबुद्धी’ नसून परिपक्व अशी प्रौढ बुद्धी आहे. त्यानं यमधर्मांना प्रदीर्घ उत्तर देऊन पुन्हा मृत्यूच्या रहस्याचीच मागणी केलीय. नचिकेताचे शब्द बोलके आहेत-
श्‍वोभावा (श्‍व अभावाः म्हणजे अशाश्‍वत) मर्त्यस्य यदन्तकैतत्
सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः |
अपि सर्वं जीवितमल्पमेव
तवैव वाहास्तव नृत्यगीते ॥
नचिकेताच्या यमराजांना दिलेल्या उत्तराचा हा आरंभ आहे. याचा अर्थ असा- यमराज, आपण ज्या उपभोग्य वस्तूंची निर्देश केलात त्या वस्तू स्वतः क्षणभंगूर आहेतच पण त्यांच्यापासून देहाला मिळणारी सुखंही क्षणिक असतात. या सुखाचं रुपांतर लगेचच दुःखात होतं. तुम्ही मला जे दीर्घायुष्याचं वचन देत आहात ते दीर्घायुष्यही अनंत काळाचा विचार करता क्षणापुरतंच आहे. ब्रह्मदेव आदि देवदेवतांच्या आयुष्याला जर सीमा आहे तर मला दीर्घायुष्य नकोच. निसर्गाच्या नियमानुसार काळाच्या ओघात आकाराला आलेल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व सीमित असतं. म्हणून तुम्ही देऊ केलेल्या हत्ती, घोडे, रथ, अलंकार, सुंदर स्त्रिया, नम्र दास इ. सारं तुमच्याजवळच ठेवा. मला फक्त मृत्यूचं रहस्य सांगा.
हाच आग्रह धरून नचिकेता आपल्या म्हणण्याचा शेवट करतो –
यस्मिन् इदं विचिकित्सन्ति मृत्यो
यत् साम्पराये महति ब्रूहि नस्तत् |
योऽयं वरो गूढमनु प्रविष्टो
नान्यं तस्मात् नचिकेता वृणीते ॥
नचिकेता दृढपूर्वक म्हणतो- मृत्यूनंतर आत्मा असतो की नाही या प्रश्‍नाचं स्पष्ट नि सविस्तर उत्तर मला द्यावं. अत्यंत गांभीर्यानं हा वर मी मागत आहे. हा वर देण्याचं वचन तुम्ही मला दिलंय यमराज! मृत्यूविषयीचं हे गूढ रहस्य असलं तरी मला ते जाणून घ्यायचंच आहे. आपण सांगितलं तर मला जरूर समजेल. नचिकेता आपलं म्हणणं प्रामाणिकपणे पण निश्चयपूर्वक यमदेवांपुढे म्हणतो. त्याच्या या युक्तिवादावर प्रसन्न होऊन यमराज त्याला आत्म्याचं स्वरूप, आत्मप्राप्तीची साधनं नि त्यासाठी करावयाची साधना याविषयी सविस्तर सांगतात.

नचिकेता हा तसं पाहिलं तर आपला प्रतिनिधी आहे. आपल्या वतीनं त्याचा यमराजांशी हा अमर संवाद सुरू आहे.
मृत्यूचं रहस्य नचिकेतानं विचारू नये म्हणून यमराजांनी त्याला विविध प्रलोभनं दाखवली. पण नचिकेता त्यांना बधला नाही. एवढंच नव्हे तर या प्रलोभनातील व्यर्थता सिद्ध करण्यासाठी तो जे काही बोलला त्यातले आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे असे…..

 • दृश्य वस्तूतून विषयांचे भोग घेताना एक लक्षात ठेवायला हवं की यातून मिळणारं सुख हे तात्कालिक आहे. टिकाऊ नाही. नचिकेता ‘श्‍वोभावा’ म्हणतो म्हणजे ‘श्‍व’चा अभाव. ‘श्‍व’ म्हणजे उद्याही टिकणारं, नंतरही असणारं जसं शाश्‍वत असा प्रकारच्या सुखाचा अनुभव संपत्ती, जडजवाहिर, पशुधन, सेवा व भोग यासाठी सुंदर तरुणी यातून येणार नाही.
 • संसाराला किंवा प्रपंचाला ‘अश्‍वत्थ (पिंपळ)’ वृक्षाची उपमा देतात. अ-श्‍वत्थ किंवा अ- श्‍व- स्थ म्हणजे आत्ता आहे त्याच स्वरूपात पुढच्या क्षणी नसणारा आकार कारण केलेली प्रत्येक वस्तू किंवा व्यक्ती (सजीव-निर्जीव) क्षणाक्षणाला बदलत असते. वरवर जरी हा बदल जाणवला नाही तरी ‘क्षणाक्षणाला’ त्या वस्तूच्या- व्यक्तीच्या अस्तित्वातील क्षण- क्षण तरी जात असतोच. शरीराच्या आत नि बाहेर बदल घडतच असतात.

या संदर्भात एक सुंदर उदाहरण दिलं जातं. वारा नसलेल्या (निर्वात) ठिकाणी तेवत असलेल्या संथ- स्थिर- शांत ज्योतीचं. वरवर ती ज्योती कायम टिकेल असं वाटतं पण प्रत्यक्षात दिव्यातील तेल, कापसाची वात यांचं संपणं, तेही क्षणाक्षणाला संपणं ही वस्तुस्थिती असते. ती केव्हा लक्षात येते? दिव्याची वात शांत झाल्यावर! नचिकेता म्हणूनच इंद्रियांच्या माध्यमातून उपभोग देणार्‍या वस्तूंना महत्त्व देत नाही.

 • जरी व्यक्तीला शुभेच्छा देताना आपण म्हणतो, ‘जीवेत् शरदः शतम्‌|’ तरी एकूण अनंत काळाशी तुलना करता ही जीवनमर्यादा कमीच म्हणावी लागेल. म्हणजे क्षणभंगूरच. आज आपल्याला आयुर्मर्यादा वाढल्यासारखी वाटली तरी ही वाढ सुखावह नाही.
 • आजच्या काळात आयुष्याची वर्षं वाढली
  पण या वाढलेल्या वर्षात
  आयुष्य जगणं मात्र कठीण होऊन गेलं.
  किती खरंय हे! नचिकेताला याची जाणीव आहे.
 • मनोरंजन म्हणजे स्वस्त करमणूक नव्हे. मद्यपान, सुंदर स्त्रियांची नृत्यं- गीतं, इतर सारे देहाचे भोग- उपभोग हे सारे तुझे- तुझ्याकडेच ठेव असं स्पष्टपणे तो यमधर्मांना म्हणतो- ‘तव वाहाः नृत्यगीते तव एव!’
  तू देऊ केलेली वाहनं, सुंदर अप्सरांची नृत्यं नि गीतं हे सारं मला नकोच. तुझं तुझ्याकडेच ठेव (तव एव)
 • मनुष्य पैशानं, पैशाच्या माध्यमातून मिळवता येणार्‍या सुखोपभोगांमुळं – कधीही तृप्त केला जाऊ शकत नाही (न तर्पणीयः). ‘तुझ्या दर्शनामुळे, हे यमदेवा, खरं धन (समाधान) तर मिळालंच आहे. तुझ्या स्मरणामुळे आयुष्य कृतार्थ होत राहीलच. म्हणून मला आत्मज्ञानाशिवाय, मृत्युज्ञानाशिवाय काहीही नको.’
 • मनुष्यदेह जीर्णशीर्ण होणारच आहे. शीर्यते इति शरीरः नि दहते इति देहः – म्हणजे कितीही जपलं, सांभाळलं तरी काळाच्या ओघात प्रत्येकाचं शरीर झिजत जातं. संपत जातं. मरत जातं. म्हणून ‘मरणाचे स्मरण असावे| हरिभक्तीस सादर व्हावे॥ असं समर्थ रामदासांसारखे संत सांगतात.

मृत्युलोक हा नावाप्रमाणेच ‘जरामरणशील’ आहे. स्वर्गलोकही फक्त भोगप्रधान आहे. मनुष्यजन्मातच बंधनं आणि मुक्ती यांचा विचार करायचा असतो. ‘ईशावास्य’ उपनिषदात शंभर वर्षांचं आयुष्य (शतायु) मागताना स्थिर आणि कार्यक्षम इंद्रियांची मागणीही केली आहे. उगीच लोळागोळा होऊन एखाद्या भाजीसारखं पडून राहणं निरर्थक आहे. असं जगणं हे आयुष्यच नाहीये.

नचिकेताचे हे विचार आजच्या चंगळवादी, देहभोगप्रधान जीवनप्रणालीत स्वीकारले जाणार नाहीत. म्हणूनच आधुूनिक सुधारित(?) मानव मनःशांती गमावून बसलाय. विज्ञान- तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक यंत्रं- साधनं- उपकरणं यांचा वर्षाव होत आहे. पण मानवजातीचा प्रवास मनाच्या अशांती, अतृप्तीकडून अधिक अशांती – अतृप्तीकडे सुरू आहे. जितकं अधिक देह सुख तितका कमी शुद्ध, टिकाऊ आनंद असा अनुभव मानवजातीला येतोय. श्रीमंत लोकांना तर हा अनुभव पावलोपावली येतो. पण दिशा चुकल्यामुळे अधिकाधिक पैसा, उपभोगाची साधनं मिळवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत राहतात. कायम अतृप्त, अशांत राहतात.

आपली अवस्था हरणांसारखी झालीय. स्वतःच्या प्राणाचं हरण ही हरणं स्वतःच करतात. *तंतुवाद्याच्या संगीताच्या मोहात पडल्यामुळे आपणहून शिकार्‍याच्या फासात (सापळ्यात) अडकणारं हरीण.

 • मृगजळाला खरं पाणी समजून तहानेनं व्याकूळ होऊन ऊर फुटेपर्यंत धावणारं हरीण.
 • स्वतःच्या नाभीतील कस्तुरीच्या वासाच्या शोधात इकडे-तिकडे धावून मरण पावणारं हरीण.
 • सर्वांत वाईट म्हणजे सुवर्णमृग (सोन्याचं हरीण) खरा समजून त्याचा व्यर्थ पाठलाग करणारे आपण!
  हरीण नावाच्या प्राण्याला फार बुद्धी नसल्यामुळे ते आत्मघात करून घेतं तर फार बुद्धी असल्यामुळे. कळून सवरून मनाच्या अशांतीच्या वाळवंटात भटकणारे नि भरकटणारे आपण! जास्त आत्मघातकी कोण? नचिकेतानं मात्र बुद्धीची दिशा मुक्तीकडे ठेवलीय. असा नचिकेता आपल्या आतही आहे. शोधायला मात्र हवा.

STAY CONNECTED

846FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

बेलगाम कोरोना….

डॉ. राजेंद्र साखरदांडे लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा,...

मला भावलेले अनिल बाब

कामिनी कुंडईकर विधिलिखित चुकत नाही हेच खरे. ५ सप्टेंबर रोजी बातमी येऊन धडकली की ‘अनिलबाब गेले’. विश्वासच बसेना....

‘अधिकस्य अधिकं फलम्’

नारायण बर्वे, वाळपई यावर्षी अधिकमास १८ सप्टेंबर २० ते १६ ऑक्टोबर २० पर्यंतच्या कालावधीमध्ये येत आहे. आपणही अधिकमासाची,...

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

ALSO IN THIS SECTION

असंतोषाचे ‘बादल’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील विश्‍वासू मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाच्या एकुलत्या एक मंत्री हरसिम्रतकौर बादल यांनी सरकारच्या ‘शेतकरीविरोधी...

खासगी इस्पितळांच्या कोरोना शुल्काचा फेरआढावा घेणार

>> मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती राज्यातील खासगी इस्पितळांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या शुल्काचा फेरआढावा घेतला जाणार आहे,...

पुढील चार दिवस पावसाची शक्यता

पश्‍चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील काही भागात आगामी चार दिवस जोरदार पावसाचा इशारा काल हवामान खात्याने दिला आहे.

पुन्हा ८ जणांचा मृत्यू, ५९६ बाधित

>> मृतांमध्ये दोन युवक, एक युवती राज्यात गेल्या चोवीस कोरोना पॉझिटिव्ह आणखी ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे ५९६...

कृषी विधेयकावरून विरोधकांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल ः पंतप्रधान

कृषी विधेयकावर बोलताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना आपली दिशाभूल होऊ देऊ नका असे आवाहन केले. यावेळी त्यांनी या विधेयकावरून विरोधक...