मणिपूरच्या भाजप सरकारचा मित्रपक्षाने पाठिंबा काढला

0
37

हिंसाचारात गेल्या तीन महिन्यांपासून होरपळणाऱ्या मणिपूरमधील सत्ताधारी भाजप पक्षाचा एनडीचा मित्रपक्ष कुकी पीपल्स अलायन्सने पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमधील एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सत्तेवर असलेल्या भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या व एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या कुकी पीपल्स अलायन्सने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. काल रविवारी संध्याकाळी पाठिंबा काढून घेत असल्याची पक्षाने घोषणा केली.
मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यापासून तणावाचे वातावरण सुरू आहे. राज्यामध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि तीन महिन्यांनंतरही परिस्थिती सामान्य होत नसल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारमध्ये कुकी पीपल्स अलायन्सच्या दोन आमदारांचा समावेश होता. 4 मे 2023 रोजी मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान भडकलेली हिंसा अद्याप थांबलेली नाही. तेव्हापासून मणिपूर होरपळत आहे.

चोवीस तासांत 6 मृत्यू
गेल्या 24 तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागात पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात 16 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.