मखरोत्सव

0
28
  • विघ्नेश शिरगुरकर

त्या रंगीबेरंगी मखरात बसलेली अश्वारूढ आणि सशस्त्र अशी श्रींची मूर्ती फारच भव्यदिव्य आणि भारदस्त वाटते. मखर विद्युत रोषणाईने, जाईजुईच्या माळांनी, बाजारच्या शेवंती वगैरे फुलांनी, हारांनी छान सजवलेलं असतं. मखर हलवणारा वेगळा असतो तर आरती दाखवणारा वेगळा असतो. कधी नागेशाला आरती दाखवणारा महालक्ष्मीला मखर झुलवतो, तर कधी हेच उलटं असू शकतं.

श्रावण महिना सुरू झाला की चातुर्मास लागला असं मानतात. श्रावण महिना संपला की भाद्रपद महिना आला. गणेशचतुर्थीच्या धामधुमीत हा हा म्हणता पहिला पंधरवडा कधी संपतो ते कळतच नाही. कृष्णपक्ष पितृ पंधरवडा असलेला भाद्रपद संपला की आश्विन महिना सुरू होतो आणि अनेक घरी तसेच राऊळी-मंदिरी नवरात्रीचे घट बसतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. गोव्यात बहुतांश ठिकाणी घरी वा देवळात घट बसवतात ते घटाभोवती माती आणि नऊ प्रकारची धान्ये रूजवण म्हणून पेरूनच. कलशरूपी देवीची षोडशोपचार पूजा होते. बहुतांश ठिकाणी परसदारी फुललेल्या फुलांची माळ घटावर अर्पण करतात. नवरात्रीचे दिवस मोजले जातात ते माळेने. ‘आज पहिली माळ, उद्या दुसरी माळ…’ अशी गणना होते.

घटावरील माळ दशमीपर्यंत काढली जात नाही. विजयादशमी म्हणजेच दसर्‍याला घट-विसर्जन झाल्यावर निर्माल्य माळांचं विसर्जन होतं. रूजवणाची माती दररोज हळदीच्या पाण्याने शिंपडून घेतात व म्हणूनच कदाचित देवीच्या कृपाशीर्वादाने तिसर्‍या वा चौथ्या दिवशी संपूर्ण रूजवण तरारून उठते आणि सर्व बाजूंनी फुलते. हेच रूजवण विसर्जनानंतर देवीच्या मूर्तीला वाहतात, देवस्थानातील इतर राऊळात ठेवतात व नंतर प्रसाद म्हणून वाटतात. बायका हे रूजवण केसांत माळतातदेखील.

फोंडा महालातील नवरात्रौत्सवात ‘मखरोत्सव’ हा जवळपास प्रत्येक मोठ्या देवस्थानात साजरा होतो. मखर म्हणजे एक मोठ्ठी लाकडी चौकट ज्यात मध्यभागी देव बसवायला जागा असते आणि बाकीची जागा सजावट करण्यासाठी वापरतात. देवाचा चौक जो असतो तिथल्या छताला मखर दणकट अशा साखळदंडाने बांधला जातो. हे लाकडी मखर अंदाजे पाचशे किलोच्या वर असावं, कारण ते फिरवताना आणि झुलवताना त्या सराईत माणसालादेखील घाम फुटतो. आमच्या बालपणात फोंडा महालातील अनेक देवळांत नवरात्रीच्या नऊही रात्री असणार्‍या मखरोत्सवाचं आम्हाला खूप आकर्षण होतं आणि अजूनही जायची तीव्र इच्छा असते. महालक्ष्मी- बांदिवडे, नागेश- नागेशी, रामनाथ- रामनाथी, शांतादुर्गा- कवळे, कपिलेश्वर- कपिलेश्वरी, नवदुर्गा- मडकई, महालसा नारायणी- म्हार्दोळ, मंगेश- मंगेशी, शांतादुर्गा- वेलिंग, नरसिंह- वेलिंग, विजयदुर्गा- केरी अशा मंदिरांत देव वा देवी इशारत, पुराणवाचन आणि कीर्तन झालं की मखरात बसवली जाते व मखर आठही दिशांनी पुढे मागे हलवतात. त्या रंगीबेरंगी मखरात बसलेली, जाईजुई, सुवासिक फुले, माळा, हार, तुरे, वेण्यांनी सजलेली अश्वारूढ आणि सशस्त्र अशी श्रींची मूर्ती फारच भव्यदिव्य आणि भारदस्त वाटते. मखर विद्युत रोषणाईने, जाईजुईच्या माळांनी, बाजारच्या शेवंती वगैरे फुलांनी, हारांनी छान सजवलेलं असतं. मखर हलवणारा वेगळा असतो तर आरती दाखवणारा वेगळा असतो. कधी नागेशाला आरती दाखवणारा महालक्ष्मीला मखर झुलवतो, तर कधी हेच उलटं असू शकतं.
जाईच्या माळा, अबोलीचे वळेसर, ओवळाच्या माळा, मोगर्‍यांची वेणी, सदाफुलींच्या नाजूकपणे ओवलेल्या माळा… परसबागेत फुललेल्या फुलांना जो गंध आणि रंगरूप आहे ते बाजारू फुलांत नाहीच. शेवंती, गुलछडी आणि तशा प्रकारची फुलं ही दिवसेंदिवस टवटवीत राहतात, पण त्यांत स्थानिक फुलांची नजाकत नाही… तर असा हा दैवी थाट बघून कोणताही हौशा-नवशा-गवशा अगदी आश्चर्यचकित झाला तर नवल वाटू नये.

आमच्या लहानपणी आम्ही सगळी भावंडं आईबरोबर मखरोत्सवाला जायचो. संध्याकाळी आमच्या गावातून गोवा डेअरीच्या कुर्टी प्लांटवर दूध घेऊन टाटाचा टेम्पो जायचा. आम्ही या टेम्पोत बसून जायचो, कारण सत्तरी तालुक्यातून संध्याकाळी सहानंतर वाहतुकीची साधने तेव्हा नव्हती. असे दयावान हाच काय तो आधार! आजूबाजूला सगळे ऍल्युमिनियमचे मोठाले कॅन आणि त्यावर बसणारी आमची एवढूशी मूर्ती. टेम्पोच्या बॉडीचे गज घट्ट पकडायचे, वळण आलं की आणखीन आवळायचे, असा हा स्वरक्षणाचा प्रयोग कुर्टीपर्यंत चालायचा. बस चुकलेल्या हवालदिल जीवांना हा टेम्पो मोठ्ठा आधार असायचा. हा टेम्पो वांते- भिरोंडा- नाणूस- खडकी- खोतोडे- गुळेली- गांजे- उसगाव अशी मजल दरमजल करत शेवटी संध्याकाळी सव्वासात ते साडेसात दरम्यान कुर्टीला पोहोचायचा. तिथून मग आम्ही काहीतरी करून फोंड्याचा बाजारातला प्रास म्हणजेच बसस्टँड गाठायचो. तिथून मडकईला जाणारी बस पकडून बांदिवड्याला उतरायचो आणि आधी आई महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मग नागेशीत नागेश देवस्थानात आमचा काफिला रवाना व्हायचा.

महालक्ष्मी आणि नागेशीत फक्त पाचशे मीटरचं अंतर आहे. महालक्ष्मीच्या मागच्या महाद्वारातून चालत गेलं की मधल्या रस्त्याने कुळागरातून नागेशाच्या तळीकडे पोहोचतो. त्या तळ्याच्या कडेकडेला एकावेळी एकच माणूस आरामात जाईल एवढी कठडावजा वाट आहे. चौकोनी तळ्याला ही संपूर्ण वाट आहे. तिथून वर चढून गेलं की नागेश देवस्थानात पोहोचतो. नागेश देवस्थानात मखरारती अर्धा तास आधी असते तर महालक्ष्मीला अर्ध्या तासानंतर. नागेशाची मखरारती झाली की येताना धरलेला जोर परत धरून घाईघाईने नागेशाच्या तळीच्या कडेकडेने जीव मुठीत धरून पैलतीर गाठायचा. या घिसाडघाईत पळणारा माणूस तळीत पडला तर पडला… आणि पडून मग महाभिषेकस्नान तर होतच होते. एकदा तर आमच्या समोरच एकटा घसरून थेट तळीच्या पाण्यात पडला आणि त्याने पडलो-पडलो, मेलो-मेलो अशी बोंब मारली. मग कुणीतरी त्याला हात देऊन वर घेतलं. त्याचे कपडे भिजले होते आणि तो आपला बापुडा नागेशाला, ‘बाबा नागेशा पावलो रे तू!’ म्हणून नमस्कार करू लागला.

महालक्ष्मीची मखरारती झाली की प्रसाद वाटप आणि प्रसाद वाटपाचा गोव्यातील देवळात नियम आहे की प्रसाद वाटून झाल्याशिवाय कुणीही देवाच्या चौकाच्या बाहेर जायचं नाही आणि ही शिस्त भक्त-भाविकांकडून कसोशीने पाळली जाते. आरतीनंतर मूर्ती गाभार्‍यात नेतात आणि भाविकांची देवावरची फुले मिळवण्यासाठी ही झुंबड उडते.
मखरारती झाल्यावर आणि सगळा कार्यक्रम संपल्यावर जर का आम्हाला वांत्यात, पणशात, अडवईला परतणारे कुणीही भेटले नाहीत तर पुरोहितांकडे रात्रीचा मुक्काम पडायचा. सकाळी उठून बांदिवडे ते फोंडा आणि मग फोंडा ते वाळपई बस पकडायची आणि गुळेलीत येऊन उतरायचं. गुळेलीहून म्हादई नदीत उतरून नदी ओलांडून पलीकडे गेलं की आमचं गाव एक किलोमीटर आणि पुढे काजू बागायतीतून आमचं घर फक्त एक किलोमीटरवर. आम्ही दहा, चौदा आणि पंधरा वर्षांची तीन भावंडं आईबरोबर ती नदी कशीबशी ओलांडत होतो. कधी पाणी कंबरेपर्यंत तर कधी पार छातीपर्यंत. म्हादई नदी कशीबशी ओलांडून, म्हादईच्या वाड्यावरून परत मोठ्या दोंव्हाळातून आम्ही घरची वाट धरायचो. आज गाडीघोडं असूनही आम्ही या उत्सवानिमित्त अशा ठिकाणी पोहोचणं कठीण.

सांगायचं म्हणजे या एकविसाव्या शतकाची बावीस वर्षे उलटूनही हा ओसंडून वाहणारा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही आणि उत्सवाला होते ती गर्दीही कमी झालेली नाही. फक्त आधी भक्तांचे डोळे मूर्तीकडे टक लावून असायचे; आता कॅमेरा ऑन असतो आणि तिथे त्या स्क्रीनवर अनेक भक्तांची दृष्टी हे दैवी क्षण कैद करण्यात गुंतलेली असते.