मंदिरात अंतरात तोच नांदताहे

0
25

योगसाधना- 651, अंतरंगयोग- 237

  • डॉ. सीताकांत घाणेकर

ती शांती, तो चिदानंद, ब्रह्मानंद प्रत्येकाच्या अंतरात आहे. मध्ये मध्ये ध्यान करून आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक शास्त्रशुद्ध योगसाधना करणाऱ्या योगसाधकाला असा अनुभव नक्कीच आलेला असेल.

बालपणात घरी आई किंवा आजी रोज तिन्हीसांजेला प्रार्थना, भजन झाल्यानंतर एक छानशी गोष्ट सांगायची. तसेच शाळेत गुरुजीदेखील सुंदर गोष्टी सांगायचे. जास्तकरून जनावरे, पक्षी, राजकन्या-राजपुत्र यांच्याच गोष्टी जास्त असायच्या. आम्ही अत्यंत लक्ष देऊन या कथा ऐकत असू. गोष्टीतील पात्रे डोळ्यांसमोर, मनासमोर येत असत.

वय वाढत गेले. आता त्या गोष्टीत तेवढा रस नव्हता. आणि आता तर आजी घरी असणारच याची खात्री नसते. अनेक आजी-आजोबा हल्ली वृद्धाश्रमात समवयस्कांबरोबर आयुष्यातले दिवस सारण्यात धन्यता मानतात. समाधान मानून घेतात. कारण त्यांच्याकडे दुसरा उपायच नसतो.
आमच्या पिढीचा एक वेगळाच सुखद अनुभव होता- एकत्र कुटुंबाचा. आता फक्त त्या गोड आठवणी राहिल्या आहेत. त्या व्यक्तींतील कुणीही आज हयात नाहीत. अनेकवेळा त्या छान-छान कथा आठवतात. आता त्या कथांना वेगळा अर्थ आहे असे वाटते. त्यात फार मोठा बोध आहे हे जाणवते. अशीच एक छोटीशी गोष्ट- गाय व सिंहाची. ती अशी-
एक दिवस गाय डोंगरावर चरायला गेली होती. चालता चालता ती फार दूर पोचली. अंधार पडायला लागला. गाईला आता आपल्या पाडसाची आठवण झाली. ती पळत पळत घरी निघाली. वाटेत ती हंबरडादेखील फोडत होती.
पळता पळता तिच्या मागे तिला कुणाची तरी चाहूल लागली. मागे वळून बघते तर भला मोठा सिंह तिचा पाठलाग करत होता. तिला समोरचा रस्ता ठीक दिसेना. ती चिखलात अडकली. सिंह तिच्या मागे पळत येत होता, त्यामुळे तोदेखील चिखलात अडकला. ते बघून गाय शांत झाली, कारण आता सिंह तिला मारू शकत नव्हता.
इकडे सिंह बेचैन झाला होता. त्याला भीती वाटायला लागली होती. गाय शांत असलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिला विचारले- “तू चिखलात अडकली आहेस. तुला बाहेर निघणे शक्य नाही, तरी तू अशी शांत कशी राहू शकतेस?”
गाय शांतपणे म्हणाली, “सिंह दादा, तू बेवारसी आहेस, कारण तुला कुणी मालक नाही. मला माझा मालक आहे. तो माझ्यावर अत्यंत प्रेम करतो. आता थोड्या वेळात त्याच्या लक्षात येणार की रात्र झाली तरी मी घरी पोचली नाही. म्हणून आता तो माझा शोध घेत येथे येणार आणि मला सोडवणार!”
त्यावेळी आम्हाला उत्सुकता लागायची. गाईचा मालक येऊन तिला घेऊन गेला का? तिची भेट तिच्या पाडसाशी झाली का? कथाकार हे सर्व मुद्दे सांगून गोष्ट संपवत असे.

आता विचार, चिंतन केले तर मथितार्थ, भावार्थ व त्या गोष्टींमागील उच्च तत्त्वज्ञान लक्षात येते. येथे जीव व ईश्वर यांचा जवळचा संबंध असतो. हे संबंध विविध असतील. आत्मा व परमात्मा, जीव व जगदीश, माता-पिता व मूल, सेवक व मालक.
मुख्य म्हणजे मुळात हे अनेक संबंध आहेतच. प्रत्येक व्यक्तीच्या विचारांप्रमाणे, संस्कारांप्रमाणे हे संबंध वेगळे असतील, पण येथे मुख्य मुद्दा म्हणजे प्रेमाचे, आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे संबंध.
दुर्भाग्याने आध्यात्मिक अभ्यास, शास्त्रशुद्ध योगसाधना, ध्यान-धारणा न केल्यामुळे आपणातील बहुतेकजण हे संबंध विसरले आहेत. अनेकांना तर ते माहीतदेखील नाहीत.

प्रार्थनेत आपण अनेकवेळा म्हणतो- ‘त्वमेव माता पिता त्वमेंव।’ पण बहुतेकवेळा ते म्हणण्यापुरतेच असते. त्यातील भाव आपण लक्षात घेत नाही. खरे म्हणजे हा भाव, ही भावना अत्यंत भक्तिदायक असते. शुद्ध भाव असला तर आंतरिक शक्तीला जबरदस्त चालना मिळते. आजच्या भौतिक विश्वात या सूक्ष्म भावना जवळजवळ नष्ट झाल्या आहेत- दया, प्रेम, क्षमा. त्यामुळे आंतरिक शक्तीला अडथळा निर्माण झाला आहे. पुष्कळकडे हल्ली ज्या नकारात्मक घटना सर्रास घडताहेत त्याचे एक कारण हेच आहे. स्वार्थ, अहंकार, आत्मकेंद्रित होणे… ही अनेक कारणेदेखील आहेतच.
विश्वात दुष्टपणा, क्रूरता किती वाढली आहे हे लक्षात येण्यासाठी रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास-पॅलेस्टाइन यांतील होणाऱ्या लढाया वाचायला, बघायला हव्यात. मन अगदी बेचैन होऊन जाते. बॉम्बस्फोटामुळे आईवडील मेल्यानंतर त्यांची लहान मुले जो आक्रोश करतात तो बघवत नाही. राजकारण काहीही असो, या घटना वर्षानुवर्षे चालतात.

वैश्विक योग दिन- 21 जून रोजी- संयुक्त राष्ट्रे फक्त घोषणा करतात- समन्वय व शांतीसाठी योग, वसुधैव कुटुम्बकम्‌‍ वगैरे. त्या दिवशी लाखो व्यक्ती सामूहिक योग करताना दिसतात. पण त्यातील तत्त्वज्ञान, भाव न समजता फक्त कर्मकांडात्मक योग केला जातो. खरी आवश्यक आहे ती समग्र दृष्टिकोन ठेवून शास्त्रशुद्ध योगसाधनेची!
अष्टांगयोगातील अत्यंत प्रभावी अंगे म्हणजे ध्यान-धारणा.
ध्यान ः मेडिटेशन हा शब्द ‘मेडिरी’ या शब्दावरून आलेला आहे. थोडक्यात अर्थ म्हणजे ‘व्यवस्थित होणे’ (हील). आजकालच्या संदर्भात बघितले तर भावभावना व्यवस्थित होणे. नकारात्मक भावना कमी होऊन सकारात्मक भावना वाढीस लागणे. कालांतराने या नकारात्मक भावना नष्टदेखील होतील. त्यासाठी नियमित ध्यान करणे आवश्यक आहे.
भगवान बुद्धाचे जीवन बघितले तर भाव लगेच समजेल. त्यांच्या मनात दयाभाव उत्पन्न झाला व त्यांचे सगळे जीवनच बदलून गेले. यासाठी ध्यान करताना मुख्य गोष्ट म्हणजे-

  1. आधी ‘स्व’कडे नाते जोडणे. मी एक पवित्र शांतीस्वरूप आत्मा आहे हे समजणे. नंतर 2. प्रेम, शांती यांचा जो स्रोत आहे त्या परमात्याकडे नाते जोडणे. हे प्रेम निस्वार्थी, निरपेक्ष, निराकांक्ष असणे आवश्यक आहे.
    एकदा हे नाते सुरू झाले, शुद्ध स्वरूपात समजले व नियमित निरंतर सरावानंतर प्रस्थापित झाले की व्यक्तीला परम आत्मानंद, चिदानंद… या विविध आनंदांचा अनुभव येईल, अनुभूती होईल. ती व्यक्ती हळूहळू आनंदी, हसतमुख राहील. तिच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींनादेखील शांततेचा अनुभव येईल. त्या व्यक्तीची सकारात्मक, शक्तिशाली कंपने वातावरणात पसरायला लागतील. निसर्गदेखील शांत होईल.
    थोर संत, महापुरुष यांच्या सान्निध्यात असाच सुखदायक अनुभव येतो. तसेच मंदिराच्या पवित्र प्रांगणातदेखील शांती लाभते. ही शांती, हा आनंद चिरकाल टिकण्यासाठी परत परत त्या व्यक्तींना भेटण्याची अथवा अशा स्थानावर जायची गरज नाही. ती शांती, तो चिदानंद, ब्रह्मानंद प्रत्येकाच्या अंतरात आहे. मध्ये मध्ये ध्यान करून आस्वाद घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक शास्त्रशुद्ध योगसाधना करणाऱ्या योगसाधकाला असा अनुभव नक्कीच आलेला असेल.
    कथेतल्या गाईचा जसा स्वतःच्या मालकावर विश्वास होता, तशीच अढळ श्रद्धा आपल्यातील प्रत्येकाने जगदीशावर ठेवणे अपेक्षित आहे. परिणाम कालांतराने हळूहळू नक्की दिसतील याची खात्री बाळगा.