मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण

0
8

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपला मजबूत करण्यासाठी दक्षिण गोव्यातील काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी दोघांना मंत्रिपद देण्याचे वचन देण्यात आलेले होते; मात्र काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाला वर्ष उलटले तरी अजूनपर्यंत मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाला भाजपमधूनच विरोध होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील फेरबदल लांबणीवर पडलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती निश्चित करण्यासाठी पणजीत घेण्यात आलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या प्रलंबित विषयावर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.