कोरोना महामारीतून मानवाला थोडाफार दिलासा मिळालेला असतानाच मंकीपॉक्स नामक नव्या विषाणू संसर्गाने पाश्चात्य आणि युरोपीय देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. बघता बघता ह्या विषाणूचा संसर्ग अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये पसरत चाललेला दिसतो आहे आणि हे लोण भारतापर्यंत येण्याची शक्यता गृहित धरून कालच केंद्र सरकारने त्याबाबत खबरदारीचे उपाय योजण्यासंबंधीचे फर्मान जारी केले आहे. युरोपीय देशांमध्ये एखाद्या महामारीगत मंकीपॉक्सचे रुग्ण सापडत आहेत. ब्रिटनबरोबरच स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इटली, जर्मनी, बेल्जियम अशा एकेका देशामध्ये रुग्ण सापडू लागले आहेत. ब्रिटन आणि पोर्तुगालपर्यंत हे लोण आले असल्याने लवकरच भारतात व विशेषतः आपल्या गोव्यापर्यंत धडकण्याची धास्ती अर्थातच निर्माण झालेली आहे.
आफ्रिकी देशांमध्ये, विशेषतः नायजेरियात ह्या प्रकारच्या त्वचारोगाचे रुग्ण काही वर्षांपूर्वी आढळून आले होते, परंतु तेव्हा त्याला आजच्यासारखे व्यापक रूप मिळाले नव्हते. आता आफ्रिकी देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण नव्याने सापडत आहेत, परंतु युरोप किंवा अमेरिकेच्या तुलनेत तेथील रुग्णांना होणारा संसर्ग सौम्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यासंबंधी अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आफ्रिकेतील सदर विषाणूने सौम्य स्वरूप धारण केलेले असण्याची शक्यता आहे. याउलट युरोप, अमेरिकेसारख्या तुलनेने स्वच्छ आणि आरोग्यदायी सवयी असलेल्या देशांमध्ये हा आजार झपाट्याने पसरताना दिसतो आहे.
मंकीपॉक्सचा संसर्ग हा एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दुसर्या व्यक्तीला होतो असे आढळून आले आहेच, परंतु त्याच बरोबर काही रुग्णांमध्ये दर्शनी लक्षणे नसल्याचाही वैद्यकीय तज्ज्ञांना संशय आहे, कारण त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या विषाणूचा प्रसार होत असावा असे त्यांना वाटते. प्रत्यक्षात या विषाणूमुळे रुग्णाच्या शरीरावर मोठमोठे फोड येतात. ते दोन ते चार आठवडे राहतात. त्यामुळे असे रुग्ण कोरोनाप्रमाणे आपला आजार लपवू शकत नाहीत. त्यांच्या शरीरावर, चेहर्यावर येणारे फोडच ते बाधित झाले आहेत हे दर्शवतात. अशा बाधित व्यक्तीपासून येणार्या थुंकी, लाळ, घाम आदी शारीरिक स्त्रावांशी संपर्क आल्यास किंवा त्या व्यक्तीने वापरलेले कपडे, वस्तू आदींशी संपर्क आल्यास ह्या विषाणूची बाधा होऊ शकते असे आढळून आले असल्याने या आजाराबाबतची चिंता वाढते. जरी हा आजार प्राणघातक असल्याचे अजून तरी आढळलेले नसले तरी ज्या प्रकारचे शारीरिक विद्रुपीकरण यातून होते, ते किळसवाणे आणि भीतीदायक आहे.
भारतामध्ये मुळातच शारीरिक स्वच्छतेच्या सवयींबाबत सारा आनंदीआनंदच दिसतो. कुठेही कसेही पचापचा थुंकणे हे तर नेहमीचे. शिवाय सगळीकडे गर्दीचे वातावरणही नेहमीचे. त्यामुळे अशा प्रकारच्या त्वचारोगाचा फैलाव होण्यास येथे वेळ लागणार नाही. म्हणूनच सरकारने पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीनुसार मंकीपॉक्ससंदर्भात युद्धपातळीवर सज्जता ठेवण्याची गरज आहे. गोव्यासारख्या पर्यटनाभिमुख राज्यात जिथे देशी आणि विशेषतः विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात, तेथे अशा बाधित व्यक्तीच्या संपर्कात स्थानिक जनता येण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाच्या बाबतीतही हे दिसून आले आहे. त्यामुळे शारीरिक स्वच्छता, सामाजिक अंतर, जंतुनाशकांचा सर्रास वापर आदी गोष्टींची गरज ह्या नव्या संकटाच्या काळात भासेल असे दिसते आहे.
युरोपीय देशांतील रुग्णांपासून जिनॉम सिक्वेन्सिंग करण्यात येत आहे. त्यामुळे या विषाणूविषयी अधिक माहिती येणार्या काळात सापडू शकेल. जशी कोरोनावर लस आली तसेच या नव्या संकटावर उपचारही नक्कीच येतील, परंतु त्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. या दरम्यानच्या काळात हा आजार बेबंद फैलावू नये यासाठी सरकार आणि नागरिक या दोन्ही स्तरांवर खबरदारी घ्यावी लागेल. रुग्णांवर त्वरेने उपचारासाठी व्यवस्था उभाराव्या लागतील. भारत सरकारने राज्य सरकारांना यासंबंधी सूचित केलेले आहे. त्यानुसार मुंबईसारख्या ठिकाणी तेथील सरकारने स्वतंत्र उपचार कक्ष उभारण्यास सुरूवात केली आहे. गोवा सरकारनेही विलंब न लावता या येणार्या संकटाची वेळीच चाहूल घेऊन उपचारांची व्यवस्था उभी करावी. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कोरोनाच्या काळात आपल्या कार्यक्षमतेचे दर्शन घडवले होते. आता त्यांची आणखी एकदा कसोटी लागेल. मंकीपॉक्सच्या संभाव्य संकटापासून ते गोमंतकीयांना वाचवतील काय?
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.