भारतीय हवामान विभाग म्हणतो, यंदा पाऊस सरासरी इतकाच

0
10

यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल दिली. देशात यंदा पाऊस सामान्य राहणार आहे अर्थात सरासरीइतकाच पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाने सलग पाचव्या वर्षी सरासरी इतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. काल भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. यंदा देशात 870 मिमी. पाऊस पडेल. दरम्यान, एका दिवसापूर्वीच ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडले आणि त्याचे प्रमाण 94 टक्के असेल, असा अंदाज वर्तवला होता.

भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषद घेत यंदाचा मान्सून कसा असणार या संदर्भात अंदाज वर्तवला. हवामान विभागाचे सचिव डॉ. एम. महोपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डी.एम. रविचंद्रन उपस्थित होते. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटले जाते. पुढचा सुधारित पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनसंदर्भातील चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.

पाऊस मोजण्याची श्रेणी कशी ठरते?
हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.